सम या संकल्पनेनं भारतीय संगीत व्यापून गेलं आणि पाश्चात्त्य संगीताचं आगमन होऊन ते स्थिरावेपर्यंत अढळ राहिलं. परकीय संगीतातही लय या कल्पनेचं स्थान महत्त्वाचंच, पण समेला तिथं स्थान नाही. आवर्तन असलं, तरीही संपूर्ण संगीत त्यात बांधण्याची व्यवस्था नाही..संगीत सादर करणारे जसे त्या समेच्या प्रेमात पडतात तसेच ते ऐकणारे रसिकही. त्यामुळेच सम ही एक अपूर्व कल्पना शून्य या संकल्पनेएवढीच महत्त्वाची आणि अर्थपूर्ण ठरली.

तानांच्या भेंडोळ्या सुरू आहेत.. रसिक अचंबित होऊन ऐकत आहेत.. कलावंत आपली सगळी तालीम पणाला लावत समेवर येऊन असा काही ‘लॅण्ड’ होतो, की ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपण तिथं असल्याचं, त्या क्षणाला साक्षीदार असल्याचं सार्थक झाल्याचं समाधान मिळावं. अभिजात संगीताच्या मैफलीत हमखास अनुभवायला येणारा हा आनंद या संगीताचं जसं वेगळेपण सांगतो, तसंच भारतीय अभिजात संगीतानं जगाला दिलेल्या एका अपूर्व योगदानाचं वर्णनही करतो. भारतीय संगीत कशाकशात सामावलं आहे, याचं उत्तर शोधायचंच ठरवलं, तर खूप गोष्टी सापडतील. त्यात स्वरांचं महत्त्व असेल, अनेक स्वरांचं एकमेकांशी असलेले नातेसंबंध असतील, त्या नात्यातून उलगडणारे अनोखे भावबंध असतील, ते स्वर गुंफून तयार होणारी स्वरमाला आणखी एका तालमालेत अलगदपणे गुंतून पडल्याने निर्माण होणारा अवकाशाचा वेध असेल.. असं बरंच काही महत्त्वाचं आणि संगीताच्या अगदी मुळाशी जाणारं. गळ्यात स्वर आहेत, म्हणून ते सौंदर्यपूर्णतेने व्यक्त  करणं आणि त्यातून मनातलं काही व्यक्त करणं एवढय़ापुरतंच सीमित असलेल्या संगीताच्या व्यवहारात, तालाचं आगमन झाल्यावर केवढा तरी बदलला. हा बदल हेतुत: होता, यात तर शंकाच नाही. पण त्यानं स्वरांच्या सौंदर्याला कोंदण मिळालं. हे कोंदण हेच मग सौंदर्याचं प्रतीक ठरलं. माणसाच्या मनातलं संगीत बहकण्याच्या स्थितीत असताना अवचितपणे या तालानं भारतीय संगीतात प्रवेश केला आणि त्याला आपल्या काबूत ठेवलं. वरचष्मा दाखवण्यासाठी नाही, तर त्याला अधिक गहिरा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी. हा अर्थ त्या तालातून प्रतीत होणाऱ्या लयीत सामावलेला असतो. ही लय त्या स्वरपूर्ण संगीताला हळूच उंच झोके घ्यायला लावते आणि ते सारं संगीतच लयपूर्ण होऊन जातं. लयीचं हे भान जगातल्या सगळ्या संगीत परंपरांना आलेलं होतंच. एकमेकांशी संवाद साधण्याची कोणतीही व्यवस्था नसताना पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या कलावंतांना (कदाचित अन्य ठिकाणी असं काही घडतंय, याची पुसटशीही जाणीव नसताना) लयीचं हे भान आलं. कुणी त्याचा संबंध आईच्या उदरात असताना ऐकलेल्या ठोक्यांशी जोडला, तर कुणी निसर्गाच्या लयबद्ध कालक्रमाशी. लय हे संगीताचं अविभाज्य अंग झालं आणि संगीताच्या मुक्त आविष्काराला