गंगा नदीविषयी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कानपिचक्या दिल्याची बातमी (लोकसत्ता, ४ सप्टें.) वाचली.
गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २७०७ किलोमीटर आहे. या नदीकडे पाहण्याची प्रत्येकाची एक पद्धत आहे. कुणी धार्मिक, कुणी नसíगक, कुणी मानवतेच्या  तर कुणी भावनिक दृष्टिकोनातून. याच गंगा नदीचा नेहमी उल्लेख होतो तो तिच्या प्रदूषणाबद्दल. आजपर्यंत केंद्र शासनाने हजारो कोटी रुपये खर्च केले गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी, तरीही गंगा काही शुद्ध झाली नाही. गंगेच्या शुद्धीकरणाबद्दल नेहमी वरवरचाच विचार का केला जातो?
गंगेत लाखो लिटर केमिकल, प्रदूषण असलेले आणि ड्रेनेजचे पाणी रोज सोडले जाते. त्यावर बंदी का घातली जात नाही? कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे नदी निर्जीव होत चालली आहे. गंगेतील जीवसृष्टी तसेच गंगेच्या आजूबाजूच्या लोकवस्तीवरसुद्धा याचा दुष्परिणाम आता दिसू लागला आहे. रोज हजारो भाविक नदीमध्ये स्नान करतात, कपडे धुतात, पूजाविधी करून पूजेचे साहित्य नदीत सोडतात. श्राद्ध, मेलेल्या माणसांची राख, हाडे आणि कुठे कुठे तर मृतदेहच नदीपात्रात कापडात गुंडाळून सोडला जातो. धर्माच्या नावावरसुद्धा नदीचा गळा घोटाला जात आहे. यामुळे प्रथम या सर्व कुप्रथांना आणि दूषित पाणी प्रक्रियेविना नदीत सोडणाऱ्यांना चाप बसवला पाहिजे. यासाठी कठोर दंड आकारला पाहिजे. हे केल्यास प्रदूषणाचे प्रमाण आटोक्यात आणता येईल आणि लोकांचा पसा नेहमी नेहमी नदी स्वच्छ करण्यासाठी वाया घालवावा लागणार नाही.      –  सुशिम नामदेव कांबळे

रूढींचे विसर्जन हवे
‘पुणे शहराला दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा होत असताना, गणेश विसर्जनासाठी धरणांमधून जादा पाणी कशासाठी सोडायचे?’ अशी मागणी निसर्ग संवाद संस्थेचे संचालक नंदू कुलकर्णी आणि पुण्यातील इतर जागरूक नागरिकांनी केली आहे (‘विसर्जनासाठी जादा पाणी सोडू नका!’- लोकसत्ता, ५ सप्टेंबर) ती रास्तच आहे. ही बाजू मांडणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. गणेशमूर्तीचे विसर्जन नदीऐवजी हौदांमध्ये करावे, असे आवाहन करणारी महापालिका प्रत्यक्षात मात्र  विसर्जनासाठी नदीत जादा पाणी सोडून नदीत विसर्जन करणाऱ्यांना प्रोत्साहन देते हे घातकच आहे.
रूढी या अपरिवर्तनीय असल्यामुळे कधीही घातक होऊ शकतात. ‘गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी उंचच उंच देखावे उभारण्याची हौस विसर्जन मार्गावर असलेल्या वृक्षांच्या मुळावर येते .. छाटणीत आतापर्यंत ५०० ट्रक्सपेक्षा जास्त लाकूड जमा झाले, .. गणपतीच्या काळात मिरवणूक मार्गावरील वृक्षांच्या फांद्या छाटण्यात येतात .. मोहन ढेरे (पुणे महापालिकेचे वृक्ष अधिकारी)’ या ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीतील वृत्तावरून  हे अधिक स्पष्ट होईल.
हवेचे प्रदूषण, नदीचे प्रदूषण या समस्या वाढत असताना अनिष्ट रूढींचे प्राधान्याने विसर्जन करण्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे.
डॉ. राजीव जोशी

