अपरिहार्य वाटणारं युद्ध अधिक माहिती घेत गेलं की, अनावश्यक असल्याचं सिद्ध होतं. त्याची जगभर अनेक उदाहरणं सापडतात. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचं काळाच्या कसोटीवर घासूनपुसून मूल्यमापन व्हायला हवं. मार्क नेमकं हेच काम करतो. आणि विशेष म्हणजे खुद्द अमेरिकेतही अशा लेखकांना देशविरोधी वगैरे म्हणून हिणवलं जात नाही.  
देशाचं संरक्षण ही काही बाबतीत तशी फसवी कल्पना आहे. म्हणजे एखाद्या गुप्तचर कर्मचाऱ्यानं अमुक एखादा शत्रू भासतोय, म्हणून त्याला थेट मारून टाकलं तर त्याच्या कृत्याचं मूल्यमापन करणार कसं? देशाच्या सुरक्षेला धोका आहे असं वाटल्यामुळे आपण हे कृत्य केलं असं त्या कर्मचाऱ्यानं सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवणार का? त्याचं म्हणणं समजा खरं जरी असलं तरी ते योग्यायोग्यतेच्या निकषांसाठी कोणत्या तागडीत टाकायचं? आणि अयोग्य असेल तर त्या कर्मचाऱ्याचं काय करायचं? त्याची अयोग्य कृती योग्य ठरवायची का? की देशाच्या हितासाठी म्हणून प्रकरण दडपून टाकायचं..
मार्क मझेट्टी याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे सगळे प्रश्न मांडलेत. इतक्या उत्तमपणे की ते वाचल्यावर विस्मयचकित होण्याखेरीज काही कामच राहत नाही. पुस्तकाचं नाव आहे ‘द वे ऑफ द नाइफ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ यूएसएज सिक्रेट वॉर’. नावावरनं कळेलच. विषय अर्थातच अमेरिका आपल्या शत्रुराष्ट्रीयांना..खरं तर तिला जे शत्रू वाटतात त्यांना..कसं वागवते, हा. पुस्तकाचा परीघ फार मोठा आहे. केंद्रस्थानी अर्थातच ९/११ आणि त्यानंतर जे काही घडलं ते असलं तरी त्याच्याही आधी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी आपल्या देशास धोका वाटणाऱ्यांची काय अवस्था केली याचेही काही दाखले यात आहेत.
मार्क हा न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर बातमीदारी करतो. कोणत्याही बातमीदाराला जो काही ऐवज मिळतो त्यातला फक्त २० टक्के दररोजची पानं भरण्यासाठी खर्ची पडतो. बाकीच्याचं काय होतं? या प्रश्नाच्या उत्तरातच चांगला बातमीदार आणि बातमीदार यांच्यातला फरक स्पष्ट व्हावा. चांगला बातमीदार दैनंदिन गरजांपलीकडचा ऐवज मुरवत ठेवतो, हवी ती भर घालतो आणि मग त्यातून उत्तम पुस्तक तयार करतो. मार्क तसा आहे. खरं तर हे त्याचं पहिलंच पुस्तक. पण त्यातही त्याच्या दीर्घ पल्ल्याच्या पाऊलखुणा सहज दिसतायत. आता पहिलं पुस्तक असल्यामुळे थोडा फार फापटपसारा आहे. पण त्याच्या शिवायचा ऐवज इतका खणखणीत आहे की हा दोष अगदीच किरकोळ म्हणायला हवा. आणि मुळात बातमीदाराला ग्रंथलेखक व्हावंसं वाटणं हीच माझ्या दृष्टीने कौतुक करावं अशी बाब. कारण एका अर्थानं बातमीदार इतिहास घडत असताना साक्षीदार असतो. तेव्हा त्यानं चांगलं पुस्तक लिहिणं ही काळाचीही गरज असते.
ती मार्क या पुस्तकात नक्कीच पूर्ण करतो, असं म्हणायला हवं. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा, अमेरिकी संरक्षण यंत्रणा पेंटॅगॉन, अध्यक्षांचं कार्यालय, निवासस्थान व्हाइट हाऊस आदी हे या पुस्तकाचे रंगपट. आणि नेपथ्य म्हणजे अफगाणिस्तानची कराल भूमी, इराक, येमेन आणि पाकिस्तान. आणि प्रमुख भूमिका? ती आहे ड्रोन या मानवविरहित स्वयंचलित मारेकऱ्याची.
हे ड्रोन तंत्रज्ञान अमेरिकेनं विकसित केलं आणि गुप्तचरांनी सुटकेचा नि:श्वासच सोडला. कारण दूर कुठे तरी बसून रिमोटच्या साहय़ानं बॉम्ब फेकून आपल्याला हवे त्यांचे जीव घेण्याची मुभा सहजपणे यामुळे मिळाली. आणि समजा नेम चुकला आणि काही अश्राप हकनाकांचा जीव गेला तर? मॅक पुस्तकात अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्याला या संदर्भात उद्धृत करतो. हा अधिकारी या प्रश्नावर म्हणाला : तसं होतंही. पण खऱ्या वैमानिकाकडून होण्याइतकं हे गंभीर नाही. ड्रोनच्या रिमोटचालकाला जेव्हा कळतं, आपल्याकडून भलत्याचाच जीव गेलाय तेव्हा तो फक्त कूस बदलतो इतकंच.
