नोबेल पारितोषिक विजेते मेक्सिकन कवी-लेखक ऑक्टोव्हिओ पाझ यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या वाङ्मय कर्तृत्वाचा आणि भारतप्रेमाचा मागोवा.
‘‘माझ्या शरीराच्या नसांमधून रक्ताऐवजी कविताच वाहते आहे,’’ असे म्हणणारे नोबेल पारितोषिक विजेते मेक्सिकन कवी ऑक्टाव्हिओ पाझ हे बहुस्पर्शी आणि अनुभूतिसंपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. बालवयातच मेक्सिकन क्रांती पाहिलेले पाझ ऐन तारुण्यात स्पेनच्या यादवी युद्धात सहभागी झाले आणि नंतर दुसऱ्या महायुद्धाची दाहकताही त्यांनी अनुभवली. युद्धामुळे होणारा सर्वसंमत मूल्यांचा ऱ्हास, सर्वसामान्यांच्या मालमत्तेचे नुकसान आणि त्यांच्या आयुष्याची होणारी वाताहत व त्यातून व्यक्तिजीवनाला तसेच समाजजीवनाला आलेली उद्ध्वस्तपणाची अवकळा या सर्व विदारक घटनाक्रमाचे पाझ डोळस साक्षीदार होते.
कवी, समीक्षक, संपादक, अनुवादक, निबंधलेखक, कलामीमांसक आणि संस्कृति-अभ्यासक म्हणून मान्यता मिळविणाऱ्या पाझ यांची जागतिक राजकारणाचे भाष्यकार म्हणूनही ख्याती होती. अर्थात असे असले तरी ते मूलत: आणि अखेरत: कवीच होते. कवितेच्या निर्मितीविषयी विविध अंगांनी त्यांनी लेखन केले आहे.
ऑक्टाव्हिओ पाझ यांचा जन्म ३१ मार्च १९१४ रोजी मेक्सिको येथे झाला. पाझ यांच्यावर आरंभी डी. एच. लॉरेन्स, नित्शे, डोस्टोव्हस्की, टी. एस. इलियट यांच्या लेखनशैलीचे आणि सात्र्च्या अस्तित्ववादी विचारसरणीचे संस्कार झाले. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि आपल्या मित्रांच्या मदतीने ‘बॅरंडल’ या मासिकाचे संपादन केले. १९३३ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘वाइल्ड मून’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पाझ चिलीचे क्रांतिकारी कवी पाब्लो नेरुदा यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावले गेले. नेरुदा यांच्या सूचनेवरून १९३४ मध्ये बार्सिलोना येथे संपन्न झालेल्या ‘अ‍ॅन्टी फॅसिस्ट रायटर्स काँग्रेस’च्या अधिवेशनास पाझ उपस्थित राहिले. तेथे त्यांचा परिचय स्टीफन स्पेंडर, डब्ल्यू. एच. ऑडेन यांसारख्या प्रागतिक विचारसरणीच्या कवींशी झाला. त्यामुळे त्यांच्या काव्यनिर्मितीच्या ऊर्मी बलवत्तर झाल्या आणि साम्यवादी विचारसरणीविषयी त्यांना आकर्षण वाटू लागले. त्याची परिणती म्हणजे, पाझ नंतर स्पेनच्या यादवी युद्धात सहभागी झाले.
