हिंदू, बौद्ध,  जैन  आणि शीख  चार धर्मामधील साम्य व फरक यांची चर्चा करणारा लेख..
मागील काही लेखांमध्ये आपण भारतीय उगमाचे हिंदू, बौद्ध व जैन या प्राचीन (म्हणजे कमीत कमी अडीच हजार वर्षांपूर्वी उगम झालेले) आणि शीख या अलीकडील म्हणजे सुमारे पाचशे वर्षांपूर्वी उगम पावलेला अशा चार धर्माबद्दल काहीशी माहिती घेतली आहे. या चार धर्मामध्ये काही साम्य व काही फरक असणे स्वाभाविक असून, साधारण एकाच भौगोलिक विभागात उगम असल्यामुळे त्यांच्यात फरकांपेक्षा साम्य असण्याची शक्यता अधिक आहे. तर आजच्या या लेखात आपण या चार धर्मामधील साम्य व फरक यांचा धावता आढावा घेणार आहोत.
आत्मा : या चारही धर्मात, प्रत्येक सजीवाला आत्मा आहे, त्या आत्म्यासाठी साधारण सारखा कर्मफलसिद्धांत आहे; आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न आहेत व भोगांसाठी ‘पुनर्जन्मही’ आहेत. जैन धर्माने सांगितले की, जरी सर्व प्राणिमात्रांत आत्मा आहे, तरी मानवाचा आत्मा जास्त प्रगत असून तो संपूर्ण ज्ञान, प्रचंड सामथ्र्य व मोक्षरूपात शाश्वत सुख मिळविण्यास समर्थ आहे. जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व स्पष्टपणे नाकारलेले असूनही आत्म्याचे अस्तित्व मात्र मानलेले आहे. पण तो आत्मा कुठून व कसा आला ते मात्र सांगितलेले नाही. बौद्ध धर्मात आत्मा ही संकल्पना उशिरा मान्य झाली असावी असे दिसते. कारण स्वत: गौतम बुद्धाने आत्मा हा केवळ ‘आध्यात्मिक जाणिवेच्या स्वरूपाचा आहे’ व ‘तो शाश्वत (अमर) नाही’ असा ‘अनात्मवाद’ सांगितलेला आहे. पण त्याच्यानंतरच्या अनुयायांनी पुनर्जन्म होण्यासाठी अमर आत्मा आवश्यक असल्याने तो स्वीकारला असावा असे वाटते. हिंदू धर्मात उपनिषद काळी अमर आत्मा, त्याचे स्वरूप व गती, त्याचा वारंवार पुनर्जन्म आणि आत्मा हा ब्रह्माचाच अंश असणे असे अद्वैत याबाबत प्रचंड विचारमंथन झाले आणि या सर्व गोष्टी या धर्मात बहुश: सर्वमान्य झाल्या.
अद्वैत : हिंदू धर्मात जसे जीव आणि शिव, आत्मा आणि ब्रह्म तसेच सृष्टी आणि ईश्वर यात पूर्ण अद्वैत मानतात, तसे पूर्ण अद्वैत शीख धर्माला मात्र मान्य नाही. बौद्ध व जैन धर्मात ईश्वरच नसल्यामुळे द्वैत, अद्वैताचा प्रश्नच येत नाही.
जग सत्य आहे : चारही धर्मात जग सत्य आहे. परंतु या सत्य इहलोकाविषयी ‘आसक्ती’ असणे हा मात्र चारही धर्मात ‘दुर्गुण’ आहे. मध्यंतरीच्या काळात शंकराचार्यानी मात्र जग मिथ्या (माया) आहे असे सांगितले. आजही काही लोक तसे मानत असू शकतील. परंतु साधारणपणे आजच्या काळात विद्वानांचा आणि सर्वसामान्यांचा कल, जग मिथ्याऐवजी सत्य मानण्याकडे आहे.
संन्यास : या चारांपैकी प्राचीन उगमाच्या तिन्ही धर्मामध्ये, सर्वसंग परित्याग करून संसारातून संन्यास घेण्याला मान्यता व प्रतिष्ठा आहे. चारांपैकी एकटय़ा शीख धर्मात मात्र माणसाने संन्यास न घेता, शिस्तबद्ध ऐहिक संसारी जीवन जगावे, अशी स्पष्ट आज्ञा आहे.
