व्यक्तीपेक्षा व्यवस्थेस महत्त्व देण्याची संस्कृती आपल्याकडे रुजली नाही, याचा अनिष्ट परिणाम आज लोकशाहीच्या चारही स्तंभांवर तसेच जगण्याच्या अन्य क्षेत्रांतही दिसतो. या संदर्भात, देशातील संस्थात्मक जीवनाचा ऱ्हास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी असल्याचे गोविंदराव तळवलकर यांनी केलेले निदान गांभीर्याने घ्यावयास हवे..
देशातील संस्थात्मक जीवनाचा ऱ्हास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी असल्याचे सव्यसाची, व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर यांनी केलेले निदान पुरेशा गांभीर्याने घ्यावयास हवे. महाराष्ट्रात अशा संस्थात्मक जीवनाची पायाभरणी करणारे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाचा स्वीकार करताना तळवलकर यांनी हे आपले परखड, तरीही हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोगताचे स्वैर संकलन आम्ही आजच्या अंकात अन्यत्र देत असून सुजाण वाचकांना ते मननीय वाटेल. तळवलकर हे त्यांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात संस्थांची उभारणी होतानाचे साक्षीदार होते आणि हे संस्थात्मक अध:पतनही त्यांना पाहावे लागले. त्यामुळे त्यांचे विवेचन अधिक महत्त्वाचे ठरते. त्यात ज्या व्यासपीठावरून आणि ज्यांच्या साक्षीने ते व्यक्त झाले ते पाहता तळवलकर यांचे स्वगत एका अर्थाने शोकात्मही ठरते. ही शोकांतिका जशी व्यक्तीपेक्षा व्यवस्था मोठी आहे असे मानणाऱ्यांची तशीच या राज्याची आणि देशाचीदेखील.
तळवलकर यांनी ढासळत्या संस्थात्मक कालखंडाविषयी चिंता व्यक्त केली ती यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या संस्थेच्या व्यासपीठावरून. महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाची मुहूर्तमेढ रोवली ती यशवंतरावांनी. राज्याची निर्मिती झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांनी स्थापन केलेले औद्योगिक विकास महामंडळ असो वा साहित्य संस्कृती मंडळ वा मराठीतून विश्वकोशनिर्मिती असो. महाराष्ट्राचा सर्वागीण विकास होण्यास यामुळे मदत झाली. अन्य राज्यांप्रमाणे उद्योगांसाठी जमीन हस्तांतराच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रात दंगेधोपे झाले नाहीत याचे कारण यशवंतरावांनी जन्माला घातलेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या संकल्पनेत आहे. शहरांच्या आसपासची नापीक जमीन हस्तगत करून औद्योगिक विकासासाठी ती वापरायची हा त्यामागील विचार. मुंबईलगतच्या ठाणे वा पुणे परिसरात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक विकास होऊ शकला तो या औद्योगिक विकास महामंडळाच्या रचनेमुळे हे विसरून चालणार नाही. यशवंतराव विचाराने रॉयिस्ट. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बॅ. वि. म. तारकुंडे, गोवर्धन पारीख आणि गोविंदराव तळवलकर यांना जोडणारा हा आणखी एक समान धागा. कठोर तार्किकता आणि विवेकी बुद्धिवाद हे या रॉयिस्टांचे बलस्थान होते. यशवंतरावांच्या राजकारणात त्याचे प्रतिबिंब दिसते आणि त्यामुळे त्यांनी उभारलेल्या संस्थांतूनही त्याची प्रचिती येते. दुर्दैवाने यशवंतरावांना पं. नेहरू यांच्यानंतरच्या काँग्रेसमध्ये व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेस तोंड द्यावे लागले आणि तेव्हापासून त्यांचा उतरणीचा काळ सुरू झाला. यशवंतरावांना अनुयायी पुष्कळ मिळाले. किंबहुना अनेकांना आपण यशवंतरावांचे अनुयायी आहोत असे सांगण्यास आवडते. परंतु यातील बव्हंश अनुयायांनी यशवंतरावांचा उपयोग काँग्रेसमधील हा विरुद्ध तो या राजकारणापुरताच केला, ही वस्तुस्थिती नाकारणे अवघड जावे. शरद पवार हे त्यांच्या आघाडीच्या अनुयायांपैकी एक. पवार यांनी त्यांच्या पातळीवर निश्चितच संस्थात्मक उभारणीस महत्त्व दिले. परंतु ते ज्या राजकीय व्यवस्थेचा भाग होते ती व्यक्तिकेंद्रितच होती. परिणामी तिचा त्याग करून पवार यांनी आपली स्वत:ची वेगळी चूल मांडली. परंतु आज तीदेखील व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेसाठीच ओळखली जाते, यास काय म्हणावे? पवार यांनी राजकारणाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांत अनेक संस्था उभ्या केल्या. परंतु त्या ज्यांच्या हाती दिल्या त्यातील सर्वच व्यक्ती या पवार यांच्याशी बौद्धिक नाते सांगणाऱ्या आहेत असे म्हणता येणार नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखा एखादाच त्यात अपवाद. एरवी सर्वच संस्थांत साहेब वाक्यं प्रमाणम हीच परिस्थिती असून हे का आणि कसे होते याचा विचार करण्याएवढी उसंत आणि गरज पुढच्या काळात पवार यांना राहिली नाही.
