दोनपाच जागांसाठी टिनपाट नेत्यांना आयात करणाऱ्या भाजपला मतदारांनी चपराक लगावली. पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून देताना नारायण राणे वा राजेंद्र दर्डा वा कृपाशंकर या अकार्यक्षमांना घरी पाठवून त्यांनाही दणका दिला. राष्ट्रवादीचा वारू रोखला, मनसेला साफ केले आणि शिवसेनेचे पंख कापले.. अशा तऱ्हेने मतदारांच्या रेटय़ामुळे सगळेच जमिनीवर आले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शर्यतीत कधीच नव्हते. त्यांचे उद्दिष्ट होते किमान लज्जारक्षण. ते त्यांनी काही प्रमाणात का होईना साध्य केले, असे म्हणावे लागेल. ही निवडणूक मुख्यत: दोन पक्षांबाबत होती. भाजप आणि शिवसेना. यांतील भाजपला या निवडणुकीने बरेच काही दिले आणि शिवसेनेकडून बरेच काही काढून घेतले. तेव्हा या दोन पक्षांच्या यशापयशाचा जमाखर्च मांडत असताना अन्यांचे या निवडणुकीत काय झाले, याचा आढावा घेणे या निमित्ताने आवश्यक ठरते.    

या निवडणुकीत भाजपसाठी केवळ सत्ता आणणे हेच महत्त्वाचे नव्हते. ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावर जे काही करू पाहत आहे, त्यासाठी लक्षणीय होती. भाजप देश पातळीवर एक केंद्रीय पक्ष म्हणून उदयास येऊ इच्छितो. काँग्रेसच्या ऱ्हासामुळे नाहीसे झालेले हे मध्यवर्ती स्थान मिळवणे हे भाजपचे लक्ष्य होते.पंजाबातील अकाली, हरयाणातील हरयाणा विकास पक्ष आदी बांडगुळांना भाजप अंगाखांद्यावर वाढवत असल्यामुळे त्यांना दूर करणे हे भाजपचे उद्दिष्ट होते. या प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केल्यामुळे भाजपचा प्रभाव पसरण्यास मदत झाली हे खरे असले तरी हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या गळ्यातील धोंड बनून गेले होते. या संदर्भात काँग्रेसचे जे झाले ते आपले होऊ नये, असा भाजपचा विचार होता. एके काळी सोयीच्या राजकारणाचा भाग म्हणून काँग्रेसने या प्रादेशिक पक्षांना खतपाणी घातले होते. पुढच्या काळात अखेर याच प्रादेशिक पक्षांचा फास गळ्याला बसून काँग्रेसचे अस्तित्व अनेक राज्यांतून संपुष्टात आले. भाजप ही चूक टाळू पाहत होता. तसे करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे शिवसेना. नव्वदीच्या दशकात हिंदुत्वाची भगवी कफनी चढवल्यापासून शिवसेना ही भाजपच्या मार्गातील मोठा अडथळा ठरत होती. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत सेनेची अडचण भाजपने सहन केली. कारण तोपर्यंत काही आमदार-खासदार निवडून आणण्याची क्षमता शिवसेनेत होती. त्यांच्या निधनाबरोबर सेनेच्या या ताकदीचाही ऱ्हास झाला. परंतु ती शक्ती राजकीय पदाबरोबर आपल्याला वारसाहक्काने मिळाली असल्याचा भास बाळासाहेबांच्या उत्तराधिकाऱ्यांना झाला. त्यात गेल्या निवडणुकीतील नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेचेही दीड डझनभर खासदार निवडून आले. त्यामुळे ती शक्ती आपलीच, असे सेनेस वाटू लागले. त्यातूनच भाजपशी विधानसभा निवडणुकीत युतीची चर्चा करताना मुख्यमंत्रिपद आणि १५० जागांवर सेना अडून बसली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात सेना-भाजपची युती होऊ शकली नाही. या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर येणार म्हणजे येणार आणि सेनेचाच मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार अशा बाळासाहेबी थाटाच्या अनेक घोषणा सेनेतर्फे दिल्या गेल्या. लोकांनी त्याला किती किंमत दिली हे कालच्या निकालाने दिसून आले. या निवडणुकीत धडा शिकायची वेळ एकटय़ा सेनेवरच आली असे नाही.    
मतदारांनी भाजपलादेखील या निवडणुकीतून मात्रेचे वळसे चाटवले. एका बाजूला हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाभिमुख धोरणे, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि एकूणच विकासाचे राजकारण याचे भांडवल करीत होता. काही प्रमाणात ते खरेही होते. परंतु आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमाच्या अगदी विरुद्ध स्थानिक भाजप नेत्यांचे वागणे होते. लोकांसमोर जाताना भाषा विकासाची करायची आणि त्याच वेळी बबनराव पाचपुते आदी पन्नासभर गणंगांना राष्ट्रवादी वा काँग्रेसमधून आपल्या पक्षात घ्यायचे असे भाजपचे दुटप्पी धोरण होते. त्याचमुळे ज्यांना हातभर लांब ठेवायला हवे अशा अनेक भुक्कड नेत्यांना भाजपने निवडणुकीच्या तोंडावर दत्तक घेतले. अशा अनेक मान्यवरांना मतदारांनी घरी पाठवले, ही एक समाधानाची बाब. भाजपचे एकनाथ खडसे वा नव्या नवलाईच्या पंकजा मुंडे हे जणू आपले सरकार आलेच, अशा थाटात वावरत होते. मतदारांनी त्यांनाही भानावर आणले.     
