कुक्कुटपालन व्यवसायात कोंबडय़ांना रोग होईल या भीतीमुळे त्यांच्या पाण्यात प्रतिजैविके मिसळली जातात. शिवाय, त्यांचे वजन वाढावे यासाठी प्रतिजैविके मिसळलेले अन्न त्यांना दिले जाते असे (प्रस्तुत लेखिकेचा संबंध असलेल्या) एका संस्थेच्या नवी दिल्लीतील पाहणीत आढळून आले. अनेक कुक्कुटपालन उद्योगांत हीच पद्धत वापरली जाते. माणसांवर प्रतिजैविके आता काम करीत नाहीत, जिवाणू त्यांच्या वापराने मरत नाहीत अशी स्थिती आहे; याला कुक्कुटपालन व्यवसायातील अन्ननिर्मितीच्या या अनिष्ट पद्धतीने मोठा हातभार लावलेला असू शकतो..
आपले अन्न दिवसेंदिवस अनारोग्याला आमंत्रण देणारे ठरत आहे. याचे कारण केवळ हेतुपुरस्सर केलेली भेसळ हे नसून आपण ते असुरक्षित पद्धतीने उत्पादित करीत आहोत हे आहे.
मी आता काय खाऊ? ते असुरक्षित असेल का? असे प्रश्न प्रत्येक वेळी आम्हाला विचारले जातात, त्यामुळे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट या संस्थेने अन्नातील विषे या विषयावर अभ्यास केला. ही खरी गोष्ट आहे, की आपले अन्न असुरक्षित होत चालले आहे, पण ते केवळ हेतुपुरस्सर केलेल्या भेसळीने असुरक्षित होते असे आपल्याला वाटत असेल तर तो भ्रम आहे. आपण अन्न उत्पादन करतानाच ते असुरक्षित पद्धतीने करतो, मग प्रश्न उरतो, की या परिस्थितीत आपण काय करायचे? भारतात निदान अन्नासाठी विविध पर्याय तरी आहेत. औद्योगिक पातळीवर अन्न उत्पादनाची आपल्याकडे अजून सुरुवात व्हायची आहे. त्यात जीवनमान व अन्नाचा दर्जा यांना महत्त्व नसते. मग आपण ही सगळी परिस्थिती बदलू शकत नाही का? आपण जीवनमान सुरक्षित करणाऱ्या पोषक आहाराचा हक्क मागू शकत नाही का? या वेळी आम्ही कोंबडय़ांमधील प्रतिजैविकांचा म्हणजे अँटिबायोटिक्सचा अभ्यास केला. सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट या संस्थेने दिल्लीच्या राजधानी परिसरातील कोंबडय़ांचे वेगवेगळ्या बाजारपेठांतून ७० नमुने घेतले. जेव्हा त्यांचे विश्लेषण केले तेव्हा प्रत्येक कोंबडीत सहा प्रकारची प्रतिजैविके आढळून आली. त्यात ऑक्सिटेट्रासायक्लिन, क्लोरटेट्रासायक्लिन, डॉक्सिसायक्लिन (वर्गीकृत टेट्रासायक्लिन), एनरोफ्लॅक्सिन व सिप्रोफ्लॉक्सिन (वर्गीकृत फ्लुरोक्विनोलोन्स) व निओमायसीन या अमिनोग्लायकोसाइड यांचा समावेश होता. ही सर्व प्रतिजैविके ही माणसासाठी घातक होती. आपण आजारी पडलो तर हीच घातक रसायने औषधे ठरतात, त्यामुळे डॉक्टरही प्रतिजैविके देत असतात.
आपणा सर्वाना हे माहीत झाले असेल, की कुठल्याही रोगांवर परिणाम करण्याची या प्रतिजैविकांची क्षमता संपली आहे. आता आपण प्रतिजैविकोत्तर काळाकडे वाटचाल करीत आहोत. या काळात प्रतिजैविकासारखी एके काळी जादूसारखी मानली जाणारी औषधे काम करणार नाहीत. त्याचबरोबर कुठल्याही नवीन वर्गातील प्रतिजैविक गेल्या वीस वर्षांत शोधून काढण्यात आलेले नाही. याचा अर्थ असा नाही, की अशा घातक उपचारपद्धती आपण वापरल्याच पाहिजेत. आपल्यावर प्रतिजैविकांचा जरुरीपेक्षा जास्त मारा आजारी पडल्यानंतर केला जातो, त्यामुळे शेवटी जिवाणूंवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नाही. जिवाणू हे प्रतिजैविकांचे रोधक बनतात म्हणजे त्यांना ते दाद देत नाहीत. परिणामी, प्रतिजैविकांचा उपचारपद्धतीतील एक औषध म्हणून प्रभाव संपतो. आपण जास्त प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर करतो आहोत याचे भान आणून देतानाच आणखी एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे, की जे अन्न म्हणजे कोंबडी वगरे आपण खातो त्यात प्रतिजैविकांचा वापर केलेला असतो. आम्ही दिल्लीत जो अभ्यास प्रकल्प हाती घेतला होता त्यात असे दिसून आले, की कोंबडय़ांना वाढवतानाच त्या वजनदार व धष्टपुष्ट बनाव्यात यासाठी त्यांना प्रतिजैविके खाऊ घालण्यात आली आहेत. आम्ही जे ७० नमुने गोळा केले होते त्यातील ४० टक्के म्हणजे दर दुसऱ्या कोंबडीत प्रतिजैविकांचा वापर केला गेला होता व त्याचे अंशही आम्हाला सापडले आहेत. किमान १७ टक्के नमुन्यात एकापेक्षा जास्त प्रतिजैविके आम्हाला सापडली. ती कोंबडय़ांचे स्नायू, मूत्रिपड व यकृत या भागांत सापडली. कोंबडय़ांमध्ये सापडलेली प्रतिजैविके व मानवात प्रतिजैविके निष्प्रभ ठरण्याचा जवळचा संबंध आहे. आम्हाला कोंबडय़ांमध्ये जी प्रतिजैविके आढळून आली त्याच प्रतिजैविकांचा वापर रुग्णालयांमध्येही केला जातो व तेथे रुग्णांमध्ये जिवाणूजन्य रोगांवर त्यांचा काही परिणाम होत नसल्याचे पुरावे आहेत. आतापर्यंत तेरा अभ्यास अहवालांत हे स्पष्ट झालेले आहे. हा काही योगायोग नाही तर एक घातक सत्य आहे.
