श्रीसद्गुरूही भगवंताप्रमाणेच लहान-थोर, गरीब-श्रीमंत, अडाणी-विद्वान असा कोणताही भेद मानत नाहीत. सर्वत्र ऐक्यभावानं ते एकालाच पाहातात आणि जीवमात्रांत तो ऐक्यभाव बिंबवण्यासाठी अखंड कार्यरत राहातात. स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘हरि-रूप सान हरि-रूप थोर। नाहीं पारावार हरि-रूपा।।’’ (संजीवनी गाथा, अभंग क्र. ७९) या दृष्टीनं ते प्रत्येकाशी समत्वानं वागतात. ते लहान-थोर जाणत नाहीत, एका भक्तीच्या जोरावर ‘अतिथी’ म्हणून ते कुठेही जातात! स्वामींचंच जीवन पाहा! प्रकृतीचं निमित्त करून ते देसायांच्या घरी पाहुण्यासारखे आले आणि या जगात खरं तर ‘पाहुण्या’सारखं काही काळापुरतं येऊनही अहंबुद्धीपायी यजमानाच्या तोऱ्यात वावरणाऱ्या जिवाला सोऽहंचं चक्रवर्ती अढळपद देण्याच्या कार्यास लागले! देसायांच्याच घरी का आले? श्रीकांत ऊर्फ बाबूराव देसाई यांची एक आठवण (अनंत आठवणीतले अनंत निवास, पृ. ८९) आहे. स्वामींच्या दर्शनाला दूरवरूनही लोक येऊ लागले. त्यात एक विद्वान कवीही होते. सुंदर आवाजात ते भजनंही म्हणत. स्वामीही त्यांच्या अभ्यासूपणाचा मान राखायचे. ते काही भक्तांशी बोलताना तरुण वयातील बाबूरावांनी ऐकलं. बोलण्याचा आशय असा होता की, ‘स्वामींची खरी योग्यता देसायांपैकी कुणालाच खरी कळलेली नाही. नव्हे त्यांना त्यात रसच नाही. त्यांच्याकडून यांनी अध्यात्मातलं काय घेतलं? उलट आपण भक्तच स्वामींची खरी योग्यता जाणतो. खरा लाभ घेतो!’ बाबूरावांना अतिशय वाईट वाटलं. एवढा मोठा माणूस हे बोलतोय, म्हणजे ते खरंच असलं पाहिजे. आपण अभागीच आहोत. याच मन:स्थितीत ते  स्वामींच्या खोलीत गेले. मनात विचारांचं थैमान सुरूच होतं. स्वामी बोलू लागले, ‘‘त्यांची प्रतिभा चांगली आहे. ते कवी आहेत. सगळं छान आहे..’’ बाबूरावांना वाटलं, स्वामीही त्या माणसाच्या बोलण्याला दुजोरा देत आहेत. म्हणजे तो आम्हा देसायांबद्दल बोलला ते खरंच म्हणायचं!.. आणि क्षणभर थांबून स्वामी सावकाश म्हणाले, ‘‘पण भक्ती पाहिजे!’’ पैं भक्ति एकी मी जाणें! देसायांकडे समजा सगळं काही असतं, पण भक्ती नसती तर त्या निवासात अनंतानं पाऊल टाकलं तरी असतं का? प्रकृती बरी नसणं, हे निमित्त होतं, भक्तीची ओढ हे खरं कारण होतं! तिथी-वार न पाहाता ‘अतिथी’ बनून स्वामी आले आणि भक्तीच्या अमृत-धारेचा अखंड वर्षांव करीत गेले! भक्ताच्या अंतरीचा शुद्ध भाव पाहूनच भगवंत अर्थात श्रीसद्गुरू ‘अतिथी’ बनून येतात आणि भक्त जे काही देतो, त्यातील भाव ग्रहण करण्यासाठी, तो जे काही देतो ते मोठय़ा प्रेमानं ग्रहण करतात. स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ७७वी ओवी सांगते- ‘‘येर पत्र पुष्प फळ। हें भजावया मिस केवळ। वांचूनि आमुचा लाग निष्कळ। भक्तितत्त्व।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ९, ओवी क्र. ३९६). भगवंत सांगतात, पान, फूल, फळ हे तर निमित्त आहे! ते ज्या शुद्ध भक्तिभावानं दिलं जातं, तो भावच मी ग्रहण करतो. त्या भावालाच मी भुलतो!