एक परीघ मिळाला. हा परीघ त्या आविष्काराची मर्यादा ठरवणारा होता. पण भारतीय संगीतानं, त्याही पुढे जाऊन लयीचा हा विचार आणखी ठोसपणे व्यक्त केला. लय आणि ताल या दोन्ही गोष्टी निसर्गत: एकाच नाण्याच्या दोन बाजू. पण तरीही त्यात मुक्तता आणि बांधलेपणा यांचा समावेश करण्यासाठी लय अधिक खोलात जाऊन समजून घेण्याची आवश्यकता भारतीय संगीतकारांना वाटली. त्यांनी लयीला अधिक जवळून पाहायचं ठरवलं आणि त्यातून त्यांना अचंबित करणारे शोध लागले. न्यूटन, आर्किमिडीज किंवा स्टीफन हॉकिंग्ज यांच्या शोधाएवढेच महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण. लयीला अर्थ प्राप्त करून देण्याच्या या धडपडीतून ताल या कल्पनेला जन्म मिळाला आणि मग लय नावाची कल्पना अधिक स्पष्ट झाली. एका विशिष्ट क्रमानं कोणतीही गोष्ट घडत असताना, त्यातील लय आपल्याला अनुभवता येऊ लागली होतीच. पण तिला अधिक रेखीव आणि सुस्पष्ट करण्याची गरज भारतीय संगीताप्रमाणे जगातील अन्य संगीत परंपरांना का वाटली नसेल? लयीत घोळलेलं संगीत आणि तालबद्ध संगीत यातला हा फरक भारतीय संगीतानं अगदी जाणीवपूर्वक विकसित केला आणि कदाचित त्यामुळेच या संगीताला जगाच्या संगीत परंपरेत स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करता आलं. तालाची संकल्पना कुणी निर्माण केली, त्यामध्ये कुणी एवढी प्रचंड भर घातली, त्यामध्ये नवनव्या शैली कुणी विकसित केल्या आणि हे सगळं स्वरांनी तयार होणाऱ्या संगीताला कुणी जोडलं, या प्रश्नांची अचूक उत्तरं कुणालाच माहीत नाहीत. तरीही परंपरेनं पोहोचणाऱ्या या कल्पनेत सर्जनशीलतेने भर घालणाऱ्या प्रत्येकानं ती अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. तालाची अफाट दुनिया निर्माण करणाऱ्यांनी लयीचं गणित शोधून काढलं. मात्रा म्हणजे बीट्स ही संकल्पना शोधली. त्या मात्रांचा हिशोब लावत चार मात्रांपासून ते २८ मात्रांची आवर्तनं तयार केली. त्या आवर्तनांनाच ताल असं संबोधून त्यातून मात्रांचा सौंदर्यपूर्ण गणिती आविष्कार करण्याचं तंत्र तयार केलं.
तबल्याची म्हणून स्वतंत्र भाषा तयार केली. धा, धिं, तिं, तिरकिट, किटगद, गदीगन यांसारख्या नादाच्या उच्चारांशी साधम्र्य राखणारी ही भाषा. प्रारंभ, मध्य आणि अंत असं स्वरूप असणारे हे ताल स्वत:च्या नादातून संगीत निर्माण करत राहिले. प्रारंभ आणि अंत एकाच बिंदूत (प्रारंभ िबदू म्हणजे सम आणि अंत बिंदू म्हणजेही सम) सामावलेली ही तालपद्धत जगातल्या सर्वच संगीतरसिकांना भुरळ पाडणारी ठरली. तालांच्या या वेगवेगळ्या आकाराच्या आवर्तनामुळे सौंदर्यनिर्मिती करण्यासाठी अधिक आव्हान मिळालं आणि करामतीबरोबरच अभिजाततेलाही स्थान मिळालं. तालाचं हे विश्व इतकं व्यापक आणि अपूर्व आहे की त्यामध्ये आयुष्यभर डुंबत राहिलं, तरी हातात मूठभरच सौंदर्यकण यावेत.