उच्चतम जीव : या चारही धर्मात ‘मनुष्य’ हा ‘उच्चतम जीव’ मानलेला आहे जे साहजिकच आहे. तेथून पुढे जैन धर्मात ‘कैवल्य’, बौद्ध धर्मात ‘निर्वाण’ व हिंदू धर्मात मुक्ती, शांती, देवत्व किंवा मोक्ष अशा साधारण तुल्य अशा संकल्पना आहेत. शीख धर्मातसुद्धा जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटका मिळण्यासाठी ईश्वराशी तादात्म्य पावणे किंवा त्याच्यासारखे होणे अशी ‘मुक्ती’ आहे. या मुक्तीसाठी ईश्वरकृपा व त्यासाठी गुरूचे मार्गदर्शन आवश्यक आहे. बौद्ध धर्माने सांगितले की, ‘निर्वाण’ हे मनुष्याचे ध्येय असून, निर्वाणाचा मार्ग सर्वासाठी खुला आहे. बुद्धाने सांगितले की, थोर आसक्तीविरहित साधू, म्हणजे ‘अर्हत’. हे ‘जिवंतपणीही’ निर्वाण मिळवू शकतात, मग त्यांना पुनर्जन्म येत नाही. त्यांनी इतरांनाही निर्वाणप्राप्तीसाठी मार्गदर्शन केले पाहिजे. ‘आत्म दिपो भव’ म्हणजे पूर्णत्वासाठी, ध्येयसिद्धीसाठी ‘स्वावलंबना’चा मार्ग अनुसरावा असे आणि अहिंसा, सत्य, दया, आत्मसंयमन, उदात्तता, पावित्र्य व अनासक्ती इत्यादी गुण आवश्यक आहेत, असे बुद्धाने सांगितले.
दु:खाचे कारण : या चारही धर्मात, माणसाच्या दु:खाचे कारण साधारणपणे ‘पूर्वजन्मीचे कर्म’ असे असून, देव असला तरी तो दु:खाला जबाबदार नाही, असे पक्केमानलेले आहे. बुद्धाने मात्र मानवी दु:खावरच त्याचे सर्व लक्ष केंद्रित केले होते आणि ‘ईश्वर आहे की नाही’ ही चर्चा करण्याससुद्धा नकार दिला होता. (अव्याकृत) बुद्धाने सांगितलेली चार थोर सत्ये अशी आहेत- १) जीवन दु:खमय आहे. २) दु:खाचे मूळ कारण अज्ञान, अभिलाषा (तृष्णा, लोभ) इत्यादीत आहे. ३) दु:खनिवारण होऊ शकते. ४) अष्टांगिका मार्गाने गेल्यास, दु:खनिवारण होऊ शकते व निर्वाणप्राप्तीही होऊ शकते.
‘शांततापूर्ण व नैतिक जीवन’, ‘धर्मग्रंथ माहात्म्य’, ‘गुरूविषयी आदर’ इत्यादी अनेक बाबतींत चारही धर्मात ठळक साम्यस्थळे आहेत. तसेच काही फरकही आहेत. त्याबाबतची अधिक माहिती खालीलप्रमाणे .
ईश्वर : मुळात जैन धर्म, बौद्ध धर्म व हिंदूंतील, लोकायत, बृहस्पती व चार्वाकांसारखे काही तत्त्वचिंतक ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. शीख धर्मात सर्वसमर्थ ईश्वराचे अस्तित्व मानलेले आहे. हिंदू धर्माबाबत बोलायचे तर, हिंदूंच्या प्रतिष्ठित व आस्तिक (म्हणजे वेद मानणाऱ्या) म्हणून मानल्या गेलेल्या षड्दर्शनांमध्ये सांख्य व वैशेषिक ही दोन दर्शने चक्कनिरीश्वरवादी असून, न्याय व योग ही दोन दर्शने परिमित ईश्वरवादी आहेत असे म्हणता येईल. पूर्वमीमांसा म्हणजे जेमिनीसूत्रे हे दर्शन बाह्य़त: ईश्वर नाकारणारे परंतु यज्ञ व यज्ञफळ यांना केवळ मानणारेच नव्हे तर त्याची तरफदारी करणारे आहे. म्हणजे ते यज्ञालाच ईश्वर मानणारे आहे असे म्हणता येईल. फक्त वेदांताचा (म्हणजे उपनिषदांचा किंवा उत्तरमीमांसेचा) तसेच त्यात ब्रह्मसूत्रे व भगवत्गीता मिळून बनणाऱ्या ‘प्रस्थान त्रयी’चा हिंदू धर्मावर इतका जास्त प्रभाव पडलेला आहे की, प्राचीन हिंदू धर्मात काही दर्शने चक्क निरीश्वरवादी आहेत ही गोष्ट हिंदू लोक साफ विसरूनच गेले आहेत. त्यामुळे हिंदू धर्मीय लोक स्वत:ला पूर्णत: देववादी किंवा ईश्वरवादीच मानतात. परंतु त्यांच्यातील मूर्तिपूजेबाबतच्या अतीव प्रेमामुळे जगातील इतर धर्मातील लोक त्यांना देववादीच नव्हे तर ते देवभोळे, दैववादी आणि अंधश्रद्ध लोक आहेत असे मानतात.
