सईद अख्तर मिर्झा यांचे हे दुसरे पुस्तक! जाहिरात संस्थेतर्फे कॉपी रायटिंगपासून सुरू केलेला प्रवास. पुढे सिनेमा दिग्दर्शन, डॉक्युमेंटरी बनवणे यात बरीच वर्षे स्थिरावला. त्यांच्या सिनेमा वा माहितीपटांमागे त्यांचे विचार वा ठाम भूमिका असलेली कळायची. त्यांचा भरपूर प्रवास झाला, त्या प्रदेशाचा इतिहास समजून घेता आला. या प्रवासात त्यांना आढळले की युरोपात स्पेनवर राज्य केलेल्या मूर राजवटीच्या दोनशे वर्षांच्या इतिहासाला युरोपच्या इतिहासातून हद्दपार करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर स्पेनमध्ये त्यावर कट वाटेल एवढी मुग्धता पाळण्यात येते. त्याचबरोबर सत्य हेही आहे की मध्ययुगीन इस्लामी संस्कृती चारी बाजूने ज्ञान गोळा करीत, त्यात स्वतची भर घालत चांगलीच समृद्ध झाली होती. इस्लामचा जन्म ज्यू व ख्रिस्ती धर्माच्या परिसरातच झाला होता व त्याची सुरुवातीची वाढही त्याच परिसरात झाली. अनेक ज्यू व ख्रिस्ती रीती इस्लामला मान्य आहेत. उदा. हलाल व ज्यूंची कोशेर रीत. पूर्वेकडील स्वाऱ्यातून त्यांनी दौलतीबरोबरच इकडले ज्ञानही नेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. वादासाठी जरी हे म्हटले की त्या वेळी युरोपात रानटी व भटक्या जमाती अस्तित्वात  होत्या त्यांना या ज्ञानाचे वावडे होते. तरी तेही तेवढेसे खरे नाही, कारण ख्रिस्ताच्या पूर्वीही रोमन व ग्रीक या सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध राजवटी होऊन गेल्या होत्या. त्यामुळे त्याच परिसरात येणाऱ्या ज्ञानापासून ते फटकून राहिले असल्याचा संभव कमी. मूर राजवटीच्या काळात तर इस्लामिक साम्राज्य सर्वच दृष्टीने कळसास पोचले होते. त्यामुळे सर्व ठिकाणाहून गोळा होणारे ज्ञान तिथे पोहचत होते. त्यामुळे संपूर्ण युरोपात रोमन चर्चची सत्ता प्रस्थापित झाल्यावर, युरोपीय रेनेसान्स हा स्वयंभू होता. फार फार तर त्याने रोमन व ग्रीक संस्कृतीकडून थोडेफार घेतले असेल अशा तऱ्हेचा खोटारडेपणा युरोपीय सत्तांकडून झाला. सर्व जगाला त्यांनी आपल्या ताब्यात ठेवल्याने तो बराच काळ चाललाही. सईद याचे म्हणणे असे आहे की जग हे देवाणघेवाणीवर चालते. नंतरच्या काळात आपणही युरोपकडून खूप शिकलो परंतु त्यांचे आत्ताचे ज्ञान कुठेतरी त्यांनी पूर्वी आपल्याकडून घेतलेल्या ज्ञानाच्या पायावर आधारित आहे हे कबूल करावे. परंतु ते कबूल केले तर गोऱ्या माणसाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना सुरुंग लागेल. या पुस्तकाद्वारे सईद मिर्झा यांनी या भ्रामक कल्पनांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.
