तब्बल ३६ वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या रॉबिन गुप्ता यांचे हे आठवणीपर पुस्तक, ‘अँड व्हॉट रिमेन्स इन द एन्ड – द मेमॉयर्स ऑफ अ‍ॅन अनरिपेंटंट सिव्हिल सर्व्हट’. प्रशासकीय सेवा ही त्यांच्यासाठी जणू आनुवांशिक बाब म्हणावी लागेल. त्यांचे वडील ब्रिटिश लष्करात वैद्यकीय अधिकारी म्हणून मोठय़ा हुद्दय़ावर होते. त्यांच्या आईचे वडील, मामा यांनीदेखील त्यावेळच्या आयसीएस सेवेत कारकीर्द केली. त्यांच्या आईने प्रशासकीय सेवेची अप्रत्यक्ष अनुभूती मुलगी, पत्नी म्हणून आयुष्यभर घेतली. त्यांनी मुलाला या सेवेचे बाळकडू तर पाजलेच, त्याचबरोबर वेळोवेळी मोलाचे सल्लेही दिले.
या पाश्र्वभूमीवर गुप्ता यांची जडणघडण झाली. त्यांची आया इंग्लिश होती. घरात फक्त इंग्रजीतून संभाषण चालत असे. शिक्षण बोर्डिग स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते लगेच प्रशासकीय सेवेत दाखल झाले. ‘बाबालोग ते लाटसाब’ अशी त्यांची वाटचाल झाली. अँग्लोइंडियन कुटुंबांमधील तरुणांसारखी त्यांची स्थिती होती. त्यांना भारत समजावून घेण्याची अनिवार ओढ होती. प्रशासकीय अधिकारी आणि संवेदनशील व्यक्ती, कवी या भूमिकांमधून त्यांची भारत अनुभवण्याची प्रक्रिया सुरू राहिली. नंतर ते भारतीय संस्कृतीच्या प्रेमातच पडले.  
गुप्ता यांच्या धमन्यांमधून लेखकाचे रक्त वाहते, असे प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नमूद केले आहे. त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानांमधून येतो. वाचकांशी संवाद साधणाऱ्या शैलीत ते आपल्या आठवणी सांगतात. नर्मविनोद, किश्श्यांमुळे त्या खुसखुशीत वाटतात.
भारतीय नोकरशाहीचा गेल्या चाळीस वर्षांतील लेखाजोखा या दष्टिकोनातून प्रस्तुत आठवणींकडे पाहिल्यास मात्र आपली काहीशी निराशा होते. लेखकाने असा लेखाजोखा मांडल्याचा दावा केला असला तरी तो फारसा प्रत्यक्षात उतरलेला नाही. कारण भारतीय नोकरशाहीबद्दल ते काहीही नवे सांगत नाहीत. ज्या किमान गोष्टी तुम्हा-आम्हाला वर्तमानपत्रांच्या वाचनातून माहीत झालेल्या असतात, त्यांचीच पृष्टी गुप्ता करतात.
देशाला एक ठेवण्यात भारतीय प्रशासकीय सेवेचा वा आयएएसचा लक्षणीय वाटा आहे. मात्र, या नोकरशाहीत शिरलेले दोष, तिचे अवमूल्यन, राजकीय हस्तक्षेप या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. गुप्ता यांनी पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरयाणा आणि पंजाब या चार राज्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून त्यांना आलेल्या अनुभवांचा तपशील मांडला आहे इतकेच. भ्रष्टाचार, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी होणाऱ्या बदल्या, राजकीय नेत्यांचे अधिकाऱ्यांकडून होणारे लांगूलचालन याचे त्यांना आलेले अनुभव त्यांनी नोंदवले आहेत. सेवेत असताना त्यांनी खाबूगिरी केली नाही तसेच काही विधायक करण्याचा प्रयत्न केला हे या आठवणींमधून जाणवते. मात्र, त्यांना या सेवेत फारसे काही वेगळे  करता आलेले नाही. तसे काही केल्याचे त्यांचेही म्हणणे नाही. मात्र राजकीय नेत्यांची खुशामत आपण केली नाही, हा त्यांचा दावा त्यांनीच दिलेल्या तपशिलाला छेद देणारा वाटतो. दिल्लीत एका क्लबमध्ये झालेल्या भांडणानंतर त्यांची बदली पुन्हा बंगाल केडरमध्ये करण्यात आली होती. पण, त्यांनी घडला प्रकार तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे रदबदली केल्यावर ती रद्द झाली. नंतरच्या टप्प्यात विद्याचरण शुक्ल यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी शिफारशीसह त्यांना त्यावेळचे हरयाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्याकडे पाठवले. यातून त्यांना हरयाणात पद मिळाले, असे गुप्ता यांनी स्वत:च नमूद केले आहे.
गुप्ता यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षवेधक विशेष या आठवणींमधून ठळक होतात. ते भरपूर दारू पितात आणि मोकळेपणाने तसे सांगूनही टाकतात. दारू पिऊन पोलिसांशी मारामारी झाल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला आहे. ते नपुसंक असल्याचा आरोप करून त्यांची पत्नी घटस्फोटाचा दावा करते. त्याचा फारसा तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. त्यांची एकुलती एक बहीण अमेरिकेत स्थायिक होते. ते आणि त्यांची आई एवढेच त्यांचे कौटुंबिक जीवन. आई शंभर वर्षे जगली. तिचा प्रभाव त्यांच्यावर अथपासून इतिपर्यंत पडलेला दिसतो. हे पुस्तकही त्यांनी तिलाच अर्पण केले आहे. गुप्तांनी  आईचे धोरणी व्यक्तिमत्त्व नेटकेपणाने उभे केले आहे. गुप्ता वा त्यांच्या आईचे जीवन तसे एकाकीपणाचे. नोकरशाहीतही आपण उपरेच राहिलो, असे त्यांनी म्हटले आहे. पण याबद्दल त्यांनी गळा काढून लिहिलेले नाही. वाटय़ाला आलेल्या जगण्याचा त्यांनी समंजसपणे स्वीकार केलेला आहे. त्यांनी आपली  निरीक्षणे नर्मविनोद आणि काव्यात्मकतेने नोंदवली आहेत. एक नोकरशहा म्हणून त्यांनी सांगितलेल्या आठवणींपेक्षाही भारत आणि भारतीयांबाबतची त्यांची निरीक्षणे अधिक वेधक वाटतात.
थोडक्यात, वाटय़ाला आलेल्या जगण्याबद्दल खेदभावना नसलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने आपल्या  आठवणींतून माणूसपणच वाचकांपुढे उघड केले आहे.  पण  पुस्तकाच्या शीर्षकात उल्लेख झालेली ती श्रीशिल्लक काय, हा गुप्ता यांना पडलेला प्रश्न पुस्तक वाचल्यानंतर आपल्यालाही पडतो. मात्र असे असले तरी, भारतीय असूनही इंग्रजी मातृभाषा असलेल्या एका जरा हटके व्यक्तिमत्त्वाचा होणारा परिचय आणि त्याला दिसलेला गेल्या चार दशकांमधील भारत, याचे काही कवडसे या पुस्तकातून वाचकावर पडतात. सहजसोप्या शैलीमुळे पुस्तक वाचनीय आणि वेधक झाले आहे.     

अँड व्हॉट रिमेन्स इन द एन्ड  –  द मेमॉयर्स ऑफ अ‍ॅन अनरिपेंटंट सिव्हिल सर्व्हट :
रॉबिन गुप्ता,  
रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : २८७, किंमत : ३५० रुपये.