संगीताला या तालानं एक ‘फ्रेम’ दिली. ही चौकट लयीमध्ये सिद्ध होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतरच या ‘फ्रेम’चा शोध सुरू झाला असणार. नाद हाच जर संगीताचा आत्मा असेल, तर या तालासाठी असणाऱ्या वाद्यानंही या नादाचाच पुरस्कार करायला हवा, अशी एक पूर्वअट आपोआप तयार झाली. कलावंताच्या गळ्याचा वा वाद्यातील नादाचा सहोदर म्हणूनच तालवाद्यातून निर्माण होणारा नाद वागायला लागला. सम ही या दोहोंच्या संकरातून निर्माण झालेली एक अपूर्व अशी घटना ठरली, ज्यामुळे आवर्तन हा संगीताचा गाभा ठरला. वर्तुळाकार रचनेत संगीताची बांधणी झाली आणि त्यातून सम या एका अचंबित करायला लावणाऱ्या सौंदर्यस्थळाचं अस्तित्व जाणवायला लागलं. कवितेमध्ये ध्रुवपद जे कार्य करतं, तेच संगीतात बंदिशींच्या रचनांनी केलं. स्वरांच्या जोडणीतून तयार झालेल्या एका गोलाकार स्वरवाक्यात जागोजागी असणाऱ्या सौंदर्यनिर्मितींच्या जागांचा परमोच्च बिंदू म्हणून सम स्थापित झाली. तिनं स्वत:चं एक वेगळेपण सिद्ध केलं आणि भारतीय अभिजात संगीतात अढळपद मिळवलं. बंदिश म्हणजे स्वरवाक्य. ते म्हणण्यासाठी शब्दांचा आधार. त्या शब्दांमधील अ, आ, ई यांसारख्या वर्णाचा सांगीतिक वापर करत ते स्वरवाक्य अधिक कलात्मक करण्यासाठीचा एक प्रयोग. या बंदिशीतल्या त्या समेपाशी येण्यासाठी धडपडणारे सारे स्वर लयीशी खेळत खेळत त्या समेवर येऊन उतरतात. हे उतरणं जितकं सौंदर्यपूर्ण तितकं ते संगीत उत्कट. पूर्ततेची आस असणारी ही सम म्हणजे भारतीय संगीतातील एक ढळढळीतपणे दिसणारा आणि टळू न शकणारा सौंदर्याचा आविष्कार.
संगीताच्या सादरीकरणातील एक ठसठशीत अलंकार. संगीतनिर्मितीला पूर्णत्वाचं समाधान देणारा आणि तरीही स्वत:चा बडिवार न माजवणारा. सम या संकल्पनेनं भारतीय संगीत व्यापून गेलं आणि पाश्चात्त्य संगीताचं आगमन होऊन ते स्थिरावेपर्यंत अढळ राहिलं. परकीय संगीतातही लय या कल्पनेचं स्थान महत्त्वाचंच, पण समेला तिथं स्थान नाही. आवर्तन असलं, तरीही संपूर्ण संगीत त्यात बांधण्याची व्यवस्था नाही. अभिजात संगीतानं मात्र अजूनही ही व्यवस्था उखडून टाकण्याचा विचारही केलेला नाही. संगीताचा आविष्कार घडत असताना स्वरांच्या माध्यमातून जे सांगायचं आहे, त्याला समांतर असलेल्या तालाच्या मात्रांची बांधीलकी अद्याप अमान्य झाली नाही. कारण पुन:पुन्हा येणाऱ्या या समेमुळे भारतीय संगीताचं सौंदर्य अधिकाधिक खुलत असल्याचा साक्षात्कार येत राहतो. स्वरांच्या लडी उलगडत असताना, समेवर येण्याची आस कलावंत आणि रसिक या दोघांच्याही अंतर्मनात घुमत राहते, हेच तर त्याचं वैशिष्टय़. हवीहवीशी वाटणारी, लुडबुड न करणारी ही सम हेच तर या संगीताचं वेगळेपण. संगीत सादर करणारे जसे त्या समेच्या प्रेमात पडतात तसेच ते ऐकणारे रसिकही. त्यामुळेच सम ही एक अपूर्व कल्पना शून्य या संकल्पनेएवढीच महत्त्वाची आणि अर्थपूर्ण ठरली.
संगीत न कळणाऱ्यालाही सहजपणे प्रेमात पडायला लावणारी आणि आपलं अस्तित्व जाणवून देणारी ही सम आपल्या सगळ्यांच्या जगण्याचाही असाच अविभाज्य भाग होऊन जाते. जगणं अधिक सार्थ झाल्याची ही भावना व्यक्त करणारी ही सम म्हणूनच पुन:पुन्हा यावी असं वाटत राहतं.