चित्रकार प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन गेल्या १७ वर्षांत फार कुणी साजरा केला नव्हता, पाळला नव्हता. पण यंदाचं वर्ष निराळं आहे. त्यांच्या स्मृतिदिनी यंदाही काही कार्यक्रम नसतील, पण बरवे यांचा चित्रविचार जगाला कळण्याची शक्यता दुणावली असल्याचं समाधान इतक्या वर्षांनी प्रथमच मिळतं आहे. ते समाधान का आणि बरवे यांचा चित्रविचार म्हणजे काय, याबद्दलचा हा मजकूर..  
६ डिसेंबर ही तारीख कुणाला चैत्यभूमीसाठी आठवत असते तर कुणाला अयोध्येसाठी. या दोन्हीच्या पलीकडे, अगदी थोडय़ा जणांना ही तारीख प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन म्हणून आठवते. बरवे हे महाराष्ट्रातले (आणि सर्वार्थानं महाराष्ट्रीय म्हणता येईल असे) महत्त्वाचे चित्रकार म्हणून १९८६ ते १९९५ या काळात सर्वपरिचित झालेले होते. त्यामुळे बरवे यांच्या मृत्यूची नेमकी तारीख (६ डिसेंबर १९९५) फार कुणाला लक्षात नसली, तरी पुष्कळ जणांना बरवे आठवत असतातच. बेंगळुरूत किंवा दिल्लीतही एखादा अभ्यासू चित्रकार, समोरचा माणूस महाराष्ट्रातून आलाय हे कळल्यावर विचारतो : अरे वो बरवेसाहब थे न मुंबई में.. उनका कुछ कलेक्शन वगैरा अभी हैं किसी के पास? कहां देखने मिलेगा उनका काम?
बरवे यांच्याविषयीचं अभ्यासू कुतूहल कायम राखणाऱ्या या अमराठी प्रश्नांवर आपण मराठी माणसं आजवर निरुत्तर होत होतो. पण आता तसं होणार नाही.
याची कारणं दोन : एक- प्रभाकर बरवे यांनी लिहिलेलं ‘कोरा कॅनव्हास’ हे मराठीतल्या सवरेत्कृष्ट १०० पुस्तकांपैकी एक मानलं जाणारं पुस्तक आता इंग्रजीत आलं आहे आणि बरवे यांना जे म्हणायचं होतं ते या पुस्तकात नीटसपणे (शांता गोखले यांचं भाषांतर आणि जेरी पिंटोकृत संपादन अशा दुहेरी संस्कारानिशी) मांडलं गेलं आहे. बरवेंची या पुस्तकातली रेखाचित्रं मराठीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे छापली गेली आहेत. इंग्रजी वाचणाऱ्या, चित्रकलेबद्दल नावड नसणाऱ्या (पण या कलेची फार माहिती नाही, अशासुद्धा) कुणालाही कळेल, भिडेल अशी सोपेपणाची पातळी या पुस्तकानं राखली आहे. मात्र, मराठी न समजणाऱ्या अभ्यासकांनाही बरवे यांचं कलागुज नेमकं काय होतं, हे समजून घेण्यासाठी आता इंग्रजीचा उपयोग होईल.
आणि दुसरं कारण : बरवे यांच्या मृत्यूनंतरचं सर्वात मोठं प्रदर्शन सध्या मुंबईत भरलं असून ते पुढले तीन महिने- २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत सुरू राहणार आहे. लोअर परळच्या फिनिक्स मिलशेजारच्या रघुवंशी मिलचा पुनर्जन्म म्हणून जो काही अवतार झालाय, तिथल्या एका जागेत जरी हे प्रदर्शन भरलेलं असलं, तरी त्याचा दर्जा एखाद्या कलासंग्रहालयात उचित गांभीर्यानं मांडल्या गेलेल्या प्रदर्शनापेक्षा अजिबात कमी नाही. देशातले किंवा आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी ‘बरवे क्या चीज थी’ याचं उत्तर मिळवण्यासाठी पुढल्या तीन महिन्यांत कधीही मुंबईत येऊ शकतात, ही स्वागतार्ह घडामोड ठरेल.
