व्यवस्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. व्यवस्थेविरोधात आवाज उठवून, प्रसंगी ती उलथवून टाकून नवी व्यवस्था आणण्याची, थोडक्यात क्रांतीची भाषा अनेक जण बोलतात. मात्र, कृती करणारे खूप कमी असतात. व्यवस्था बदलण्यासाठी, केंद्रीय सत्ता उलथवून टाकण्यासाठी जेव्हा एक शिकला-सवरलेला तरुण हॅकिंगचा आश्रय घेतो, त्या वेळी ही व्यवस्था कशी लुळीपांगळी, निराधार ठरते हे सांगणारी रोमहर्षक कादंबरी..हॅकस्टर

प्रत्यक्ष रणभूमीवरचे युद्ध कोणालाही परवडणारे नसते. अशा परिस्थितीत कमीत कमी स्रोतांचा वापर करून sam07शत्रुपक्षाची जास्तीत जास्त हानी घडवून आणण्याच्या क्लृप्त्यांना अधिकच वाव मिळतो. मग शत्रुराष्ट्रात हेरगिरी करणे, छुपे हल्ले चढवणे, आíथक स्तरावर कारवाया करणे या कृत्यांना ऊत येतो. यालाच छुपे युद्ध म्हणतात. मात्र, आता संगणकावरील एका क्लिकसरशी दोन देशांमध्ये युद्ध छेडले जाऊ शकते, एवढी प्रगती तंत्रज्ञानाने साध्य केली आहे. याला सायबर युद्ध असे संबोधले जाते. या सायबर युद्धाची व्याप्ती अकल्पित आहे. इराणने छुप्या मार्गाने अणुप्रकल्पांना सुरुवात केल्याची कुणकुण लागताच अमेरिकेने सायबर युद्धाचाच मार्ग अवलंबला. २०१० मध्ये अमेरिकेने स्टक्सनेट हा संगणक किडा (कम्प्युटर वर्म) तयार केला आणि इराणच्या संगणकप्रणालीत सोडून अणुप्रकल्पाला हानी पोहोचवली. सायबर युद्धाचे हे असे अनेक कंगोरे आहेत. दुसऱ्या देशाची आíथक प्रगती सहन न झाल्यास, त्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल, अशा प्रकारचा संगणक किडा तयार करायचा आणि त्या देशाच्या सिस्टीममध्ये तो घुसवायचा, की पुढील काम करायला तो किडा मोकळा, अशी ही सायबर युद्धाची व्याप्ती आहे.
या सायबर युद्धाला अटकाव करण्यासाठी प्रत्येक देशाची स्वत:ची अशी एक संरक्षणप्रणाली असते. ही प्रणाली अर्थातच संरक्षण िभतीचे काम करते. मात्र, प्रत्येक वेळी बाहेरूनच हल्ला होईल असे नसते. देशांतर्गत असंतुष्ट आत्मेही कधी कधी सायबर युद्धाचा अवलंब करून स्वत:च्याच देशाचे नुकसान करू पाहतात. घरभेद्यांच्या या कृत्यामागे काही निश्चित विचारसरणीही असते. आतल्या-बाहेरच्या या शत्रूंना ही यंत्रणा कसे तोंड देते, नेमके हे सायबर युद्ध कसे छेडले जाते, त्याचा मुकाबला कसा केला जातो, स्वत:च्याच देशाविरोधात युद्ध पुकारण्याची वेळ घरभेद्यांवर कोण आणते, आपल्याच सिस्टीममधील चुका त्याला कारणीभूत असतात का.. इत्यादी इत्यादी प्रश्नांची उत्तरं आपल्याला हॅकस्टर या कादंबरीत मिळतात.
संगणक अभियंता असलेल्या विक्रमची ही सूडकथा. कानपुरात जन्मलेल्या विक्रमचे वडील अनंतसिंह बेदी व्यवसायाने शास्त्रज्ञ. देशप्रेमाने भारलेल्या बेदी यांना अशी एक प्रणाली विकसित करायची आहे की जिच्याद्वारे देशावर येणाऱ्या परकीय संकटाची चाहूल आधीच लागू शकेल. शत्रुराष्ट्राच्या गोटात काय विचारमंथन सुरू आहे, याचा डेटा प्राप्त करू शकेल अशी प्रणाली विकसित करून देशाची सुरक्षाव्यवस्था अभेद्य करण्याचा त्यांचा इरादा आहे. देशातील लोकांचा मूड सध्या काय आहे, याचाही डेटा तयार करण्याची सोय या प्रणालीत आहे. अनंतसिंह बेदी त्यांच्या या प्रणाली तयार करण्याच्या अगदी अखेरच्या टप्प्यांपर्यंत पोहोचले असतानाच अनंतसिंह यांचा गूढ मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूनंतर अनंतसिंह यांना देशद्रोही ठरवण्यात येते. इराणमधील अणुप्रकल्पासाठी काम करताना त्यांनी संरक्षणदृष्टय़ा संवेदनशील असलेली माहिती इराणला विकली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येतो. शालेय विद्यार्थी असलेल्या आणि बाबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमच्या मनावर ही घटना खोलवर परिणाम करते. त्याची आई पतीच्या नावाला लागलेला बट्टा पुसून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करते. अन्यायाचा प्रतिकार करते. आपल्या मुलावर याचा परिणाम होऊ नये यासाठी विक्रमला ती मुंबईला शिकायला पाठवते. अनंतसिंह यांच्या मृत्यूचे मूळ कारण शोधण्याच्या प्रयत्नातच विक्रमच्या आईचा अपघाती मृत्यू होतो. मात्र, हाही घातपातच असतो. लहान वयातच आई-वडिलांना गमवावे लागल्याचा विपरीत परिणाम विक्रमवर होतो. पुढे बाबांच्या इच्छेप्रमाणे विक्रम संगणक अभियंता होतो. मात्र, बाबांच्या मृत्यूमागील गूढ उकलण्याचा त्याचा इरादा पक्का असतो. केंद्रात सत्ताधारी असलेल्या डेमॉक्रॅटिक अलायन्स पार्टीचे सर्वशक्तिमान अध्यक्ष कृष्णा चतुर्वेदी हेच आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे विक्रमला समजते. