भूतकाळ कधी मरत नसतो. तो सतत वर्तमानात डोकावत असतो. वर्तमानावर प्रभाव गाजवत असतो. तेव्हा गरज असते त्याची नीट ओळख करून घेण्याची. त्याचा अर्थ लावण्याची. हे काम इतिहासकाराचे. हा इतिहासकार थोडा शेरलॉक होम्स वा हक्र्युल पायरो असतो. विविध िबदू शोधून ते जोडणारा. त्यातून तथ्यांचा खुलासा करू पाहणारा. पण तो एवढाच नसतो. त्याने तसे नसावेही. तो विश्लेषकही असावा लागतो. प्रो. बिपन चंद्र असे होते. परवा वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले कोणत्याही स्वतंत्र देशाला आपली अशी म्हणून ओळख असावी लागते. ती दृग्गोचर करण्याचे काम करणारा इतिहासकार गमावला. इतिहासलेखनाच्या विविध पद्धती आहेत. विविध चष्मे आहेत. प्रारंभीच्या काळात बिपन चंद्र यांचा चष्मा मार्क्‍सवादाचा होता.  दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले अशा मवाळ आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या जहाल मंडळींच्या अर्थविचारांचा, त्याचा भारताच्या आíथक राष्ट्रवादावर झालेल्या परिणामांवर भाष्य करणारे ‘भारतातील आíथक राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ’ हे त्यांचे पुस्तक १९६६ चे.  त्यावर मार्क्‍सवादी विचारसरणीची छाप स्पष्ट होती. पण बिपनबाबू यांच्यासारख्या विवेकी माणसाला पोथीनिष्ठा- मग ती मार्क्‍सवादाची असली तरी- बांधून ठेवू शकत नसते. त्यामुळे पुढे जाऊन त्यांची लेखणी राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या परंपरेला जोडली जाऊ शकली. भारताच्या इतिहासाची उकल करण्यासाठी मार्क्‍सवादी दृष्टिकोनाच्याही पुढे जाऊन विचार करावा लागेल. राष्ट्रीय भावना, स्थानिक विचार महत्त्वाचे असतात, असे ते म्हणत. पण याचा अर्थ भूतकाळाचे गौरवीकरण नव्हे. आजच्या राजकारणाच्या गरजांसाठी इतिहासात पुरावे शोधणे नव्हे. इतिहासलेखनाची ही तथाकथित राष्ट्रवादी पद्धत बिपनबाबूंना अमान्य होती. आज तर केवळ पुराणांच्या आधारे इतिहासाची रचना करण्याचे काम सुरू आहे. तसा पुराणांचा आधार तर दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या थोर इतिहासकारानेही घेतला आहे. पण तो त्यांच्या लेखनाचा एकमेव आधार नव्हता. आज जे प्रयत्न सुरू आहेत ते इतिहासलेखनाच्या मान्य मापदंडांशी कितपत मेळ खातात याबद्दल शंकाच आहे. याचे कारण त्यांच्या हेतूत दडलेले आहे. भारताला वेगळी ओळख देण्याच्या उद्देशाने ते सर्व सुरू आहे. बिपन चंद्र यांनी आधुनिक भारताचा जो इतिहास सांगितला, येथील राष्ट्रीय चळवळींमागील प्रेरणा आणि हेतू यांची जी मांडणी केली, त्या सगळ्यावर काँग्रेसधार्जणिी असा छाप मारून त्याचे पुनल्रेखन करण्याचे काम सुरूच आहे. त्यात आता प्राचीन इतिहासावरही कथित राष्ट्रवादाचे ओझे टाकण्याचे घाटत आहे. इतिहासातून आपणांस हव्या त्या भविष्याची मांडणी करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा काळात बिपन चंद्र यांच्यासारखा बिनीचा इतिहासगुरू जावा हे देशाचेच नव्हे, तर इतिहासाचेही नुकसान आहे.