या मजकुराचं शीर्षक ‘बरवेंनंतरचं सज्ञानवर्ष’ असं यासाठी आहे की, बरवे यांच्या मृत्यूला आता १८ र्वष होताहेत आणि १८ पूर्ण हे आपल्या देशात ‘सज्ञान होण्याचं वय’ मानलं जातं- कायदेशीरदृष्टय़ा. तो कायदा बरवे यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांना लागू असण्याचं काहीही कारण नव्हतं. बरवे यांचं भारतीय चित्रकलेच्या स्वातंत्र्योत्तर प्रवासातलं योगदान काय आहे, बरवे यांच्या निकट संपर्कातून त्यांच्या विचारांच्या जवळ आलेले इनेगिने चित्रकार, बरवे यांच्यासारखाच विचार आपापल्या परीनं करणारे (पण हा विचार बरवे यांनी ज्यांच्या आधी केला, असे) काही चित्रकार आणि मग बरवे यांनी रेखाचित्रांतून आणि रंगचित्रांमधून मांडलेला दृश्यविचार पुढे नेऊ पाहणारे पुढल्या पिढीतले अनेक तरुण, अशी बरवे यांची प्रभावळ दाखवता येते. कलाक्षेत्रात अनुयायांनी नेत्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर कला गोठून राहते. तसं बरवे यांच्याबाबत झालं नाही, हेही खरं आहे. बरवे यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे, त्यात यशस्वी झालेले चित्रकार हे बरवे यांच्याशी आजही कसं नातं सांगतात, याची चर्चा त्यामुळे अधिक सखोलपणे होऊ शकते. गिरीश शहाणे यांनी हा वारसा दाखवणाऱ्या एका प्रदर्शनाचं विचारनियोजन दिल्लीच्या एका गॅलरीसाठी काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्याहीपेक्षा अधिक विस्तृत आढावा अभिजीत गोंडकर यांनी मुंबईतल्या ताओ आर्ट गॅलरीसाठी आणखी मोठय़ा प्रदर्शनातून घेतला होता, त्यात बरवे-विचार मानणाऱ्या अनेकांच्या चित्रांसोबत स्वत: बरवे यांचीही तीन-चार चित्रं होती. मात्र, बरवे यांचा वारसा- त्यांची ‘लीगसी’- फक्त मराठी भाषकांपुरती राहते आहे की काय, अशी शंका अधूनमधून येत राहिली. मध्यंतरी सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ कलावार्षिकानं प्रभाकर बरवे यांच्या डायऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात असा प्रयत्न केला. त्याला अल्प यश आल्यावर मग बरवे कुटुंबीयांबद्दल व्यर्थ नापसंतीचे उद्गारही काढण्याची फॅशनच आली. पण ज्या मूळ डायऱ्यांवरून अख्खं एक मराठी पुस्तक झालं होतं, तेही मध्यंतरी ‘आउट ऑफ प्रिंट’ होतं! मराठी पुस्तकाला ‘पुस्तकरूप’ देताना बरवे यांच्या डायऱ्यांचं ललित अंगानं सादरीकरण झालं आहे आणि ते टाळायला हवंच, असं ज्यांनी बरवे यांच्या डायऱ्या पाहिल्या होत्या, अशा काही जणांचं मत होतं. या मताला आता शांता गोखले यांनीही दुजोरा दिलेला आहे.
बरवे यांचा चित्रविचार म्हणजे काय, असा प्रश्न मराठीतही अनेकांना पडेल. चराचराबद्दल (म्हणजे उदाहरणार्थ- सजीव मेंढी, ढग, डोंगर, वाळकी पानं अशा नैसर्गिक ‘वस्तू’ आणि लोणच्याची बरणी, इमारत, घडय़ाळ अशा मानवनिर्मित वस्तू यांबद्दल) समभावनेनं विचार करण्याची रीत बरवे यांच्या चित्रांनी रुळवली. वस्तूबद्दलच्या व्यक्तिगत भावना चित्रकाराकडे असू शकतात, पण त्या भावना चित्रात आल्यानंतर मात्र निव्वळ व्यक्तिगत असू शकत नाहीत. व्यक्तिगत अवकाश (स्वत:चं भावविश्व आणि बाहेरच्या जगाचा विचार करण्याच्या पद्धती यांचा मिळून बनलेला) आणि चित्रावकाश (चित्रकलेची तांत्रिक अंगं आणि चित्रकलेच्या इतिहासाचं आणि त्यातून आलेल्या कलाविचाराचं साद्यंतरूप या तिन्हीच्या संचितात भर घालू इच्छिणारा कोरा कॅनव्हास) यांचा मेळ चित्रकार घालत असतो. तो आपण कसा घातला, हे शब्दांत सांगताना बरवे यांनी मराठी भाषेला कामाला लावलं. या ग्रथित विचारामुळे पुढल्या पिढय़ांना, भावना- संवेदना यांचा चित्राशी संबंध काय हे आपल्या मातृभाषेतून उमगलं. त्या अर्थानं मराठीला ज्ञानभाषा करण्यात बरवे यांनी वाटा उचलला. त्याखेरीज, चित्रांची भाषा आणि मुख्यत: चित्रातली मोकळी जागा (यालाही अवकाश असाच रूढ शब्द आहे; पण बरवे यांनी एक छान शब्द दिला- ‘अचित्र’! ) आणि या अचित्राचा चित्राशी संबंध, चित्रात जे आकार दिसू शकतात, त्यांमधून दिसणारा विचार-भावनांचा प्राधान्यक्रम, त्या आकारांना रूढ अर्थापेक्षा मोठे- व्यापक अर्थ देण्याची बरवे यांची रीत, हे सारं चित्रामधून उरलं.
बरवे यांची चित्रभाषा कुणाहीपर्यंत पोहोचू शकली असती, पण ती महाराष्ट्रातच अधिक राहिली (अपवाद दिल्लीकर मंजुनाथ कामथचा) याचं कारण बरवे यांच्या मृत्यूनंतर बाहेर कुठे त्यांची प्रदर्शनं वगैरे झाली नाहीत. मुंबईत आत्ता भरलेलं प्रदर्शन जर अन्यत्र गेलं, किमानपक्षी दिल्लीच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’नं या प्रदर्शनाला दिल्ली-बेंगळुरूमध्ये स्थान दिलं, तरीही विद्यार्थिदशेपासून अखेरच्या दिवसांपर्यंतचा बरवे यांचा चित्रप्रवास त्या शहरांत उलगडेल. त्याहीपेक्षा, बरवे यांचा ग्रथित चित्रविचार कधीही- कुठेही वाचू शकण्याची सोय आजवर फक्त मराठीच भाषेत होती, ती आता स्वत:ला ‘जगाची ज्ञानभाषा’ म्हणवणाऱ्या इंग्रजीतही झाली आहे, हे बरं झालं. या दोन कारणांमुळे, बरवे यांच्यानंतरचं अठरावं वर्ष जगाला बरवेंबद्दल अधिक सज्ञान करणारं ठरलं आहे.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Harsh Chhaya on divorce with shefali shah
घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”