हिंदू पीठाधीशांची नीतिमूल्ये कळली!
साईबाबांसंदर्भात सध्या जो वाद सुरू आहे त्याविषयी रविवारच्या लोकसत्तातले (३१.०८.१४) तीन लेख वाचूनही त्यात सारखे काही तरी राहून गेल्यासारखे वाटत होते; त्याचा खुलासा शंकराचार्याच्या विधानांशी संबंधित बातम्या वाचल्यानंतर झाला. सनातन धर्मात  एकूण चोवीस अवतार आहेत; त्यातले फक्त दोन अवतार – म्हणजे कल्की आणि बुद्ध हे – कलीयुगातले आहेत. त्यामुळे साईबाबांना अवतार मानता येत नाही; तसेच साईबाबा हे मांसाहार करीत आणि सुंता करण्याच्या प्रथेला त्यांचा पािठबा होता. त्यामुळे त्यांना गुरू मानता येणार नाही असे आपले मत या शंकराचार्यानी दिले आहे. मुख्य म्हणजे ‘रामजन्मभूमी आंदोलनापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशभर सर्वत्र साईबाबांची अनेक मंदिरे बांधण्यात येत आहेत’, असेही पुढे त्यांनी म्हटले आहे. अर्थात याचा धागा कुठे तरी इस्लामशी आणि पर्यायाने िहदुत्वाच्या कार्यक्रमाशी जोडलेला आहे. अशी विधाने पाहिल्यावर अनेक गोष्टींची राजकीय संगती लागते आणि रिकाम्या जागा भरून निघतात.
वास्तविक पाहता साईबाबांच्या पूर्वायुष्याबद्दल बरेच गूढ आहे पण तरीही शंकराचार्यानी त्यांना वेश्यापुत्र म्हणून हिणवले आहे. शंकराचार्याच्या मते िपदारी बहरुद्दिन नावाचा एका अफगाण माणूस अहमदनगरला आला आणि एका वेश्येकडे राहू लागला. त्यांना चाँद मियां नावाचा एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणजेच साईबाबा. म्हणजे एक तर मुस्लीम आणि दुसरे म्हणजे वेश्यापुत्र. अर्थातच त्यामुळे दोन्ही अर्थानी साईबाबा हे ‘ताडन के अधिकारी’ ठरतात. शंकराचार्य नावाच्या िहदूंच्या ‘महान’ धार्मिक पीठाधीशाच्या डोक्यात कोणती नीतिमूल्ये आहेत हे अशा विधानांवरून स्पष्ट होते. एखाद्याच्या जन्मावरून त्याचे मूल्यमापन करण्याच्या (अजूनही प्रचलित) िहदूंच्या परंपरेला यामुळे खतपाणी मिळत आहे.
– अशोक राजवाडे, मालाड (मुंबई)

‘क्रिया- प्रतिक्रियेचा सिद्धांत’ पुण्यातसुद्धा लागू
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे कार्यालयावरील हल्ला झाल्याची बातमी (लोकसत्ता, ४ सप्टेंबर) वाचली.
प्रथमत या हल्ल्याचा निषेध करतो आणि दोषी व्यक्तींना शासन व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो.
परंतु या निमित्ताने निषेध सभा घ्यायच्या हे या लोकांना चांगले जमते.
 बरे, केरळमधील मूळ खुनाच्या घटनेचा एकानेही निषेध केल्याचे वाचनात आले नाही. हे म्हणजे मूळ क्रिया विसरायची आणि त्याच्या प्रतिक्रियेचा निषेध करायचा.. म्हणजे न्यूटनचा नियम पूर्ण लक्षातच घ्यायचा नाही.. हे स्वतला विज्ञानवादी म्हणवणाऱ्या लोकांचे वर्तन!
या निमित्ताने सर्व साथी भाई-बहन हे िहसावादी कॉम्रेड लोकांच्या बाजूने उभे राहिले, हे साने गुरुजींच्या अिहसावादी शिकवणीत घडलेल्या त्यांच्या लाडक्या मुला-मुलींना न शोभणारे झाले.
धनंजय सप्रे, पुणे

देशभक्तीच्या प्रेरणेसाठी या सवलती हव्याच
‘स्वातंत्र्यसनिकांच्या सवलतींचा फेरविचार व्हावा’  हे शशी पाटील यांचे पत्र (लोकमानस, १ सप्टें.) वाचले. माझ्या मते स्वातंत्र्यसनिकांच्या त्यागामुळेच आपण स्वतंत्र भारतात राहू शकत आहोत. गोवा-मुक्तीसाठी लढले, तेही स्वातंत्र्यसैनिकच.  १९७०च्या दशकातील त्यांच्या मुलांना, नोकरी-शिक्षणात झालेला लेखाजोखा जर मांडायचाच असेल तर तसा फायदा जातीनिहाय आरक्षण घेणाऱ्या पिढय़ांनाही झाला. त्यांच्या प्रगत पिढय़ांना जशा या सवलतींची आवश्यकता आहे तशीच स्वातंत्र्यसनिकांच्या पुढील पिढय़ांनासुद्धा आहे. (माझा कोणताही नातेवाईक स्वातंत्र्यसनिक नाही.) अशा सवलती दिल्याने त्यांच्या व इतरांच्यासुद्धा पुढच्या पिढय़ांना देशभक्तीची प्रेरणा मिळत राहील.
स्वप्निल प्रभुलकर

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे लोकसत्ताच्या संपादकीय पानांच्या रचनेत बदल झाले आहेत. त्यामुळे ‘बुकमार्क’ हे पान आजच्या अंकात नाही.