समाजाची रचना, बांधणी, काहींचा विनाश या सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण असतं. बऱ्याचदा आपण कारणं अन्यत्र शोधतो आणि अर्थकारणाकडे दुर्लक्ष करतो. ती चूक टाळायची असेल तर अर्थकारणाचा आवाका लक्षात घ्यायलाच हवा. त्याशिवाय बाकी सगळं चिंतन अर्धवट आहे. असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
मराठी मध्यमवर्गीय घरात कर्ज हा एखाद्या शिवीला पर्यायी शब्द असायचा. अंथरूण पाहून पाय पसरावेत..इतकी कालबाहय़ आणि लहानपणातच आनंद मानणारी शिकवण ज्या संस्कृतीत दिली जाते, तिथे कर्ज हे कमीपणाशीच निगडित असणार हे तसं नैसर्गिकच म्हणा. वास्तविक ऋ णं कृत्वा घृतम् पिबेत.. म्हणजे कर्ज काढावं लागलं तरी बेहत्तर, पण तूप प्यायचं सोडू नये.. अशी शिकवण देणारा चार्वाक याच मातीत जन्मला. पण त्याचं ते अनुकरणीय तत्त्वज्ञान मातीतच मिळालं. इतिहासाच्या मधल्या कोणत्या तरी टप्प्यावर भौतिक सुखांकडे कमीपणाच्या नजरेतनं पाहायची सवय आपल्याला लागली आणि मग आता काय चाललंय यापेक्षा मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळेल की नाही याच्याच विवंचनेत मंडळी खाली मान घालून जगू लागली. परिणामी वरती जागा मिळाली की नाही ते कधीच कळलं नाही, पण या भूतलावरचं मध्यमवर्गीयांचं जगणं तसं मचुळच झालं या कर्जाच्या भीतीमुळे. कर्ज काढू नये.. काढलं तर लगेच फेडून टाकावं..डोक्यावर कर्ज नसण्यात खरा आनंद..असे आपले संस्कार. त्यामुळे मराठी घरातल्याचं उत्पन्न वार्षिक पगारवाढीनं जे वाढायचं तेवढंच. त्या वाढीतच आनंद मानायची सवय मराठी घराघरात लागली. या वाढीला भूमिती श्रेणी कधी मान्यच नव्हती.
आता आता चित्र जरा पालटतंय. माणसं आनंदानं, उत्साहानं कर्ज काढायला लागलीयेत. संपत्ती निर्मिती ही स्वत:च्या पैशानं करायची नसते ही महत्त्वाची जाणीव आता वाढत्या मॉल वगैरेतून दिसू लागलीये. मराठी माणूस आता भांडवली बाजारात पैसे गुंतवू लागलाय आणि महत्त्वाचं म्हणजे अर्थकारणाकडे चांगलं लक्ष देऊ लागलाय.
पण कर्ज हा माणसाच्या मूलभूत प्रेरणांपैकी एक घटक होता? आणि कर्जाचा जन्म नक्की कधी झाला? पैशाचा जन्म झाल्यानंतर? मग पैसाच नव्हता तेव्हा माणसं कर्ज कशी घ्यायची? आणि कशाची? परतफेडीचं काय? म्हणजे एखाद्यानं एखाद्याकडनं बकरी किंवा गाय किंवा घोडा कर्ज म्हणून घेतला तर त्याची तो परतफेड कशी करायचा? याचा अर्थ तसं असेल तर आधुनिक अर्थव्यवस्था जन्माला यायच्या आधी कर्ज जन्माला आली असं म्हणायला पाहिजे.
डेव्हिड ग्रेबर हेच म्हणतो. त्याच्या ‘डेट : द फर्स्ट ५००० इयर्स’ या भल्याथोरल्या ग्रंथात. अर्थव्यवस्थेकडे नव्या चष्म्यातून पाहावं असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे ते अर्थशास्त्र जाणणाऱ्या कोणा ढुढ्ढाचार्यानं लिहिलेलं नाही. म्हणजे डेव्हिड हा अर्थतज्ज्ञ वगैरे नाही. तो आहे प्राध्यापक. पण मानववंशशास्त्राचा. लंडन विद्यापीठाच्या गोल्डस्मिथ महाविद्यालयात तो मानववंशशास्त्र शिकवतो. त्याची आधीची पुस्तकंही याच विषयावरची आहेत. ती काही मी वाचलेली नाहीत. पण अर्थाशी संबंध आहे म्हणून हे मात्र मिळवून वाचलं. डेव्हिडचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. म्हणजे.. इतिहासात संस्कृती दोनच गटात विभागलेली होती. ऋणको आणि धनको..गुलाम संस्कृतीचा उदय याच्या पुढच्या टप्प्यात झाला.. पाच हजार वर्षांपूर्वीही कृषक संस्कृतीचा जन्म होत असताना उत्तम पतव्यवस्था विकसित झालेली होती.. वगैरे.
बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा उदय होत असताना दोन संकल्पना होत्या. एकीनुसार आपण जन्माला येताना आपले आपण आलेलो असतो आणि कोणाचंही काहीही देणं लागत नाही. दुसऱ्या टोकाला मुद्दा असतो तो असा की जन्माला येतानाच प्रत्येकाच्या डोक्यावर त्या त्या व्यवस्थेचं, सरकारचं कर्ज असतंच असतं. ते आपण कधीही फेडू शकत नाही. हे दोन विचारप्रवाह परस्परविरोधी दिशांनी वाहत असल्याचं मानलं जातं. पण डेव्हिडला हे मान्य नाही. त्याचं म्हणणं असं की व्यवस्थेनं.. म्हणजे सरकारनं बाजारपेठ ही संकल्पना जन्माला घातली..नंतर बाजारपेठेनं या व्यवस्थेला पोसलं. हे दोन्ही घटक परस्परपूरक आहेत आणि एकाशिवाय दुसरा राहू शकत नाही.