या खटाटोपामागचे मुख्य कारण म्हणजे ते म्हणतात की, ‘मला नेहमीच माणसा माणसांमध्ये िभती उभ्या करणाऱ्या कल्पनांचा तिटकारा वाटत आला आहे. अशा कल्पना, ज्या माणसांच्या मनात हळूहळू झिरपत जातात व स्वत:च्या भूतकाळाविषयी अवास्तव चित्र उभे करतात. त्यामुळे त्याची वर्तमानकाळाकडे बघण्याची दृष्टीही तिरपागडी होते. एक प्रकारची अदृश्य भिंतच माणसांच्या मनात उभी राहते व मग माणसांतील मनमोकळा संवाद अशक्य होऊन बसतो.’ हे  स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर माहिती त्यांनी गोळा केली आहेच, परंतु जो आकृतिबंध स्वीकारला आहे तो त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे. तीन कादंबरी आहे की इतिहास आहे हे वाचकाने ठरवायचे आहे. यातील काही माणसे ऐतिहासिक आहेत. जसे इब्न सीना अथवा अबू रेहान अल् बेरुनी जे भारतीयांना चांगले परिचयाचे आहेत. शिवाय इतिहासकार इब्न खालदुन, अल् खातिमी. ही माणसं कधी पात्र म्हणून डोकावतात तर काही कधी-कधी संदर्भ म्हणून पुढे येतात. अमेरिकेत शिकणारे चार वर्गमित्र एका अविचारी शेऱ्यामुळे भूतकाळाचा शोध घेण्यास प्रवृत्त होतात. त्याचबरोबर अबू रेहान व त्यांची शिष्या रेहाना हिची मध्ययुगीन कथा आकार घेते व मधूनच लेखकाचे स्वगत आहे. अशा चार स्तरांवर ही कादंबरी अथवा गोष्ट पुढे सरकते. हे चार मित्र चार देशांचे प्रतिनिधित्व करतात. ओमर मोरक्कोचा आहे, संदीप बोस भारतीय आहे, स्टीवन दक्षिण आफ्रिकेचा निग्रो आहे तर लिंडा अमेरिकन आहे. ती या चौघांची चांगली मैत्रीण आहे व हळूहळू ओमरच्या प्रेमात गुरफटत आहे. हे चौघे इतिहासातील पाळंमुळं शोधून एकमेकांशी चर्चा करीत आहेत. रेहाना ही ज्ञानाची लालसा असणारी मध्ययुगीन स्त्री आहे. तिच्या शिक्षणाला वडिलांचे व नवऱ्याचे प्रोत्साहन आहे. परंतु लग्न करून ती खिलजीला येते. तिथले वातावरण तिला अनुकूल नाही. तिच्या सासरच्या मंडळींच्या शेऱ्यावरून कळते की त्या काळातील इराणी स्त्रिया शिकलेल्या असत, परंतु अफगाणी स्त्रियांत शिक्षण नव्हते. मुसलमान, सुशिक्षित स्त्रीवर्गाची प्रतिनिधी म्हणून तिची पात्रयोजना केली असावी. तिचे गुरू अबू रेहान अल् बेरुनी यांचे मात्र तसे नाही. ते एक ऐतिहासिक व्यक्ती आहेत व जागतिक इतिहासात तसेच विज्ञानात त्यांचे स्थान मोठे आहे. त्यांचा वापर काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठीही केला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तथ्य सांगितल्याबद्दल कोपरनिकसला चर्चने खूप त्रास दिला. बेरुनी म्हणतात की हिंदच्या लोकांनी या अनुमानाला बळकटी देण्यासाठी काही प्रयोग केले व मग हे सत्य म्हणून पुढे ठेवले. अल् फरगानीने ऐकले होते की ग्रीकांचाही असाच तर्क आहे. त्याचा त्यांनीही अभ्यास केला  व काही आकडेमोड करून त्यांनीही हे स्वीकारले. बेरुनी यांनी या दोन्ही प्रबंधांचा अभ्यास केला, काही स्वत: गणिते केली व मग हे सत्य स्वीकारले. लेखकाला हे स्पष्ट करायचे आहे की त्या वेळी कुठलाही शोध, कुठलेही सत्य बुद्धीच्या कसोटीवरच स्वीकारले जात होते. धर्मग्रंथात लिहिलेले तेच अंतिम सत्य नव्हते. तसा आग्रहही कुणाचा नव्हता. बेरुनीची व्यक्तिरेखा आपल्याला सतत या सत्याचे भान करून देताना आढळते.
चार देशांचे चार मित्र आपापल्यापरीने संशोधनाचे कार्य चालू ठेवतात व अनेक शोधांमागचे अरबकालीन मूळ शोधून काढतात. त्याच वेळी ओमरला हेही सुनवतात ती जरी हे काम अरबकालीन असले तरी संशोधनातून हेही लक्षात आले आहे की याचे श्रेय मध्य आशियातील सर्व जमाती, हिंद (भारत), चीन यांनाही जाते. अरबांचे श्रेय हे की त्यांनी ज्ञानप्रसार व त्याची जोपासना व संवर्धन केले. यावर लिंडा वाचक व लेखकाच्याही वतीने प्रश्न करते की त्यानंतर असे काय घडले? ओमर (म्हणजे लेखक) त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की जोपर्यंत इस्लाम राजकीयदृष्टय़ा प्रबळ होता तोपर्यंत सर्व तऱ्हेचे परस्परविरोधी व नवे विचार सामावून घेण्याचे सामथ्र्य त्याच्यात होते. परंतु राजकीय पराभवानंतर त्याने स्वत:तच रमणे पसंत केले व बाहेरच्या जगापासून स्वत:ला तोडून घेतले. हे एकमेव कारण असेल, हे आपल्याला पटणार नाही कदाचित, परंतु पुस्तकाचा विषय हा नाही तर मध्ययुगीन संमिश्र संस्कृती व त्याचे आधुनिक जगाशी असलेले नाते स्पष्ट करणे हा आहे. त्या दृष्टीने पुस्तकात खूप संदर्भ मिळतात तसेच नवीन व चांगले काही वाचल्याचे समाधानही मिळते.