दोन जागतिक युद्धांच्या संधिकालात झालेले स्पेनचे यादवी युद्ध हे एका अर्थाने अपूर्ण महाभारतच होते. १९३६ मध्ये निवडणुकांद्वारे सत्ताधारी झालेल्या ‘नॅशनल फ्रन्ट’च्या विरोधात बंड करून लष्करी अधिकारी जनरल फ्रँको याने सत्ता बळकावली. त्यातून स्पेनमध्ये यादवी युद्ध उद्भवले. जनरल फ्रँकोला हिटलरच्या नाझी राजवटीने मदत केली होती, तर जगातील सर्व लोकशाहीवादी संघटना ‘नॅशनल फ्रन्ट’ला मदत करीत होत्या. या यादवी युद्धात जगातील अनेक विचारवंत, साहित्यिक आणि कलावंत सहभागी झाले होते. अर्नेस्ट हेमिंग्वे, ख्रिस्तोफर कॉडवेल, जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोस्लर, स्टीफन स्पेंडर हे प्रतिभावंत लोकशाहीच्या रक्षणार्थ स्पेनमध्ये लढले. पाझही त्यांच्यासमवेत होते. यामुळे पाझ यांच्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आणि साम्यवाद त्यांना सदोष वाटू लागली. त्याकडे अधिक डोळसपणे पाहू लागल्यावर पाझ यांच्या लक्षात आले की, स्पेनमध्ये लोकशाहीच्या रक्षणार्थ जी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली होती, तिला स्टॅलिनची मदत होती आणि तिच्यावर कम्युनिस्टांचे पूर्ण वर्चस्व होते. या विचारप्रणालीची प्रत्यक्ष व्यवहारात होणारी अंमलबजावणी तसेच मार्क्‍सवादी कलासमीक्षेतील फोलपणाही त्यांना जाणवला. कोणत्याही कलाकाराचे मूल्यमापन त्याच्या राजकीय मतांवरून न करता, त्याच्या कलाकृतीतील सखोल जीवनदर्शनावरून केले जावे, असे पाझ यांना वाटत होते. यावरून पाब्लो नेरुदांशी त्यांचे भांडण झाले. त्यामुळे पाझ यांनी नेरुदांची ‘ग्रेट बॅड पोएट’ या शब्दांत जाहीर संभावना केली. पुढे साम्यवादी विचारसरणीचाही त्याग केला.
ऑक्टाव्हिओ पाझ यांनी मुख्यत्वे स्पॅनिश भाषेत काव्यलेखन केले आणि त्यांचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध होत गेले. १९३५ ते १९५५ या काळातील त्यांची कविता ‘अर्ली पोएम्स’मध्ये ग्रथित झाली आहे. ‘पिएद्रा दे सोल’ ही त्यांची १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेली दीर्घकविता ‘सनस्टोन’ या शीर्षकाने अनुवादित झाली आहे. (तिचा दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ‘सूर्य-पाषाण’ या शीर्षकाने केलेला मराठी अनुवाद ‘सत्यकथा’च्या फेब्रुवारी १९६९च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.) ‘आगीला ओ सोल’ (१९५९) चे ‘ईगल ऑर सन’ (१९७०) हे भाषांतर उपलब्ध आहे. गद्यकाव्याचा काहीसा कालबाह्य़ झालेला रचनाबंध पाझ यांनी या कवितासंग्रहात विलक्षण ताकदीने वापरला आहे. त्यांचे ‘फ्रीडम अ‍ॅट पॅरोल’ (१९४९), ‘सालमांद्रा’ (१९५८), ‘सिलेक्टेड पोएम्स’ (१९६९) आणि ‘अल्टरनेटिंग करन्ट्स’ (१९७३) हे आणखी काही संग्रह.
संस्कृती-अभ्यासक हा पाझ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. मेक्सिकन सरकारचे राजदूत म्हणून काम करीत असताना पाझ यांनी जपान आणि फ्रान्सचे समाजजीवन व सांस्कृतिक परंपरा याविषयी लेखन केले; तर भारतात आल्यावर येथील संस्कृतीचा अभ्यास केला.  शंकर-पार्वती, श्रीकृष्ण, वेद, उपनिषदे सूत्रे, अद्वैत वेदान्त, चार्वाकाचा जडत्ववाद, संस्कृत साहित्य, शास्त्रीय संगीत, अजिंठा-वेरुळची शिल्पकला आणि उर्दू साहित्यातील सूफी संत तसेच बौद्ध वाङ्मयातील दशपारमिता यांचे सखोल व विस्तृत संदर्भ त्यांच्या लेखनात येतात. पाझ यांची ही मीमांसक दृष्टी मेक्सिकन परंपरेतील इन्का, माया आणि अ‍ॅझटेक या संस्कृतींच्या सूक्ष्म चिंतनातून आली आहे.
