आपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात. उदा. पचनसंस्थेला थोडी विश्रांती देण्याकरिता काही दीर्घकाळ (कमीत कमी १ दिवस) न खाणे, या नैसर्गिक प्रक्रियेतून ‘उपास’ ही कृती जवळजवळ सर्व धर्मामध्ये अवलंबिली जाते.

अशीच अजून एक कृती म्हणजे वस्तू समोरून पाहणे, सामोरे जाणे, दर्शन घेणे! या कृतीला आपल्याकडे धर्म, आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. या कृतीमागे वस्तू समोरून पाहणे, त्याद्वारे ज्ञान मिळवणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमागे डोळे व मेंदू यांच्या कार्यपद्धती आहेत. डोळे व मेंदू यांच्या कार्यामध्ये, सभोवतालच्या जगाचे ज्ञान, सपाट-द्विमितीय रूपात नकाशासारखे मांडणे व या नकाशासारख्या मांडणीतून जगाच्या अनुभवाला समजणे हे घडत असते. परिणामी वस्तू समोरून पाहणे व चित्र-चित्रातील प्रतिमा सपाट असणे, पूजनीय वस्तूंचे समोरून दर्शन घेणे, त्यातून त्यातील अमूर्त शक्ती जाणवणे अशा गोष्टींचा एकमेकांशी संबंध जुळतो. आजच्या व यापुढच्या काही लेखांत आपण या मुद्दय़ांची तपशीलवार चर्चा करणार आहोत.
नकाशा- शाळेत असताना एका छोटय़ा कागदावर केवळ रेषांच्या साहाय्याने काढलेली भारत देशाची आकृती भूगोलाच्या पेपरात प्रश्न म्हणून यायची. त्या आकृतीत भारतातली राज्ये, त्यांच्या सीमारेषा काहीही नसायचे. त्यामध्ये भारतातली ठरावीक शहरे, ठिकाणे यांना काही खुणा, चिन्हे यांद्वारे नकाशात दर्शवा असा प्रश्न असायचा. त्या आकृतीच्या पोकळीत चिन्हांची जागा आणि आकार कमी-जास्त होऊन शहरांचे आकारमान आणि जागा बदलेल अशी भीती मनात सतत असायची. त्यामुळे शाळेच्या वर्षांत भूगोलातले नकाशे अगदी कोडय़ांप्रमाणे वाटायचे. पुढे डच चित्रकार जोहान्स व्हर्मिर यांच्या बहुतांश चित्रांमध्ये भिंतीवर लटकवलेले मोठमोठे नकाशे पाहिले, अगदी प्रेमाने तपशीलपूर्वक रंगवलेले! त्यानंतर या डच लोकांच्या नकाशांमुळे नकाशांच्या प्रेमात पडलो.
नकाशा हे चित्र किंवा आकृती एखादा देश, खंड यांच्या भूभागाचे त्याच्या सभोवतालचा भूभाग किंवा समुद्र, सागर यांच्यासह दर्शन घडवते; आकाशातून अक्षांश पाहिल्यासारखे, रेखांशाच्या मोजपट्टीने मोजूनमापून काढलेले. परिणामी नकाशातले पर्वत, नद्या, दऱ्याखोऱ्या, रस्ते, लोहमार्ग, धरणे, शहरे, खेडी, जंगले, सरोवरे अगदी सगळे एकमेकांच्यात अडकून गर्दी करून बसवल्यासारखे! अगदी चापूनचोपून, जराही इकडेतिकडे हलायला, सरकायला कोणाला जागा नाही!
मग एकाच देशाच्या नकाशाच्या अनेक अवतारांनीही मोहित केले. म्हणजे भारताचाच नकाशा, पण कधी पर्वतरांगा व भूभाग दर्शवणारा, कधी रस्ते-लोहमार्ग, तर कधी जंगल, पिके, लोकसंख्येची घनता आदी गोष्टी दर्शवणारा, दर वेळेला कपडे बदलून आल्यासारखा. भारताचाच नकाशा वेगळा दिसत राहतो. मग हळूहळू लक्षात आले की, नकाशा हा फक्त जमिनीचा नसतो, तर जमिनीवरच्या सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचाही असतो. तो एका भूभागाचा जिवंत संवेदनानुभव देणारा एक पट असतो. पुढे गुगल मॅपने व आता थ्रीडी व्ह्य़ूू मुळे आपण या संकल्पना व अनुभव यांच्याजवळ पोहोचलोय. चित्र आणि नकाशा-चित्रसुद्धा एका अर्थी नकाशासारखे असते, सपाट! चित्रकलेच्या काहीशा शास्त्रीय भाषेत त्याला ‘द्विमितीय’ म्हणतात. चित्राचा विषय कुठचाही असो- निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे, वस्तुचित्रे.. चित्रे हे नकाशासारखेच असते. कसे ते पाहू या!
नकाशात, जमिनीवर उभे राहूनही भूभागाला आकाशातून पाहिल्यासारखे जे दृश्य दिसते, त्यामागे आपल्या मेंदूची एक नैसर्गिक क्षमता कारणीभूत आहे. आपण जिंमनीवर फिरत असताना आपल्याला जमिनीचा आकार मनामध्ये दिसतो. हा आकार पाहण्याची, दिसण्याची मेंदूची क्षमता हे एक अद्भुत आहे. एकदा आकार दिसला की, तो आपण सपाट, द्विमितीय पृष्ठभागावर नोंदवू शकतो व आपणच ठरवलेल्या उजवे, डावे, वर-खाली आदी दिशांच्या साहाय्याने त्या आकारात तपशीलही भरू शकतो.