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे मोठय़ा प्रमाणावर बिहारीकरण होऊ लागले होते. राज्यातील अनेक प्रांत हे वेगवेगळ्या नेत्यांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती होती. त्यातूनच महाराष्ट्रात एक प्रकारची सुभेदारी तयार झाली होती. राज्यातील अनेक मतदारसंघांतून या सुभेदारांना मतदारांनी लाथाडले. नारायण राणे, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, सचिन अहिर आदी अनेकांना दणकून पराभव पत्करावा लागला. हे उत्तम झाले. याचे कारण असे की ही नवी सुभेदारी राज्याच्या विकासास मोठीच अडथळा ठरू लागली होती. एखादा मोठा उद्योग असो की सरकारी योजना. या नव्या सुभेदारांना आपल्या बाजूला घेतल्याखेरीज कार्य करणे ना उद्योगांना शक्य होत असे ना खुद्द सरकारला. हे सुभेदार अनेक ठिकाणी अनेकांना डोईजड होऊ लागले होते. त्यांना मतदारांनीच झटका दिला ते बरे झाले.
असा सणसणीत झटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आल्यापासून या पक्षाचे आणि त्यातही विशेषत: राज ठाकरे यांच्या रथाचे चाक जमिनीपासून चार बोटे वर होते. या निवडणुकीच्या निकालामुळे ते चार बोटे जमिनीत रुतेल. मनसेचा वैधानिक चेहरा असलेले नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आदींना मतदारांनी मनसेच्या बालेकिल्ल्यातच धूळ चारली.  केवळ एकच आमदार निवडून आल्याने या पक्षाला आता महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू पिंट्र बाजूला ठेवून स्वत:चे अस्तित्व कसे जिवंत ठेवायचे याची ब्लू पिंट्र तयार करावी लागेल. या पक्षावर ही अवस्था आली कारण राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षाला कोणताही कार्यक्रम दिला नाही. सुरुवातीला हाती घेतलेला मराठी अस्मितेचा मुद्दादेखील मनसे राखू शकली नाही. टोलच्या धोरणाबाबतही तेच झाले. आपले आंदोलन टोल रद्द झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असा सुरुवातीला त्यांचा आवेश होता. त्याचीही हवा गेली आणि राज्यातील टोलवसुलीही चालूच राहिली. तेव्हा एक गंभीर राजकीय पक्ष म्हणून उदयास यावयाचे असेल तर हा धोरणसातत्याचा अभाव मनसेला सोडावाच लागेल. अन्यथा जितक्या वेगात त्या पक्षाची वाढ झाली, त्याच्या दुप्पट वेगात तो प्रभावहीन होईल.    
हे असे सर्वच पक्ष वा नेत्यांना जागा दाखवून देणे हे या निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणता येईल. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी वा भाजप वा सेना आणि मनसे. मतदारांनी समप्रमाणात सर्वानाच धडा शिकवला. दोनपाच जागांसाठी टिनपाट नेत्यांना आयात करणाऱ्या भाजपला मतदारांनी चपराक लगावली, पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून देताना नारायणे राणे वा राजेंद्र दर्डा वा कृपाशंकर या तद्दन अकार्यक्षमांना घरी पाठवून मतदारांनी त्यांनाही दणका दिला, राष्ट्रवादीचा वारू रोखला, मनसेला साफ केले आणि शिवसेनेचे पंख कापले. अशा तऱ्हेने मतदारांच्या रेटय़ामुळे सगळेच जमिनीवर आले.     
राजकारण असो वा समाजकारण. या क्षेत्रात वावरताना संवाद तुटेल असे काही करायचे नसते. तोच तुटला तर पुढे अनवस्था प्रसंग ओढवतो. मतभेद झाले तरी पुढे कधी तरी मनोमीलनाची गरज भासेल ही शक्यता नाकारायची नसते. त्यामुळे पुढे जाताना मागचे सगळेच दोर कापायचे नसतात. या निवडणुकीत अनेकांना हे भान राहिले नाही आणि मतभिन्नता आणि शत्रुत्व यातील सीमारेषा पुसली गेली. त्यातूनच ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे संसार केला आणि पुढेही करावा लागेल अशांचे वर्णन अफझलखानाची फौज आदी भडकपणे केले गेले. आता त्याच अफझलखानाचे भूत अनेकांना आपल्या मानगुटीवर वाहावे लागणार आहे.