पाझ यांचा भारताशी प्रथम संबंध आला तो १९५२ मध्ये. भारतातील मेक्सिकोचे राजदूत एमिलिओ गील यांचे सहकारी म्हणून ते येथे आले. त्यांच्याकडे कला आणि संस्कृती विभाग होता. ते भारतीय कलाकारांना अनुदान, शिष्यवृत्ती देणे अशी कामे करीत. याच संदर्भात एका शिष्यवृत्तीसाठी त्यांनी ज्येष्ठ चित्रकार रामकुमार यांच्याऐवजी मूकबधिर चित्रकार (-आणि माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचे बंधू) सतीश गुजराल यांची निवड केली. नंतर या निर्णयामागचे कारण सांगताना पाझ म्हणाले की, सतीश गुजराल शारीरिक व्यंगावर मात करून परिस्थितीशी झगडत पुढे आले आहेत. अशीच माणसे रूढीपेक्षा काहीतरी वेगळे करू शकतात.  त्यानंतर थोडय़ाच दिवसांत मेक्सिकोला परत गेलेले पाझ १९६२ मध्ये राजदूत म्हणून भारतात परत आले. दिल्लीमधील वास्तव्यात त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाने ते प्रभावित झाले. पाझ याच सुमारास फ्रेंच वकिलातीत काम करणाऱ्या मेरी जोस त्रामिनी या महिलेच्या प्रेमात पडले आणि आपल्या निवासस्थानासमोरील कडूनिंबाच्या वृक्षाला साक्षी ठेवून हिंदू पंडितांच्या वैदिक मंत्रोच्चारात ते तिच्याशी विवाहबद्ध झाले.
१९६८ मध्ये मेक्सिकोत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धावर सरकारने केलेल्या खर्चाला विरोध करण्यासाठी तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ते दडपण्यासाठी सरकारने केलेल्या गोळीबारात सुमारे ३०० विद्यार्थी ठार झाले. या कृत्याचा निषेध पाझ यांनी गांधी जयंतीच्या दिवशी (२ ऑक्टोबर ६८) आपल्या राजदूतपदाचा राजीनामा देऊन शांतपणे व्यक्त केला.
आयुष्याच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते लिखाणात मग्न होते. त्यांनी ‘ग्लिम्पसेस ऑफ इंडिया’ (१९९७) आणि ‘इन लाइट ऑफ इंडिया’ (१९९८) या भारतविषयक ग्रंथांचे लेखन केले. भारत सोडल्यावरही पाझ यांच्या मनात भारतीयांविषयी ममत्वभावना होती. या ना त्या कारणाने ते भारतात येतच राहिले. भारतीयांनीही त्यांची योग्य ती दखल घेतली. कालिदासाविषयी नितांत आदर बाळगणाऱ्या पाझ यांना मध्य प्रदेश सरकारने उज्जनच्या ‘वागर्थ’ संमेलनास निमंत्रित केले. १९८५ साली टी शिवशंकर पिल्ले यांना ‘कॉयर’ या कादंबरीसाठी पाझ यांच्या हस्ते ज्ञानपीठ पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
भारतीय संस्कृतीतील मांगल्याप्रमाणेच अमांगल्यावरही त्यांनी प्रेम केले. त्यांची ही भावना कवितेतूनही व्यक्त झाली आहे. ‘ए टेल ऑफ टू गार्डन्स’ (१९९५) मध्ये पाझ यांच्या भारतविषयक कविता ग्रथित झाल्या आहेत. ‘इन लाइट ऑफ इंडिया’मध्ये भारतीय संस्कृती, धर्मप्रणाली आणि जातिव्यवस्था, मंदिर आणि मशिदींचे शिल्पसौंदर्य, दारिद्रय़ग्रस्त लोकजीवनातील सहिष्णुता, मनाला पारलौकिकाचा स्पर्श घडविणारा अपार्थिव निसर्ग, स्वातंत्र्यपूर्वकाळातील काँग्रेसचे राजकारण, गांधीजींचे राजकारण व पं. नेहरूंचा आधुनिकतावाद, हिंदी भाषिक कविसंमेलने आणि अज्ञेय व श्रीकांत वर्मासारख्या प्रतिभावंतांच्या सहवासात व्यतीत केलेले सुखद क्षण, याविषयी पाझ यांनी अतिशय जिव्हाळ्याने लिहिले आहे. पाझ म्हणतात, ‘‘My education in India lasted for years and was not confined to book. It has marked me deeply. It has been sentimental, artistic and spiritual education. It’s influence can be seen in my poems, prose writings and in my life itself…’’ ऑक्टाव्हिओ पाझ यांचे १९ एप्रिल १९९८ रोजी कर्करोगाने निधन झाले.
 

भालचंद्र गुजर