अयान हिरसी अली! हे नाव उच्चारताक्षणी, अनेक मुस्लिमांना संताप येतो. त्यांनी तिला धर्मभ्रष्ट ठरवलेलं आहेच आणि ती निरीश्वरवादीच असल्यानं ‘इन्फिडेल’, ‘नोमॅड’ या पुस्तकांतून आणि त्याहीनंतरच्या अनेक लेखांतून धर्मभ्रष्टतेचे अनेक पुरावे टीकाकारांना देतेच आहे. पण तिचं ‘हेरेटिक’ हे नवं पुस्तक येत्या आठवडय़ाभरातच येतंय आणि ते तिच्या नेहमीच्या, ज्ञात भूमिकांपेक्षा निराळं आहे, असा बराच बोलबाला सध्या सुरू झालेला आहे..
इस्लामचे किमान १६ अब्ज अनुयायी जगात आहेत, त्यांपैकी अगदी थोडे ‘दहशतवादी’ किंवा ‘अतिरेकी’ आहेत.. मुसलमानांपैकी अनेकजण धार्मिक वृत्तीचे आणि धर्मपालनच करणारे असले, तरी धर्माच्या नावावर सुरू झालेला/ राहणारा हिंसाचार त्यांना पसंत नाही. आणखी अगदी थोडे मुस्लिम असे आहेत की, ज्यांना आज ‘धर्मभ्रष्ट’ समजलं जातं.. स्वतच्या धर्माला -किंवा खरं तर त्या धर्माच्या प्रक्षिप्त आणि माणुसकीविरोधी रूपांना-  प्रश्न विचारण्याची ताकद या थोडय़ांकडे आहे. ही नैतिक ताकद आहे आणि तिला ना शस्त्रबळाचा आधार आहे, ना बहुसंख्येचा. ही नैतिक ताकद आज बहुसंख्य मुस्लिमांकडे सुप्तपणे असली पाहिजे, अशा विश्वासातून हे पुस्तक लिहिलं गेलं आहे.
इस्लामनं धर्म म्हणून बदललं पाहिजे. स्वतत सुधारणा घडवून आणली पाहिजे. ही सुधारणा प्रथमत पाच तत्त्वांवर आधारित असेल, असं हे पुस्तक सांगणार आहे. सध्या तरी या पुस्तकाबद्दल एवढीच माहिती मिळते. पण त्या पाच सूचनांमध्ये महिलांना अधिकार देण्याचा प्रश्न नक्कीच असेल.
न बदलणारा, सुधारणाविरोधी धर्म ही इस्लामची प्रतिमा झाली आहे, त्याला जितका इस्लामविरोधी अपप्रचार जबाबदार आहे तितकेच या धर्मातील कट्टरपंथीही कारणीभूत आहेत. अतिरेक्यांवर, कट्टरपंथींवर सतत टीका करत राहणं हा एक मार्ग झाला. पण ‘तुम्ही ज्याला धर्म समजता तो आमचा नाहीच’ असं त्या धर्मातल्या बहुसंख्यांनी कट्टरपंथींना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असं अयान अली हिरसी यांचं आवाहन आहे. अरबी देशांमध्ये अगदी लहान प्रमाणात महिलांनी मोटार चालवणं यासारख्या ज्या ‘चळवळी’ होत आहेत, त्यांना मोठाच नैतिक आधार देणारं हे पुस्तक ठरेल.