खेळ कसा आरामात खेळावा, खेळाचे पंच म्हणजे निर्णय देणारे म्हणून त्यांना मिळणारा आराम खेळाडूंपेक्षा अधिकच असला पाहिजे.. या खेळांबद्दलच्या आपल्या कल्पना किंवा एखादा कोणी तरी नायक यावा आणि त्यानं आपला उद्धार करावा, ही मानसिकता यांना फुटबॉलमध्ये थारा नाही.. सर्वच्या सर्व खेळाडूंना एकाच वेळी एकाच तीव्रतेनं आपला जीव खेळात ओतावा लागतो, इतकी सामाजिक नि:स्वार्थता या खेळात आहे..
हे लक्षात आलं की, कोस्टारिका किंवा कोलंबिया किंवा उरुग्वे किंवा नायजेरिया किंवा कॅमेरून किंवा इराण किंवा क्रोएशिया किंवा अल्जीरियासारखे देश फुटबॉलच्या विश्वचषकासाठी झुंजले आणि भारत नाही, याचंही उत्तर मिळू लागतं..
सध्या बहुतांश भारतीयांचे डोळे तारवटलेत. हा काळ खरं तर डोळ्याची साथ येण्याचा. पण सध्याच्या तांबटलेल्या डोळ्यांचं ते कारण नाही. तर ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फुटबॉलच्या वैश्विक उत्सवाने भारतीयांचे डोळे रक्तवर्णी केलेत. कॅमेरून, उरुग्वे, कोस्टारिका, कोलंबिया.. इतकंच काय अगदी इराणपर्यंतचे देश बराक ओबामा ते अँगेला मर्केल यांच्यापासून ते तुम्हाआम्हाला खुळावून टाकणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत होते. गेल्या महिन्यात ब्राझीलमध्ये या फुटबॉलच्या विश्वचषकाची तुतारी फुंकली गेली आणि अक्षरश: सगळं जग हातातली कामंधामं सोडून, रात्ररात्र जागत हे सामने पाहू लागलं.
किती सोपं आहे फुटबॉल समजणं. खरं तर त्यातही तांत्रिकता मोठय़ा प्रमाणावर आहे. मिड फील्डर, राइट विंगर, लेफ्ट विंगर, ऑफ साइड, कॉर्नर.. परंतु प्रत्यक्ष खेळ या सगळ्याच्या वर आहे. शत्रुपक्षाच्या ‘गोल’कक्षात चेंडू नेऊन टाकायचा हे ध्येय. मग ते साध्य होतानाचा वेग, त्यात आणले जाणारे अडथळे, यमनियमांच्या चौकटी हे सगळं सगळं बाजूला पडतं आणि उरतो तो अमाप उत्साहाचा, अफाट ऊर्जेचा विस्मयकारक उत्सव. डोळ्यांचं आणि मनाचं पारणं फेडणारा.
पण यात भारत नाही. नाही म्हणजे औषधालाही नाही.
का नसावा भारत त्यात? २०० पेक्षाही अधिक देश फुटबॉल खेळतात. त्यात हा आपला एवढा मोठा देश का नाही? चिमूटभर आकाराच्या देशांना त्यात चांगलं पसाभर स्थान आहे. मग भारताला का नाही? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधायचं तर परखड आत्मटीकेची तयारी असायला हवी. ती आहे हे गृहीत धरून पुढच्या मुद्दय़ांचा विचार करायचा..
पहिलं म्हणजे आपल्याला आळशी किंवा बश्या, प्रेक्षकी खेळात गती आहे किंवा ते आवडतात. असे खेळ ज्यात एखादाच खेळाडू चेंडू टाकत असतो, एखादाच पळत असतो, एखाद्यालाच कष्ट करावे लागतात, सहा चेंडू टाकल्यानंतर सर्वानाच विश्रांती मिळते, मध्येमध्ये पाणी, पेय पिता येतं, एकत्र जमून गप्पा मारता येतात.. थोडक्यात भरपूर उसंत असते. हे असे खेळ आपल्याला आवडतात. फुटबॉल किंवा हॉकीत असं चालत नाही. आपण फुटबॉलमध्ये कधीच नव्हतो. हॉकीत होतो, पण गती घालवून बसलो. याचं एक कारण ही आपली मानसिकता. या खेळांत जेमतेम नव्वदभर मिनिटांत जीवघेण्या वेगानं, छाती फुटेपर्यंत धावावं लागतं. तेसुद्धा एकानंच धावून चालत नाही. तर सर्वच्या सर्व संघच धावत असतो.
हे आपल्याला झेपणारं नाही.
दुसरं म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या खेळातले पंचसुद्धा कसे निवांत असतात. तासन्तास उभेच असतात. त्यामुळे ढेरपोटय़ासुद्धा आपल्याकडे आपल्याला आवडणाऱ्या खेळाचा पंच असू शकतो. फुटबॉलमध्ये तसं चालत नाही. त्या खेळातले पंच-उपपंचसुद्धा खेळाडूइतकेच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच कष्ट घेत असतात. एकाच वेळी धावायचं, चेंडूवर लक्ष ठेवायचं, खेळाडूंकडून चुका होत नाहीयेत ना ते पाहायचं आणि वर हे करता करता शिटय़ाही फुंकायच्या.. हे फारच आहे. फुटबॉलच्या सर्वसाधारणपणे एका सामन्यात एक पंच किती किलोमीटर धावत असेल? तब्बल १२ किमी! हे असं करायचं तर त्यासाठी सुपाएवढीच फुप्फुसं लागतात. ती काही आपली नाहीत किंवा तशी ती व्हावीत अशी आपली इच्छाही नाही. त्यामुळे आपण खेळत बसतो निवांत चालणारे खेळ. याचा परिणाम असा की फुटबॉलच्या क्षेत्रात भारतीय खेळाडू तर नाहीतच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले पंचसुद्धा नाहीत.
