राजकारणातल्या प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या ‘खुर्ची’वर डोळा असतो, आणि त्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचे व्यक्तिमत्त्व स्वत:च्या अंगी रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही केला जातो.
माणसाचं व्यक्तिमत्त्व, त्याची देहबोली आणि वागणं यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या ज्या गोष्टी रोजच्या आयुष्यात असतात, त्यामध्ये तो कोठे बसतो हेही महत्त्वाचे असते. हा सखोल अभ्यासांती काढला गेलेला निष्कर्ष आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात आत्मविश्वास डळमळीत करू शकणाऱ्या अनेक कारणांपैकी, जागा हे महत्त्वाचे कारण असते. उपनगरी रेल्वेगाडी फलाटावर येत असतानाच उडी मारून आत घुसणाऱ्यांपैकी ज्याला खिडकीची जागा मिळते, त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास, धावाधाव करूनदेखील बाकडय़ावरच्या चौथ्या आसनावर जेमतेम बसण्यापुरती जागा मिळवणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे पडेल भाव आणि त्यापाठोपाठ डब्यात शिरलेल्या व बसावयास जागा न मिळालेल्या प्रवाशाच्या चेहऱ्यावरचे पराभूत भाव पुसता येत नाहीत, हा अनुभव अनेकांना येतो.
बसावयास मिळणारी जागा – खुर्ची, आसन वा बाकडे – त्या त्या वेळी माणसाचे व्यक्तिमत्त्व ठरविण्यास कारणीभूत असते, हे स्पष्ट करण्यासाठी एवढेसे उदाहरण कदाचित पुरेसे नाही. लोकसभेत काही काळापुरते सत्ताधारी बाकावर बसलेल्या भाजपवाल्यांना पुन्हा विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व देहबोलीत पडलेला फरक अनेकांनी अनुभवला असेल. रालोआ सरकारकाळात सत्ताधारी बाकांवर पहिल्या रांगेतील आसनावर बसलेल्या पक्षाच्या भीष्माचार्याच्या व्यक्तिमत्त्वातील आक्रमकपणा विरोधी बाकांवर आल्यानंतर पुसट होत गेला, हेही अनुभवले असेल. म्हणूनच, ‘व्यक्तिमत्त्व विकासा’च्या प्रक्रियेत, बसण्याच्या जागेचा मोठा वाटा असतो, अशी आमची खात्री आहे. घरात-ऑफिसात रुबाबात वावरणारा एखाद्या दवाखान्यात जातो, आणि अगोदरपासून ताटकळलेल्या पेशंटांच्या रांगेत बाकडय़ावर बसतो, तेव्हा त्याचा गळून पडलेला रुबाब चेहऱ्यावर उमटतो. एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सरकारी कामासाठी मंत्रालयाचे किंवा एखाद्या सरकारी कार्यालयाचे खेटे घालण्याची वेळ येते, आणि केबिनबाहेर ताटकळत बाकडय़ावर तिष्ठत बसावे लागते, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वात पडलेला फरक सहज जाणवू शकतो.
दिवसभर कामांनिमित्त ज्या ज्या खुच्र्या बसण्यासाठी मिळतात, त्या त्या खुर्चीनुसार त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वात फरक पडतो, आणि सगळी कामे संपवून संध्याकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा प्रचंड आत्मविश्वासाने तो हातातली बॅग भिरकावून सोफ्यावर ऐसपैस बसतो. दिवसभर झालेले व्यक्तिमत्त्वाचे चढउतार तेव्हा एका शाश्वत स्तरावर स्थिरावलेले असतात, आणि देहबोली, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाचे सारे पदर पूर्वपदावर आलेले असतात..
हे सारे एवढय़ा विस्ताराने सांगण्याचे कारण असे की, आत्मविश्वास जपण्यासाठी वा वाढवण्यासाठी अशी, आत्मविश्वास जोपासू शकेल अशी हक्काची बसण्याची जागा माणसाला आवश्यक असते. राजकारणासारख्या क्षेत्रात अशी जागा मिळाली नाही, तर जी व्यक्ती एखाद्या जागेवर ज्या आत्मविश्वासाने बसलेली असते, त्या व्यक्तीचा आणि तिच्या जागेचाच हेवा वाटण्याचीही शक्यता असते. राजकारणातील अनेकांच्या बाबतीत तर असे हमखास घडते. त्या, आपल्याला हेवा वाटणाऱ्या व्यक्तीच्या जागेवर आपण आहोत, अशी स्वप्ने डोळ्यांसमोर तरळू लागतात, आणि पुढचा सारा राजकीय प्रवास स्वप्नांच्या वाटेवरूनच सुरू राहतो.