मग आता पुन्हा प्रश्न पडतो, आपण काय करायचे? कुक्कुटपालन उद्योगांनी प्रतिजैविकविरहित कोंबडय़ा पुरवण्याचा आग्रह धरावा का? आणि ते शक्य आहे का?
खरी गोष्ट अशी, की कुक्कुटपालन व्यवसायात प्रतिजैविकांचा वापर हा कोंबडय़ांच्या रोगांवर केला जात नाही, तर त्यांना काही रोग होईल या भीतीने केला जातो. अतिशय कमी जागेत या कोंबडय़ा कोंबलेल्या असतात. तेथील परिस्थिती अनारोग्याला, संसर्गाला आमंत्रण देणारी असते, त्यामुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी पिण्याच्या पाण्यात प्रतिजैविके फवारतात व कोंबडय़ांमध्ये रोगाची साथ येऊ नये यासाठी काळजी घेतात. त्यांनी कोंबडय़ांच्या रूपात अन्न तयार करण्याची जी पद्धत स्वीकारली आहे त्याचा हा परिणाम आहे.
एवढेच नाही, तर कुक्कुटपालन उद्योग नफ्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करतात. प्रतिजैविके असलेले अन्न कोंबडय़ांना देतात त्यामुळे त्यांचे वजन वाढते. या परिणामामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात प्रतिजैविके विकत घेतात व ते कोंबडय़ांच्या अन्नात मिसळतात, किंबहुना अगोदरच प्रतिजैविके मिसळलेली असतील तर असे अन्न आणून कोंबडय़ांना खायला देतात. काही कुक्कुटपालन उद्योग कोंबडय़ांचे प्रतिजैविकमिश्रित खाद्य तयार करून वर असा दावा करतात, की त्यामुळे ब्रॉयलर चिकनचे वजन वाढेल आणि ते तसे का करतात, कारण कुक्कुटपालन उद्योगात प्रतिजैविकांचा वापर करण्यावर कोणतेही र्निबध नाहीत. सरकारने आतापर्यंत या विषयावर काय केले असेल? तर त्याचे उत्तर काही गुळमुळीत, परिणामहीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली हे आहे. प्राण्यांमध्ये प्रतिजैविकांचा वापर कमी प्रमाणात करावा, अशी सूचना त्यात केली आहे. कुक्कुटखाद्याबाबत भारतीय विशेष मानक संस्थेने असे म्हटले आहे, की कोंबडय़ांची वाढ होण्यासाठी म्हणून प्रतिजैविकांचा वापर करू नये; पण ही अट कुक्कुटपालन उद्योगांना अनिवार्य नाही. त्यामुळे कोंबडय़ांमध्ये प्रतिजैविकांचा वापर वाढत राहतो व आपले आरोग्य धोक्यात घातले जाते.
पुन्हा तोच प्रश्न. मग या प्रश्नावर करायचे तरी काय? यावर उत्तर म्हणजे आपण आपले पुढचे धोरण ठरवताना काळजी घेतली पाहिजे. अन्नाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यासाठी काही नियमांचा अवलंब केला पाहिजे. तीन पर्याय आपल्यापुढे आहेत एक म्हणजे अमेरिकेचा मार्ग स्वीकारणे. तेथे कुक्कुटपालन उद्योगात कोंबडय़ांच्या वाढीसाठी प्रतिजैविके वापरण्यावर नियंत्रण नाही, पण कोंबडीच्या कुठल्या भागात किती प्रमाणात व किती प्रकारच्या प्रतिजैविकांचे अंश सापडावेत यावर मर्यादा घालून दिल्या आहेत. कोंबडीचे यकृत, स्नायू व मूत्रिपड यात ते किती प्रमाणात असावेत हे ठरवून दिले आहे. दुसरा मार्ग म्हणजे डेन्मार्क, स्वीडन व इतर काही देशांचे अनुकरण करता येईल. तिथे प्रतिजैविकांचा वापर कुक्कुटपालन व्यवसायात करण्यावर र्निबध आहेत. काही प्रतिजैविके प्राण्यांमध्ये वापरण्यावर बंदी आहे. आपण आपल्याकडचे आरोग्य व जीवनमान लक्षात घेऊन आणखी चांगला दृष्टिकोन यात अवलंबू शकतो, तो केवळ आपलाच पर्याय असेल. चला, यावर विचार तर करायला लागू या.