त्रिमित अवकाशाची नोंद, मांडणी द्विमितीय पातळीवर करायची ही आपल्या मेंदूची, हजारो वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विकसित झालेली क्षमता आहे. आपण जेव्हापासून रेखाटायला लागलो तेव्हापासून पृष्ठभाग, शक्यतो सपाट आपल्यासाठी महत्त्वाचा झाला.
आपला मेंदू व डोळे जगाच्या अनुभवांना, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाला विविध पद्धतीने साठवतात, त्यांची नोंद ठेवतात. त्यातील एक भाग अनुभवांना नकाशारूपात साठवणे हा असतो.
या नकाशारूपात आपण विचार, प्रतिमा दोन्हींचे रूपांतरण करत असतो. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा इतरही वेळी आपल्या मुद्दय़ांना त्यांचे महत्त्व व त्यांची साखळी यांच्या अनुषंगाने नकाशाप्रमाणेच मांडतो. गंमत म्हणजे अशा मुद्दय़ांच्या लिहिलेल्या शब्दांच्या नकाशांना आपण ‘माइंडमॅप’/ मनाचे नकाशे असे म्हणतो.
ज्याप्रमाणे शब्दांचे नकाशे बनवतो त्याप्रमाणे दृश्याचेही नकाशे बनवतो. म्हणजे दृश्यानुभवांना सपाट पृष्ठभागावर चित्रित करतो, नोंदतो. या प्रक्रियेत त्रिमित वस्तू काहीशा सपाट होऊन वेगळेच रूप धारण करतात. हा सपाटपणा का तयार होतो? कारण दृश्यानुभवाला विविध तपशिलांच्या साहाय्याने आपण समजतो व समजलेला अनुभव याच तपशिलांच्या काहीशा सुलभ (नकाशात्मक) मांडणीच्या रूपात काहीशा त्रिमितीचा आभास दर्शविणारी सपाट प्रतिमा या रूपात मांडतो, पुनर्रचित करतो. अशा रीतीने प्रतिमा निर्माण करणे म्हणजे ठरावीक विषयासंबंधित संवेदनांचा पट (नकाशा) तयार करणे आहे. वारली चित्रकला, लहान मुलांची चित्रे, भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत काढली जाणारी पुस्तकातली चित्रे ज्यांना कलाजगतामध्ये ‘लघुचित्र’ म्हणून ओळखली जातात. ती चित्रे, या सर्व चित्रांत प्रतिमांच्या रूपात संवेदनांचे पट तयार झालेले दिसतात. ते तयार करता यावेत म्हणून चित्रात सपाटपणा दिसतो. म्हणजे येथे चित्राची एक नवीन व्याख्या तयार होते. चित्रे म्हणजे संवेदनापट! संवेदनाचा एक प्रकारचा नकाशा!
चित्र जसे संवेदनापट असते तशा आपल्या इतर गोष्टीही संवेदनापट असतात. आपल्या जेवणाचे ताट पाहा. त्यात मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड, भात, भाकरी, पोळी, चपाती, पुरी, भाज्या, ताक-दही, वरण आदी पदार्थाची मांडणी- त्यांची जागा ठरलेली असते. ते एकमेकांत मिसळणार नाहीत याची खात्री केली जाते या मांडणीत. ज्यामुळे पदार्थाची चव-संवेदनाचा एक पट आपल्यासमोर उपलब्ध होतो. त्यांना ठरावीक क्रमाने आपण खातो. म्हणजे जेवणाची भरलेली थाळीही चित्राप्रमाणे एक संवेदनापट! पण ते असो.
चित्रे संवेदनापट असल्याने वारली चित्रे, लहान मुलांच्या बऱ्याचशा चित्रांत जमीन-आकाश अशी विभागणी नसते. चित्राच्या वरचा भाग हा हवा तर आकाश होतो आणि जमीनही भिंतीप्रमाणे सपाट होऊन आकाशाला चिकटते.
बहुतेकांची अशी अपेक्षा असते की, चित्र हे फोटोसारखे खरे खरे दिसावे, पण इथे हे समजायला पाहिजे की, चित्र हे संवेदनापट असते. त्याचे मूलभूत कार्य हेच आहे की, संवेदनांचा नकाशा तयार करण्यास मदत करणे. हे लक्षात ठेवले की, चित्ररूपी संवेदना नकाशा स्वत:च्या, चित्रकाराच्या, निर्मात्याच्या मनामध्ये प्रवेश करण्यासाठीचा नकाशा बनतो.

लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल

बहुतेकांची अशी अपेक्षा असते की, चित्र हे फोटोसारखे खरे खरे दिसावे, पण इथे हे समजायला पाहिजे की, चित्र हे संवेदनापट असते. त्याचे मूलभूत कार्य हेच आहे की, संवेदनांचा नकाशा तयार करण्यास मदत करणे..