माझ्या जीवनाचं मूळ अज्ञात, अदृष्ट, सूक्ष्म असताना माझं भौतिक जीवन मात्र स्थूल, ज्ञात आणि दृश्यात्मक आहे. माझं शरीर, मी ज्या आर्थिक-सामाजिक स्थितीत जन्मलो ती परिस्थिती, मी ज्या माणसांत जन्मलो तो आप्तेष्टांचा गोतावळा, आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्थितीनुसार माझी निर्माण झालेली ओळख हे सारं स्थूल, ज्ञात आणि दृश्यात्मक आहे. हे सारं कुठून आलं आणि या साऱ्यात मी कुठून आलो? आज माझं जे नाव आहे, माझी जी मातृभाषा आहे, माझा जो देश आहे, माझा जो धर्म आहे हे सारं जन्माआधीही माझंच होतं का? मृत्यूनंतर यातलं काही माझंच राहील का? नाही! मी कुठून आलो आणि कुठे जाणार हे मला माहीत नाही. ते अज्ञात आहे, अदृष्ट आहे. माझा उगम असा अज्ञातातूनच असताना, अदृष्टातूनच असताना मला मात्र अज्ञाताची, अदृष्टाची भीती वाटते! माझ्या जीवनातले प्रसंग असे अज्ञातातून उलगडत असतात आणि त्या प्रसंगांना मी पूर्णत्वाने पाहात नसल्याने मला त्या प्रसंगातून काय उत्पन्न होईल वा ओढवेल, हे माहीत नसतं आणि म्हणूनच मला त्यांची चिंता वाटते, काळजी वाटते, भीती वाटते. मग हे प्रसंग का वाटय़ाला येतात? मी अमुकच घरात, अमुकच माणसांमध्ये, अमुकच परिस्थितीत का जन्मलो? माझ्या जीवनातल्या सुख-दु:खांचं कारण काय? या सर्वच प्रश्नांचं उत्तर एकच, माझ्याच कर्मातून फळस्वरूप असा परिणाम माझ्या वाटय़ाला येतो. माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकाशी मग तो नात्याचा असो वा परका, मित्र असो वा शत्रू, माझं गेल्या अनेक जन्मांतलं काही देणं-घेणं बाकी आहे. तो हिशेब पूर्ण करण्यासाठीच माझे विविध स्तरांवर विविध प्रकारचे संबंध निर्माण होतात. ते देणं-घेणं चुकतं करता येईल, अशीच परिस्थिती वाटय़ाला येत असते. आता तत्त्वज्ञानाच्या अंगानं विचार करता, माझं मूळ स्वरूप कसं आहे? ते परम आनंदमय आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे. जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. अर्थात जीवही परमात्म्याप्रमाणेच परम आनंदमय, परम शांत, परम समर्थ आहे. केवळ मोह आणि भ्रमातून तो स्वत:ला वेगळं मानू लागला आणि त्या वेगळेपणाच्या जाणिवेतून भ्रामक पसारा वाढवत त्यातच गुंतत राहिला. आता हा पसारा आवरल्याशिवाय अर्थात पसाऱ्यातली ओढ नष्ट झाल्याशिवाय त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचं भान येणं कसं शक्य आहे? माझी ओळख, माझी भ्रामक सत्ता, माझी कर्मे ही सारी आवरणं आहेत. माझ्या मूळ स्वरूपावरची आवरणं आहेत. त्या आवरणांनिशी आरशात पाहू लागलो तर माझं मूळ स्वरूप मला दिसणार नाही, उलट ती आवरणंच दिसतील. तेव्हा अनेक गुंत्यात गुंतलो असताना जीवनाच्या आरशात मी पाहू लागलो तर माझं शुद्ध आनंदमय परम स्वतंत्र असं रूप मला कसं दिसेल? अनंत आवरणांनी वेढलो असूनही आरशात पाहताना, मी पूर्ण स्वतंत्र आहे, आनंद स्वरूप आहे, असं मी कितीही घोकू लागलो तरी मला त्या शुद्ध स्वरूपाचं प्रतिबिंब दिसेल का? त्यासाठी आधी ती आवरणं दूर करीत गेलं पाहिजे. मुख्य भ्रांतीची आवरणं मनावरच आहेत ती दूर झाली, मी निभ्रांत झालो तरच मूळ स्वरूपाचं दर्शन होणार ना?