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विक्रम संपूर्ण देशालाच वेठीस धरतो. केंद्र सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी तो रिझव्र्ह बँकेची वेबसाइट हॅक करून सर्व आíथक व्यवहार ठप्प करतो, मुंबई शेअर बाजारावर नेटहल्ला करून धनाढय़ांचे सर्व व्यवहार क्षणार्धात मातीमोल ठरवतो. आपल्या संगणकीय ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून संपूर्ण अर्थ आणि केंद्रसत्ताच उलथवून टाकण्याचा विक्रमचा इरादा आहे. डेमॉक्रॅटिक अलायन्स पार्टीचा सव्र्हर प्राप्त करून चतुर्वेदी यांचा खरा चेहरा विक्रमला जगासमोर आणायचा असतो. अतिशय नियोजनबद्धरीत्या आणि केलेल्या गुन्ह्य़ाचा मागमूसही न ठेवता विक्रम आपल्या कारवाया करीत असतो.
विक्रमचा माग काढण्याची जबाबदारी काऊंटर इंटेलिजन्स अॅण्ड स्पेशल ऑपरेशन्स टीम (सीआयएसटी) या पथकावर येते. मुंबईच्या एसीपी अर्जुनचा या पथकात समावेश आहे. सीआयएसटीला गुंगारा देत आपली प्रत्येक चाल रचण्यात विक्रम यशस्वी ठरतो. अपयश माहीत नसलेला अर्जुन व त्याचे सहकारी विक्रमला पकडण्यात यशस्वी होतात का, विक्रम आपला सूड उगवतो का, चतुर्वेदींचे काय होते याची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅकस्टर नक्कीच उपयुक्त आहे.
संकल्प कोहली आणि परितोष यादव या लेखकद्वयीने लिहिलेली ही कादंबरी पहिल्या पानापासूनच मनाची पकड घेते. प्रत्येक पानागणिक कादंबरीच्या शेवटाबाबतची उत्कंठा वाढत जाते. जराही ही उत्कंठा कमी होईल किंवा रटाळवाणे वाटेल, असे काहीही या लेखकद्वयीने कादंबरीत केलेले नाही. विक्रमचे ध्येयवेड, ध्येय गाठण्यासाठी प्रसंगी आपल्या प्रेमाचीही कुर्बानी देण्याची त्याची असलेली मनाची तयारी, सीआयएसटी आणि विक्रम यांच्यातील उंदरा-मांजराचा खेळ, हॅकिंग म्हणजे काय हे सांगणारे तपशील, त्यामागची विचारांची लढाई असे सारे या कादंबरीत आहे..म्हणजे, केवळ कथानक पुढे रेटणारी ही कथा नव्हे.
 अर्थात, तांत्रिक बाबींचा समावेश असला तरी तो कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सोप्या भाषेत या दोघांनीही ही माहिती वाचकाला समजावून सांगितली आहे. विक्रमची व्यक्तिरेखा सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनात घर करून जाते. व्यवस्थेने नाडलेला, गांजलेला, व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठण्याची ऊर्मी असलेल्या तरुणाईचे प्रतिनिधित्व विक्रम करतो. मात्र त्याच वेळी व्यवस्था पूर्णपणे सडलेली नाही, या व्यवस्थेतही चांगली माणसं आहेत, राजकारणी म्हणजे भ्रष्ट हे समीकरण नेहमीच बरोबर असते असे नाही.. हे सर्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा एसीपी अर्जुन हादेखील इथे आहे! या दोन्ही पात्रांना समसमान न्याय देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत. मात्र, भाव खाऊन जातो तो विक्रमच. कादंबरीच्या अखेरीस असलेला व्यवस्थेवरील उभयतांचा संवाद उल्लेखनीय. अखेरच्या ओळीपर्यंत कादंबरीचा शेवट काय होणार, याचा थांगपत्ता लागू न देण्यात लेखकद्वयी यशस्वी ठरली आहे. त्या ओळीतूनच विक्रम आणि अर्जुन यांच्यापकी कोण नायक आणि कोण प्रतिनायक याचाही उलगडा होतो. एकूणच सायबर युद्ध, त्याचे परिणाम, देशांतर्गत धोके याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा असेल तर हॅकस्टर ही कादंबरी चांगला पर्याय ठरू शकते.
 हॅकस्टर
*लेखक – संकल्प कोहली आणि परितोष यादव
*पाने – २९१ ’प्रकाशन – रेड इंक पब्लिकेशन