एकेश्वरवाद : तसे हिंदू धर्मात एकूण कोटय़वधी देव मानले जात असावेत. शिवाय या धर्मात (इतर धर्माप्रमाणेच) अनेक संप्रदाय असून प्रत्येक संप्रदायाचे वेगवेगळे मुख्य देव आहेत. तरीही सगळे वेगवेगळे देव ही एकाच परम ईश्वराची (ब्रह्माची) वेगवेगळी रूपे आहेत असे मानले जात असल्यामुळे हिंदू धर्म एकब्रह्मवादी ठरतो. त्यामुळे जगातील ईश्वर मानणारे सर्व धर्म ज्या अर्थाने एकेश्वरवादी आहेत त्या अर्थाने हिंदू धर्मसुद्धा एकेश्वरवादीच आहे असे म्हणता येते. पण ते त्या ईश्वराला वेगवेगळ्या रूपात पाहू शकतात, कल्पू शकतात, असे म्हणावे लागते. शीख धर्मात इस्लामप्रमाणे एकेश्वरवादावर भर आहे, जोर आहे.
अवतार : हिंदू धर्मात असे मानतात की, ईश्वर स्वत: मानवरूपात पृथ्वीवर अवतार घेतो. असे मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म आहे. ईश्वर मानणाऱ्या शीख धर्मालासुद्धा अशी अवतारकल्पना मान्य नाही. जैन व बौद्ध धर्मात ईश्वरच नसल्यामुळे, त्याने अवतार घेण्याचा काही प्रश्नच येत नाही.
मूर्तिपूजा : हिंदू लोक मोठे पक्के मूर्तिपूजक आहेत. म्हणजे ते मूर्तीलाच ईश्वराचे प्रतीक मानून पुजतात. भारतात हिंदूंची अशी मूर्तिपूजेची मंदिरे हजारो नव्हे तर लाखोंनी असतील. जैनांचे र्तीथकर, त्यांच्या मूर्ती व त्यांची मंदिरे भारतातकदाचित हिंदूंच्या देवळांएवढीच किंवा जास्तसुद्धा असू शकतील. ते त्यांचे ईश्वर किंवा अवतार नसून ‘मार्गदर्शक’ आहेत. आधी बौद्धांनी बुद्धमूर्ती बनवायला सुरुवात केली व त्यानंतर हिंदूंच्यात मूर्तिपूजा सुरू होऊन वाढली असे काही अभ्यासक म्हणतात व ते खरे असणे शक्य आहे. शीख धर्माचा मूर्तिपूजेला आक्षेप आहे.
सृष्टीनिर्मिती : बौद्ध व जैन धर्म ईश्वरच मानीत नसल्यामुळे, त्यांच्या मते जग अनादिकालापासून अस्तित्वात आहे, म्हणजे ते कुणी निर्मिलेले नाही. हिंदूंच्या सांख्य दर्शनाप्रमाणे सृष्टी ही भौतिक नियमांनी उत्क्रांत झालेली आहे. शीख धर्मात निश्चितपणे व हिंदू धर्मात बहुधा सृष्टी ईश्वरनिर्मित आहे. मात्र हिंदू धर्मात ती ‘शून्यातून’ किंवा ‘इतर कशातून’ निर्मिलेली नसून ईश्वराने ‘स्वत:हून’ निर्मिलेली आहे. (वेदांत) या मताला ‘बहुधा’ म्हणण्याचे कारण असे की ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील नासदीय सूक्तात असे म्हटलेले आहे की, देवांना किंवा अगदी जगदाध्यक्षालाही ही सृष्टी कोठून व कशी उत्पन्न झाली हे माहीत असेल किंवा नसेलही.

caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Mahavikas aghadi
“मविआला मुस्लीम मतं पाहिजेत, पण…”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; मतदारयाद्यांचा उल्लेख करत म्हणाले, “भाजपाप्रमाणेच…!”
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?