डेव्हिडचं असंही म्हणणं आहे की कोणताही समाज तीन घटकांच्या सरमिसळीतूनच बनलेला असतो. साम्यवाद, देवाणघेवाण आणि उतरंड. सामाजिक चलन असा एक प्रकार तो मांडतो. म्हणजे पैसा जेव्हा जन्माला यायचा होता, त्याच्या आधी माणसं आपापल्या मालकीच्या कोंबडय़ा, बदकं  वगैरे देवाणघेवाणीत व्यवहार करायची. मग सोनं-चांदी आली आणि नंतर पैसा. प्रचलित अर्थशास्त्रीय समजुतीत बाजारपेठ आणि सरकार या दोन परस्परविरोधी संस्था मानल्या जातात. डेव्हिडला ते अमान्य आहे. त्याचं म्हणणं बाजारपेठ ही संकल्पनाच मुळी जन्माला आली ती सरकारमुळे. तशी व्यवस्था असणं सरकारसाठी सोयीचं होतं आणि बाजारपेठेसाठी सरकारचं असणं सोयीस्कर होतं. डेव्हिडचं हे मत एकदा मान्य केलं की मुक्त बाजारपेठ असं काही असूच शकत नाही, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. ते करायचं की नाही हा मुद्दा नंतरचा. पण डेव्हिड त्या बाबत आपल्याला विचार करायला लावतो एवढं नक्की. आणि मुख्य म्हणजे आर्थिक घडामोडींकडे अर्थशास्त्रबाहय़ दृष्टिकोनातून पाहणं कसं गरजेचं आहे, तेही कळतं. तो ही सगळी मांडणी करताना बेसलाईन कम्युनिझम.. उंबरठय़ावरचा साम्यवाद.. असा एक शब्दप्रयोग करतो. ती संकल्पना समजून घेणं रंजक आहे. त्याच्या मते सर्व बाजारपेठांच्या मुळाशी हा उंबरठय़ावरचा साम्यवाद आहे आणि बाजारपेठ म्हणजे परस्पर साहय़ आणि गरजा आणि पुरवठा यांच्या संयोगाची अभिव्यक्ती. हे सगळं उलगडत जाताना तो वेगवेगळय़ा सत्ता, कार्ल मार्क्‍स वगैरे अनेकांचा ऊहापोह करतो.
कळसाध्याय आहे तो सार्वत्रिक कर्ज रद्द करण्याच्या टप्प्याचा. कजरेत्सव म्हणतो तो त्याला. बॅबिलॉन संस्कृतीच्या काळात म्हणे अशी प्रथा होती. वर्षां दोन वर्षांत कधी राजा सगळय़ांची कर्जे माफ करायचा आणि ज्यांच्या डोक्यावर ती कर्जे असायची त्यांना मुक्ती दिली जायची. ही प्रथा पुन्हा सुरू केली तर डेव्हिडचं म्हणणं अनेक गोष्टी नव्यानं सुरू करता येतील. हा पर्याय अर्थातच ज्यांनी कर्जे दिली त्यांच्याकडून दिला जायला हवा. ज्यांच्या डोक्यावर कर्जे आहेत त्यांनी तो मागायचा नाहीये किंवा कर्जाची परतफेड थांबवायचीही नाहीये. हा मुद्दा जरा गुंतागुंतीचा झालाय, पण त्यामुळे वाचायला मजाही येते.
शिवाय डेव्हिडची शैलीही रोखठोक म्हणता येईल अशीच आहे. अर्थात असं काही लिहायचं तर शैलीही तशीच हवी. कारण आधीच विषयाचं अनवटपण. त्यात शब्दांच्या वेलांटय़ावर्तुळात लेखक अडकला तर सगळं प्रतिपादन हवेतल्या हवेतच राहायचं आणि वाचकाच्या डोक्यात काही शिरायचंच नाही, असं व्हायची शक्यता. तसं या बाबत होत नाही, हे या पुस्तकाचं वेगळेपण.
समाजाची रचना, बांधणी, काहींचा विनाश या सगळय़ाच्या मुळाशी अर्थकारण असतं. बऱ्याचदा आपण कारणं अन्यत्र शोधतो आणि अर्थकारणाकडे दुर्लक्ष करतो. ती चूक टाळायची असेल तर अर्थकारणाचा आवाका लक्षात घ्यायलाच हवा. त्याशिवाय बाकी सगळं चिंतन अर्धवट आहे. ते पूर्ण करायचं असेल तर डेव्हिडसारख्या अर्थशास्त्रबाहय़ मंडळींची अनेक पुस्तकं यायला हवीत.
 हे असे चष्मे बदलत राहाणं चांगलंच असतं. तसं करताना मध्येच कुठल्या तरी चष्म्यातून एकदम लख्ख दिसायला लागतं. डेव्हिडचं पुस्तक हे असं आहे.  
डेट – द  फर्स्ट  ५००० इयर्स : डेव्हिड ग्रेबर,
प्रकाशक – पेंग्विन अ‍ॅलन लेन,
पाने : ५३४, किंमत : ७९९ रुपये.