अशी स्वप्ने आणि हेवा पेरण्याची जादू मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये असते. महाराष्ट्रात अनेक नेते वर्षांनुवर्षांपासून या खुर्चीकडे नजर लावून मनात मांडे खात आणि ‘श्रेष्ठीनामाचा जप’ करीत तग धरून बसलेले दिसतात, तेव्हा या निष्कर्षांला आणखीनच पुष्टी मिळते. मुख्यमंत्र्याच्या या खुर्चीसाठी काही जण खांद्यावरचे झेंडे बदलतात, तर त्या खुर्चीत नसतानाही आपण त्या खुर्चीचे खरे दावेदार आहोत, अशा समजात काही जण आपल्या कारकिर्दीचे पतंग आकाशात भिरकावून देतात. या खुर्चीची ऊब एकदा का अनुभवली, की त्यावरून पायउतार झालेल्यांच्या अस्वस्थ वर्तमानाचे तर आपण सारेच साक्षीदार असतो. त्या खुर्चीवर कोरल्या गेलेल्या आपल्या नावाच्या जाणिवांनी बेचैन झालेल्यांच्या आक्रमक राजकारणाला अधूनमधून येणारा बहर आवरण्यासाठी मग खुर्चीचे खरे धनी पार ‘वर’पर्यंत धावाधाव करतात, आणि ‘सारे काही खुर्चीसाठी’ हे राजकारणाचे सूत्र सर्वाना अनुभवायला मिळते.. एकदा त्या खुर्चीचा ताबा मिळाला, की प्रवाहाबाहेरचे ‘फेकलेपण’ विसरले जाते, आणि समोर खुशमस्कऱ्यांच्या रांगा लागतात. विरहकाळातील एकांतवास आणि अज्ञातवासाचे दिवस आठवणींच्या कप्प्यात कुलूपबंद केले जातात आणि त्या आठवणी कायमच्या पुसण्याचा आटापिटा सुरू होतो. त्यासाठी समर्थकांची फौज वाढविण्याचे डावपेच सुरू होतात, आणि खुर्ची असल्यामुळे, अशा फौजा बांधण्यासाठी जे जे करावे लागते, तेही सारे सहज शक्य होते..
विक्रमादित्याच्या सिंहासनाची गोष्ट अलीकडच्या काळात कदाचित आपल्या स्मरणशक्तीपलीकडे गेली आहे. हे सिंहासन जमिनीत गाडले गेल्यानंतर त्या जागी बसणाऱ्या गुराख्याच्या मुलाच्या अंगी नकळत जागा होणारा न्यायविवेक हे त्या गोष्टीचे सार.. हादेखील त्या आसनाचा आणि जागेचाच महिमा!.. कळत नकळत येणाऱ्या या अनुभवसिद्धतेमुळे, बसण्याच्या जागेविषयी जागरूकता येणे हे खरे तर सजगपणाचे लक्षण मानायला हवे. राजकारणात अशी सजगता कधीपासूनच रुजली आहे. या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या ‘खुर्ची’वर डोळा असतो, आणि त्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचे व्यक्तिमत्त्व स्वत:च्या अंगी रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही केला जातो. राजकीय पक्षभेदांच्या सीमा आणि वैचारिक तत्त्वभेद याला रोखू शकत नाहीत. अगदी, ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती’ असा प्राधान्यक्रम लावून स्वत:ला देशभक्तीचे खरे पाईक मानणाऱ्या पक्षामध्येदेखील हे पाहावयास मिळू लागले आहे.
भाजप ही ज्या संघ परिवाराची शाखा आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, सर्वोच्च पद हे ‘विक्रमादित्याचे सिंहासन’ आहे, अशी भावना होती. या सिंहासनावर बसण्याची पात्रता संपादन करणाऱ्यासच या पदावर बसता येईल, असा विचार ज्या संघातून रुजविला गेला, त्या संघाचे आजचे पाईक मात्र, बोली लावून खुच्र्यावर मालकी मिळविण्यासाठी धडपडताना दिसू लागले आहेत. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दिल्लीच्या राजकारणातून गुजरात सांभाळण्यास परत गेले, त्याला आता जवळपास बारा वर्षे लोटली. या काळातील दिल्लीच्या पक्षकार्यालयातील त्यांच्या एकाकी खुर्चीभोवतीची गर्दी अलीकडच्या काही वर्षांत पुन्हा वाढू लागली, आणि ‘मोदींच्या खुर्ची’ला पक्षात मानाचे स्थान मिळाले. ज्या खुर्चीत मोदी विराजमान झाले, ती खुर्ची आपली व्हावी, यासाठी तळमळणाऱ्यांची संख्या वाढू लागली. दिल्लीतील एका प्रचार सभेच्या व्यासपीठावरील ज्या खुर्चीत मोदी बसले, त्या खुर्चीसाठी सव्वाचार लाखांची बोली लागली आहे. राष्ट्र आणि पक्ष वगैरे नंतर, व्यक्ती हीच प्रथम आहे, याचा नवा साक्षात्कार घडविण्याची ही किमयादेखील एका खुर्चीनेच करून दाखविली आहे. जो कोणी कार्यकर्ता पैसे मोजून या खुर्चीची मालकी मिळवील, त्याला त्यावर बसताच मोदींचा आत्मविश्वास चेहऱ्यावर तरी आणता येईल. कारण, ती किमया केवळ ‘खुर्ची’च करू शकते..