हे भयंकरच. मार्कनं या पुस्तकात अशा काही भयंकर घटना दिल्यात. त्यातली एक म्हणजे अन्वर अल अलवाकी आणि त्याचा मुलगा. दोघेही २०११ साली येमेनमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यात गुंतागुंत म्हणजे दोघेही अमेरिकी नागरिक. शत्रुराष्ट्रातला कोणी मारला गेला तर इतका बभ्रा होत नाही किंवा झाला तरी तो दाबून टाकता येतो. पण अमेरिकी नागरिकांची हत्याही अशाच प्रकारे झाली तर प्रकरण मिटवणार कसं? पेंटॅगॉनला प्रश्न पडला. तेव्हा मग तिथल्या ढुढ्ढाचार्यानी युक्तिवाद केला. काय? तर अन्वर अल अलवाकी यानं मायदेशाच्या विरोधात, म्हणजे अमेरिकेच्या, कारवाया सुरू केल्या होत्या. त्यामुळे संरक्षण दलाच्या कारवाईत तो मारला गेला असेल तर त्याच्या नैसर्गिक न्यायाच्या हक्कांचा अपवाद करता येऊ शकतो. थोडक्यात, त्याला कोणताही नैसर्गिक न्याय मागण्याचा अधिकार नाही, असं अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं. पण मग त्याच्या मुलाचं काय? त्याच्याबाबत कसलाही खुलासा करण्याची गरजसुद्धा सरकारला वाटली नाही..आणि महत्त्वाचं म्हणजे..मार्क हे पुस्तकात स्पष्टपणे नमूद करतो.
हे असं वारंवार होऊ नये म्हणून मग अमेरिकी अधिकारी एक कायमची व्यवस्था करतात. अमेरिकी कायद्यानुसार संरक्षण दलांनी काहीही कारवाई करायच्या आधी, कोणाचीही हत्या करायच्या आधी त्यांना अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. गुप्तचर यंत्रणेबाबत तसं नाही. यांचं सगळंच गुप्त. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात माणसं मारायचा अधिकार कायद्यानुसारच देण्यात आलेला आहे. म्हणजे चित्रपटात जेम्स बाँडला जसं लायसन्स टु किल हे कायमस्वरूपी देण्यात आलेलं आहे..तो वाटेल त्याची हत्या करू शकतो..तसंच हे. पण प्रत्यक्ष. तेव्हा मग या अधिकाऱ्यांनी काय केलं? तर अशी माणसं टिपण्याच्या मोहिमा संयुक्तपणे राबवल्या. म्हणजे लष्करी वा नौदलाचे वा हवाई दलाचे जवान आणि गुप्तचर यांनी मिळून कारवाया करायच्या. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दोन वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन टिपण्याची झालेली कारवाई. या कारवाया संयुक्तपणे का करायच्या? तर दोघांची सोय म्हणून. म्हणजे कारवाईत माणसं मेलीच तर ती मारण्याचा अधिकार ज्यांना आहे ते गुप्तचरच मोहिमेत सहभागी असल्यानं कोणतंच बालंट येत नाही. त्यामुळे संरक्षण दलाचंही फावतं आणि कारवाईत लष्कराची जोड मिळाल्याने गुप्तचरांची ताकदही वाढते. असा हा खुशीचा दुहेरी मामला आहे.
मार्कनं या पुस्तकात अशा आपखुशीच्या उद्योगांचे अनेक नमुने दिलेत. गेली काही वर्षे अमेरिकी संरक्षण दलातील उच्चपदस्थांच्या नेमणुकीचे दाखलेही त्याने दिलेत. अध्यक्ष बराक ओबामा यांनी सीआयएचे प्रमुख लिऑन पॅनेटा यांच्याकडे संरक्षण खात्याच्या प्रमुखाची..पेंटॅगॉनच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली तर संरक्षण प्रमुख डेव्हिड पेट्रास यांना सीआयएचं प्रमुख केलं. या आणि अशा अनेक फिरवाफिरवी झाल्या त्या याच उद्देशानं, असं मार्क ठामपणे स्पष्ट करतो.
हे वाचून अनेक प्रश्न पडतात. अर्थात असे प्रश्न निर्माण होणं हेच या आणि अशा पुस्तकांचं उद्दिष्ट असतं. कारण आज ना उद्या प्रत्येक सुजाण नागरिकाला आपल्या सरकारच्या कृत्यांचं स्पष्टीकरण मिळणं गरजेचं असतं. तो त्याचा हक्क असतो. अशी स्पष्टीकरणं मिळायला लागली की आजचं अपरिहार्य वाटणारं युद्ध अधिक माहिती मिळाल्यावर अनावश्यकही ठरू शकतं. असं झाल्याची अनेक उदाहरणं इतिहासात देता येतील. अशा वेळी सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचं काळाच्या कसोटीवर घासूनपुसून मूल्यमापन व्हायला हवं. मार्कसारखे लेखक अशा पुस्तकातून नेमकं हेच काम करतात. आनंद हा की खुद्द अमेरिकेतही अशा लेखकांना देशविरोधी वगैरे म्हणून हिणवलं जात नाही.
मार्क हा न्यूयॉर्क टाइम्सचा राष्ट्रीय सुरक्षा या विषयाचा बातमीदार. त्याचं हे पहिलं पुस्तक असल्यामुळे यात थोडा फापटपसारा आहे. पण त्याच्या शिवायचा ऐवज इतका खणखणीत आहे की हा दोष अगदीच किरकोळ म्हणायला हवा.
द वे ऑफ द नाइफ – द अनटोल्ड स्टोरी ऑफ यूएसएज सिक्रेट वॉर : मार्क मझेट्टी,
प्रकाशक : पेंग्विन बुक्स,
पाने : ३९९, किंमत : ४९९ रुपये.