आपल्याकडे हे असे वारंवार होताना दिसते कारण व्यक्तीपेक्षा व्यवस्थेस महत्त्व देण्याची संस्कृती आपल्याकडे रुजली नाही हे आहे. युरोपात चौदाव्या शतकात रेनेसाँनंतर मानवी प्रतिभेने जगण्याच्या अनेकांगांना स्पर्श केला. संस्कृती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. दुर्दैवाने असा सर्वव्यापी रेनेसाँ आपल्या वाटय़ास कधीच आला नाही. या भूमीत जी समाजप्रबोधनाची व्यापक चळवळ उभी राहिली ती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कोळपून गेली. पुढे युरोपीय संस्कृतीचा दाट प्रभाव असलेल्या पं. नेहरूंनी जे काही केले तेवढेच. नंतर मात्र सगळे राजकारण एका व्यक्तीभोवतीच फिरले. त्यामुळे संस्थात्मक जीवनास अवकळा आली. अशा परिस्थितीत व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यापेक्षा कोणा व्यक्तीच्या खांद्यावर डोके ठेवून त्याकडे तारणहार म्हणून पाहणे भारतीय समाजास अधिक सुलभ वाटू लागले. त्याच्या जोडीस निष्क्रियतेस उत्तेजन देणारे आपले जीवन चिंतन. सर्व काही रसातळास गेल्यावर आणि धर्माला ग्लानी आल्यावर संभवामि युगे युगेच्या आश्वासनावर विसंबून स्वत: हातावर हात ठेवून बसण्यातच आपणास रस. आपले पुनरुत्थान करणारा मग कधी जयप्रकाश नारायण असतो तर कधी अण्णा हजारे. सचिन तेंडुलकर हा निसर्गनियमानुसार निवृत्त होण्याने अनेकांना अनाथ झाल्यासारखे दु:ख होते ते यामुळेच. परिणामी विवेकाच्या आधारे कार्य करणाऱ्या संस्थांची उभारणी आपल्याकडे होऊच शकलेली नाही, हे वास्तव नाकारणार कसे? त्यात ज्यांच्या हाती संस्थात्मक अधिकार असतात त्यांनी त्या कर्तव्याचे पालन न करणे हेदेखील आपल्या प्रगतीच्या आडच आले. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे उदाहरण देता येईल. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा मुखत्यार. मंत्र्यांच्या सर्व निर्णयांची जबाबदारी त्याच्या शिरावर असते. परंतु मनमोहन सिंग यांच्या काळात मंत्रिगटांचेच स्तोम आले आणि या मंत्रिगटांनी घेतलेले निर्णय हेच मंत्रिमंडळाचे निर्णय असे मानण्याचा प्रघात पडला. मंत्रिगटाचे हे निर्णय अंतिम मंजुरीसाठीदेखील पंतप्रधानांसमोर येणे त्यामुळे बंद झाले. परिणामी पंतप्रधान या संस्थेचे मूल्य अधिकच घसरले. वास्तविक हे अयोग्य आहे. परंतु आपल्या व्यक्तिकेंद्रित समाजव्यवस्थेत यावर टीका होण्याऐवजी पंतप्रधानांच्या निरिच्छतेचे कौतुक झाले. व्यक्तिगत पातळीवर जगताना असे निरिच्छ असणे नक्कीच कौतुकास्पद. परंतु देशाचे नियंत्रण करणारी संस्था हाताळताना असा निरिच्छपणा असणे म्हणजे जबाबदारी झटकणे होय. परंतु हे दोषदिग्दर्शन झाले नाही. कारण सिंग यांचे मूल्यमापन करताना विवेकाला रजा देण्यात आली.
तळवलकरांच्या काळात असे दिशादर्शन माध्यमांनी करणे अपेक्षित असे. ही विवेकी अलिप्तता ही तळवलकरकालीन पत्रकारितेचा कणा होती. परंतु आज परिस्थिती अत्यंत उलट झाली असून देशातील विवेकशून्यांत माध्यमांचा क्रमांक बराच वरती लागावा. ज्यांनी तटस्थ राहावयाचे तेच आता राजकीय पक्ष वा नेत्यांच्या समोर हात बांधून उभे राहण्यात वा त्या पक्षांची वकिली करण्यात धन्यता मानू लागले आहेत. सत्तासान्निध्यामुळे मिळणारी सत्तेची ऊब ही आपलीच निर्मिती असल्याचे या माध्यमवीरांना वाटू लागले असून राज्यसभेची उमेदवारी आदी मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट बनले आहे. तळवलकरांच्या काळात अशा व्यक्तिगत आशाअपेक्षा ठेवणारे पत्रकार नव्हते तसेच त्यांना उत्तेजन देणारे राजकारणीदेखील नव्हते. त्यामुळे राजकारण आणि वर्तमानपत्रे या दोन्ही संस्थांचे तसे बरे चालले. ज्याविषयी तळवलकर अस्वस्थता व्यक्त करतात तो संस्थापतनाचा काळ नंतरचा.
अशा प्रसंगी प्रसिद्धीपासून दूर राहत.. दास डोंगरी राहतो.. अशा संन्यस्त वृत्तीने संस्थांत्मक उभारणीच्या कार्यात झोकून देणाऱ्यांना उत्तेजन देणे ही काळाची गरज आहे.