गुंडांना नामोहरम करण्यासाठी दोन दशकांपूर्वी उगारलेले चकमकीचे हत्यार मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी म्यान केले. मुंबईतील गुंड व पोलिसांच्या चकमकी हा एकेकाळी आंतरराष्ट्रीय विषय झाला होता. ब्रिटनमधील गार्डियनने यावर विशेष वार्तापत्र प्रसिद्ध केले होते. चकमकींमुळे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडगिरीला आळा बसला नव्हता. मात्र संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी याचा धसका घेतला. कायद्याच्या मार्गाने जाऊन न्यायालयात खेटे घालण्यापेक्षा गुंडांना संपवून टाकण्याच्या या शॉर्टकटचा पोलिसांनी प्रथम उपयोग केला तो १९८३मध्ये. मन्या सुर्वे या गुंडाची गोवंडीमध्ये दहशत होती. बलात्काराचे २० गुन्हे त्याच्यावर दाखल झाले होते, पण तो जामिनावर सुटून पुन्हा महिलांना त्रास देत असे. नंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला. चर्चेचा विषय झालेली ही पहिली चकमक. ही चकमक खरी होती की बनावट याबद्दल वाद झाला असला तरी लोक मात्र पोलिसांच्या बाजूने होते. गुन्हेगारांना जबर व तात्काळ शिक्षा ठोठावण्यात येत असलेल्या सार्वत्रिक अपयशामुळे हा मार्ग लोकांना पसंत पडला. पोलिसांची प्रतिमाही तेव्हा आजच्यासारखी नव्हती. पोलीस त्या वेळी क्वचितच चकमकीचा मार्ग अनुसरत. मात्र १९९०नंतर यात फरक पडला. १९९३ ते २००३ या काळात चकमकींची संख्या एकदम वाढली. ‘चकमकफेम’ पोलिसांची टोळीच तयार झाली. सध्या तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्माने ११३ गुंडांना ठार मारले. दया नायक (८३), प्रफुल्ल भोसले (६०), रवींद्र आंग्रे (५१), अस्लम मोमीन (४०) अशी यादी वाढत गेली. या चकमकींबद्दल संशय असूनही सरकार, वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. चकमक करणाऱ्यांना पुढे सेलीब्रेटीचे स्थान मिळाले. सामान्यांचे तारणहार असा त्यांचा लौकिक झाला. वस्तुस्थिती तशी नव्हती. गुन्हेगार व पोलिसांच्या हातमिळवणीचे चकमक हे एक रूप होते. ९३च्या दंगलीनंतर दाऊदच्या टोळीतून छोटा राजन फुटला आणि दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. टोळीयुद्धाबरोबर चकमकींनाही याच काळात ऊत आला. या दहा वर्षांत तब्बल ६०० गुन्हेगार पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले. मग मात्र या प्रकाराबद्दल असंतोष प्रगट होऊ लागला. प्रथम जावेद फावडा व नंतर काही वर्षांनी ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस अडचणीत आले. काहीजण तुरुंगात गेले. गुंडांनी मानवाधिकाराचा आधार घेतला. त्यामुळे न्यायालयाला लक्ष घालावे लागले. न्यायालयाने १०० चकमकींची चौकशी करण्याचे आदेश दिले. निकाल पोलिसांच्या बाजूने लागला असला तरी न्यायालयाचे लक्ष असल्यामुळे चकमकी कमी होऊ लागल्या. चकमकफेम अधिकारीही कायद्याच्या कचाटय़ात सापडले. चकमकीकडे पूर्वी दुर्लक्ष करणारे वरिष्ठ या अधिकाऱ्यांना मदत करण्यास पुढे आले नाहीत. पोलीस दलातील नेतृत्वबदलही चकमकींना उत्तेजन देणारे नव्हते. मोक्का हे नवीन शस्त्र पोलिसांच्या हाती आले. मात्र चकमकी कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघटित गुन्हेगारी टोळ्यांची बदलती कार्यपद्धती. गुन्हेगारीतील पैसा बांधकाम क्षेत्रात गुंतवण्यास टोळ्यांच्या म्होरक्यांनी सुरुवात केली. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनाही हा मार्ग सोयीचा वाटला. गुन्हेगारांच्या व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अर्थकारणातील हा बदल चकमकींना आवर घालणारा ठरला. गुन्हेगारीतून आलेला, मग ती गुंडांची असो वा पोलिसांची, पैसा मुंबईच्या अनेक उद्योगांमध्ये गुंतलेला आहे. पोलीस व गुन्हेगार दोघेही गुंतवणुकीचा विचार करू लागल्यामुळे चकमकी अर्थहीन ठरल्या. गुन्हेगारी कमी झाली वा पोलीस कायद्याला धरून काम करू लागले म्हणून चकमकी थांबलेल्या नाहीत. त्यामागची कारणे आर्थिक आहेत. अर्थकारण बिनसले तर चकमकी पुन्हा सुरू होतील.