भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध मोठे विचित्र आहेत. या दोन्ही देशांच्या सीमेवरून एकाच वेळी कबुतरेही सोडली जातात आणि तोफगोळेही. ही आजची परिस्थिती नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी झालेली आहे. पण त्याचा ‘अडसर’ दोघांनाही वाटत नाही. गेल्या वर्षभरात तर या दोन्ही देशांदरम्यान ‘लघुलढाई’च सुरू आहे. पाकिस्तानमधील एको वृत्तवाहिनीनुसार गेल्या वर्षी या दोन्ही देशांनी मिळून ६६५ वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात भारताने केलेल्या शस्त्रसंधीभंगाच्या घटनांची संख्या ४१५ होती, तर पाकिस्तानची २५० होती. म्हणजे दुप्पट वेळा भारताने पाकिस्तानची कुरापत काढली. अर्थात हा पाकिस्तानी वाहिनीचा दावा आहे, आणि असे दावे हा मानसिक युद्धाचा- सायवॉरचा भाग असतो. ‘राइट ऑर राँग, माय कंट्री’ हा या युद्धाचा पहिला नियम असतो. त्यामुळे तेथे नेहमीच दुसरा देश कसा युद्धखोर आणि अत्याचारी आहे हे दाखविले जाते. असे असतानाही भारताचे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी आपल्या पत्रकार परिषदेत याच आकडेवारीच्या हवाल्याने या दोन्ही देशांदरम्यान ‘मिनीवॉर’ सुरू असल्याचे म्हटले, ही बाब मोठी बोलकी आहे. पाकिस्तानच्या जीओ टीव्हीनुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात भारतीय जवानांनी एका पाकिस्तानी अधिकाऱ्यासह दहा सैनिकांना कंठस्नान घातले. याचा उल्लेखही लष्करप्रमुखांनी मोठय़ा अभिमानाने केला. या कृत्याबद्दल त्यांनी आपल्या जवानांची जाहीररीत्या पाठही थोपटली. एरवी प्रसारमाध्यमांपासून अशा घटना झाकून ठेवल्या जातात आणि शत्रुराष्ट्राने काढलेल्या प्रत्येक कुरापतीला मोठे स्वरूप दिले जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणाची ती गरज असते. या वेळी मात्र लष्करप्रमुख आक्रमक झालेले दिसले. पाकिस्तान जर कायदे आणि नियम पायदळी तुडवत असेल, तर आम्हीही गप्प राहणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या सर्व गोष्टींचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. गतवर्षी ८ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून एका जवानाचा शिरच्छेद केला. त्या घटनेमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये अजूनही संतापाची भावना आहे. पाकिस्तानी फौजा अशी सैतानी कृत्ये करतात आणि भारतीय फौजा हाताची घडी घालून बसतात, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. येथील सनसनाटीप्रेमी वृत्तवाहिन्यांनी त्यात तेलच ओतण्याचे काम केले. या घटनेनंतर पाकिस्तानच्या अशा प्रत्येक कृतीला कडक प्रत्युत्तर द्यावे असे जनरल विक्रमसिंग यांनी आपल्या अधिकाऱ्यांना बजावले होते. तरीही गेल्या ६ ऑगस्टला पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून तिखट प्रत्युत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे चिडलेल्या विक्रमसिंग यांनी तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. त्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये भारतीय जवानांनी दहा पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. या घटनेकडे लष्करप्रमुखांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणूनच पाहता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या सशस्त्र दल (विशेषाधिकार) कायद्यातील कलमे मवाळ करण्यासही त्यांनी विरोध दर्शविला आहे. दरवर्षी हिवाळा संपून काश्मीरमधला बर्फ वितळू लागला की पाकिस्तानच्या सीमेवरील कारवायांना ऊत येतो. तशात यंदा याच काळात निवडणुका आहेत. अशा वेळी कोणीही सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही हात बांधून बसणार नाही, हे पाकिस्तानला नीटच बजावणे गरजेचे होते. त्याचबरोबर भारतीय नागरिकांच्या मनातील लष्कर आणि सरकार यांच्या भूमिकेबद्दलचे अपसमज दूर होणेही आवश्यक होते. ते काम लष्करप्रमुखांच्या या सिंहगर्जनेने केले. वार्षिक लष्करदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतील लष्करप्रमुखांच्या वक्तव्याचा हाच अर्थ होता.