‘मी लेखक आहे असे मला अजूनही वाटत नाही. कादंबरी म्हणाल तर ती लिहिण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा नव्याने अर्थ शोधावा लागतो. दोन कादंबऱ्या मी लिहिल्या आहेत; पण पुढची लिहीनच असे सांगू शकत नाही. कारण ती लिहिण्यासाठी कुठल्या भावनाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिली तेव्हा ती गोष्ट सर्वाना खिळवून ठेवील हे माहीत होते, पण ती शब्दबद्ध कशी करावी याची अडचण होती. मग आंतोन चेकॉव्हचा आधार वाटला. ही कादंबरी म्हणजे माझा भाऊ, आई-वडील यांच्यावरचे अजरामर प्रेमगीत आहे. दुर्दैवी घटना कुणाच्याही आयुष्यात घडू शकते तशी माझ्या भावाच्या आयुष्यात घडली. तो तीस वर्षे अंथरुणाला खिळून होता, पण आज तो हवा होता..’ अमेरिकेत स्थायिक असलेले कादंबरीकार अखिल शर्मा  जेव्हा हे सांगतात तेव्हा कुणाच्याही जीवनात घडू शकणारी दु:खद घटना वाङ्मयीन पातळीवर त्यांनी नेऊन ठेवली, याचे आश्चर्य वाटून जाते.  एकाच वेळेस वाचकाचे हृदय विदीर्ण करणे व साहित्याचा आनंदही देणे ही टोकाची उद्दिष्टे ते साध्य करतात.
 ‘फॅमिली लाइफ’ या त्यांच्या कादंबरीस ब्रिटनमध्ये नुकताच चाळीस हजार पौंडांचा फोलिओ पुरस्कार मिळाला आहे, पण त्याआधी अमेरिकेत त्यांची पुस्तके पहिल्या दहा बेस्ट सेलरमध्ये आहेत. ‘फॅमिली लाइफ’ कादंबरीत दिल्ली ते न्यूयॉर्कमधील क्वीन्सपर्यंतचा प्रवास उलगडत गेला आहे. ते आई-वडील व भावासमवेत तेथे गेले व नंतर त्यांच्या भावाला पोहताना डोक्याला जबर जखम झाली. त्या तीन मिनिटांत त्यांचे सगळे जगच बदलून गेले. कर्तव्य आणि अस्तित्वाचा लढा यात दुभंगलेल्या तरुणाची गोष्ट त्यातून साकारत गेली.
 शर्मा हे नेवार्कमधील रुटजर्स विद्यापीठात सर्जनशील लेखन या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत २२ जुलै १९७१ रोजी झाला. नंतर ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. व्रुडो विल्सन शाळेत असताना त्यांनी जॉइस कॅरोल ओट्स, पॉल ऑस्टर, जॉन मॅक्फी, टोनी कुशनर, टोनी मॉरिसन यांच्या साहित्याचा अभ्यास केला होता. काही काळ त्यांनी बँकेत नोकरीही केली. चित्रपट कथालेखक म्हणूनही त्यांनी काम केले, पण त्यात ते रमले नाहीत. न्यूयॉर्कर, अ‍ॅटलांटिक  अशा नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. सन २००० मध्ये लिहिलेली ‘द ओबिडियंट फादर’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांना यापूर्वी पेन, हेमिंग्वे, व्हाइट रायटर्स व आता फोलिओ पारितोषिक मिळाले आहे. या सगळय़ा प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना अजोड साथ दिली आहे.