तिसरा मुद्दा. तो आपल्या क्रीडा मानसिक तेशी निगडित आहे. तो असा की, फुटबॉलसारख्या खेळात एक प्रकारचा नि:स्वार्थीपणा लागतो. अकराच्या अकरा खेळाडूंना सारख्याच प्रमाणात जीव ओतावा लागतो. एकानंच विक्रमांची थडगी रचत बसायची आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या हे फुटबॉलमध्ये चालत नाही. त्यामुळे एकच कोणी तरी थोर आहे म्हणून संघ वर्षांनुर्वष आपलं मोठेपण मिरवू शकलाय असं होत नाही फुटबॉलमध्ये. आता अकरा खेळाडूंच्या संघात एखाददुसरा इतरांपेक्षा उजवा असतो, पण म्हणून अन्य दहा जण सुमार असले तरी चालतंय असं फुटबॉलमध्ये होत नाही. हेही आपल्याला झेपत नाही. कारण एखादा कोणी तरी नायक यावा आणि त्यानं आपला उद्धार करावा ही आपली मानसिकता. त्यामुळे आपलं समाजमन पटकन अनुयायीपद स्वीकारणारं. एखाद्याला नायकत्व दिलं की आपण मम म्हणायला रिकामे, चांगलं काही झालं तर ते नायकामुळे आणि आपटलोच तर त्या पापाचं पितृत्व लादायलाही आपल्याला नायक आहेच. फुटबॉलमध्ये अर्थातच हे परवडणारं नाही. सर्वच्या सर्व खेळाडूंना एकाच वेळी एकाच तीव्रतेनं आपला जीव खेळात ओतावा लागतो. इतकी सामाजिक नि:स्वार्थता आपल्यात नाही, हे आपण मनातल्या मनात तरी मान्य करायला हवं.
मुद्दा चार. आपलं आपल्या शरीरावर प्रेम नाही. देश म्हणून भारत हा शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्तांचा देश नाही. आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या कंबरेचा घेर कोणत्याही चापल्याचा निदर्शक नाही. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम’.. वगैरे आपण म्हणतो, पण सुटलेली पोटं हे आपण स्वास्थ्याचं लक्षण मानतो. आपला सरासरी भारतीय हा पोटाळलेला असतो. चुस्त, लवचीक शरीरयष्टी ही फक्त तरुणांनाच आवश्यक आहे असं बहुधा आपल्याकडे मानलं जातं. त्यामुळे भारतीय म्हणून आपल्या शरीरबोलीत सरसकट एक राष्ट्रीय बेंगरूळपणा दिसतोच दिसतो. आंतरराष्ट्रीय नागरिकांच्या मेळ्यात एखादा भारतीय त्वचेच्या रंगापेक्षाही त्याच्या देहबोलीमुळे अधिक लवकर ओळखला जातो. वास्तविक स्थूलत्वाचा आजार अनेक देशांना भेडसावतोय. अमेरिका तर त्यातली सर्वात व्याधिग्रस्त आहे, पण तिथे तो आजार म्हणून आहे. सर्वसामान्य सरासरी लक्षण म्हणून नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या कंसात अडकले तरी तिकडे सर्वसामान्यांच्या जीवनेच्छा सर्वार्थाने प्रबळ असतात आणि चला आता आपलं काय राहिलंय.. असे दांभिक सुस्कारे तिकडे सोडले जात नाहीत. आता याचा फुटबॉलशी काय संबंध, असा प्रश्न काहींना पडेल. संबंध हा की कोणत्याही देशाचा खेळ हा त्या देशाच्या सामुदायिक मानसिकतेशी निगडित असतो. त्यामुळे जशी आपली मानसिकता, तसे आपले खेळ.
पुढचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा. तो हा की आपला खेळांमधला सर्व भर हा एखाद्याच्या कौशल्यावर रेटून नेण्यावर असतो. खेळाशी संबंधित एकाच बाबतीत नव्हे तर सर्वच क्षेत्रांत गुणवत्ता कमीअधिक का असेना असायला हवी असं आपल्याला वाटत नाही. उदाहरणार्थ एखादा उत्तम फलंदाज असेल तर त्याचं क्षेत्ररक्षण यथातथाच असलं तरी आपल्याकडे खपून जातं. आपल्या कित्येक विक्रमवीरांना कंबरेत वाकताना किती अवघड वाटतं याचं प्रत्यक्षदर्शन आपण अनेकदा घेत असतोच.  
काही जण या संदर्भात आपल्याकडे सोयीसुविधा नाहीत, उत्तम मैदानं नाहीत वगैरे सबबी सांगतील, पण ती अगदीच लटकी. कोस्टारिका किंवा कोलंबिया किंवा उरुग्वे किंवा नायजेरिया किंवा कॅमेरून किंवा इराण किंवा क्रोएशिया किंवा अल्जीरिया.. किंवा आणखी काही देशांत काय या सुविधा आहेत की काय?
 तेव्हा सुविधांचा प्रश्न नसतो. त्या दुय्यम असतात. मूळ असते ती प्रेरणा. ती असू शकते गतीची, चापल्याची, आश्वासक देहबोलीची आणि त्याहूनही अधिक सांघिक भावनेची. ती नसेल तर सुविधा असल्या काय आणि नसल्या काय.. फार काही फरक पडत नाही.
तशा प्रेरणा आपल्यात आहेत का, हा खरा प्रश्न आहे.