भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय खासदार सुश्री हेमा मालिनी यांची खरे तर काहीच चूक नाही. मथुरा हा त्यांचा मतदारसंघ. वृंदावन हे त्यातील एक शहर. ते स्वच्छ, सुंदर दिसावे असे हेमाजींच्या मृगनयनांना वाटले तर त्यात अयोग्य ते काय? वृंदावन ही राधा-कृष्णाची भूमी. तेथे सौंदर्याचा रासगरबा रमावा, असे कोणाही सुजाण नागरिकाला वाटेल; पण त्याऐवजी दिसते काय, तर खचलेल्या, पिचलेल्या, थकलेल्या, आयुष्याला कंटाळलेल्या विधवांची अपशकुनीच ठरवली गेलेली पांढरी कपाळे. रामप्रहरी तर त्यांचे दर्शनसुद्धा घडू नये, असे शास्त्र सांगते. हेमाजींचा शास्त्राभ्यास किती आहे ते माहीत नाही; परंतु त्या भाजपच्या खासदार आहेत म्हटल्यावर त्यांना त्या पक्षातील संतमहंतांकडून त्याचे दोन-चार धडे तर एव्हाना मिळालेच असतील. त्या अभ्यासातूनच त्यांनी वृंदावनातील या भयंकर संकटाबाबत काही तथ्ये मांडली. त्यावरून एवढा गदारोळ होण्याची काहीच गरज नव्हती. त्या माजी स्वप्नपरीचे म्हणणे एवढेच होते की, वृंदावनीच्या या विधवांच्या बँक खात्यात भरपूर पैसाअडका असतो. त्यांना चांगली कमाई होत असते. मऊमऊ गाद्यागिरद्यांवर लोळत असतात त्या; पण त्यांना भीक मागायची सवयच लागली आहे. बरे या काही उत्तर प्रदेशातीलच विधवा नाहीत. वृंदावनात आजमितीला जवळपास चाळीस हजार विधवा आहेत. त्यातील बहुसंख्य परप्रांतीय आहेत. त्यातही पश्चिम बंगाल आणि बिहारमधील विधवांचे प्रमाण मोठे. त्यांनी हेमाजींच्या मतदारसंघात येण्याचे कारणच काय? हेमाजी सात्त्विक संतापाने विचारतात, प. बंगाल वा बिहारमध्ये काय चांगली मंदिरे नाहीत काय? हेमाजींना बहुधा हे माहीत नसावे, की राज्यघटनेने नागरिकांना देशात कोठेही वास्तव्याचा अधिकार दिलेला आहे. या विधवांना त्यांचे नातेवाईक सांभाळत नाहीत. कौटुंबिक छळ, मालमत्तेचे वाद, लैंगिक अत्याचार अशा विविध कारणांनी त्या वृंदावन, काशीसारख्या तुलनेने सुरक्षित शहरांचा आसरा घेतात. त्यांच्या स्थलांतरामागे सामाजिक कारणे आहेत; पण त्याची फिकीर हेमाजींनी का करावी? विधवांच्या स्थलांतराचे प्रमाण बंगालमध्ये सर्वाधिक. नशीब राजा राममोहन रॉय यांचे, की हेमाजींनी याबद्दल त्यांना जबाबदार धरले नाही. पाश्चात्त्य विद्या शिकून आलेल्या या गृहस्थांनी हिंदूंच्या धार्मिक परंपरेत भोचकपणा केला आणि विल्यम बेंटिक यांना सती प्रथा बंद करायला भाग पाडले. विधवा सती जाईनाशा झाल्या. त्यांचे प्रमाण वाढले. तो सगळा लोंढा मथुरेत येऊ लागला. या विधवा बांकेबिहारी मंदिराच्या नाही तर इस्कॉन मंदिराच्या आश्रयाने दिवसभर राहतात, भीक मागतात, हलकीसलकी कामे करतात. तेथेही सगळ्याच सुरक्षित आहेत अशातला भाग नाही; पण महिलांचे शोषण तर अन्यत्रही होते. त्याबाबत बोलून एक तर धार्मिक परंपरांचा अनादर करण्याचा कोणालाच हक्क नाही. तसा केला तर काय होते याचा बोध ‘वॉटर’सारखा पाखंडी चित्रपट काढणाऱ्या दीपा मेहतांच्या अनुभवावरून इतरांनी घ्यावा. तेव्हा सुश्री हेमा मालिनी बोलल्या त्यावर, ‘बालिश बहु मथुरेत बडबडल्या’ असा आक्षेप घेण्याचे कारणच नाही. सामाजिकता, महिलांचा सन्मान वगैरे गोष्टी काय या आक्षेपकांनाच कळतात आणि हेमाजींना त्याचा गंधही नाही?    त्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनयाबद्दल कोणाचे अन्य काही म्हणणे असू शकेल; परंतु त्या एके काळच्या स्वप्नपरी आहेत. याचा अर्थ त्या नेहमीच स्वप्नांच्या रुपेरी     जगात विहरत असाव्यात, असाही कुणी काढण्याचे कारण नाही.. कुणाला तरी चले जाव म्हटल्याशिवाय राजकारण करता येत   नाही, एवढी समज तरी त्यांनी नक्कीच दाखविलेली नाही काय?