स्वर आणि लयीच्या या बंधनात राहूनही सतत नवं करण्याच्या या ध्यासातून संगीत सतत नवे अर्थ शोधत राहतं. कलावंत आणि प्रत्येक रसिक यांच्यासाठी हे अर्थ सारखेच असतील, अशी शक्यताही कमी. पण संगीतात डुंबणाऱ्या प्रत्येकाला हे नक्की ठाऊक असतं, की मला जे जाणवतंय, ते तसंच शेजारी बसलेल्या रसिकाला किंवा कलावंतालाही जाणवत असेलच असं नाही. समूहात राहूनही एकलेपणा जपणारं संगीत म्हणून अन्य सगळ्या कलांच्या तुलनेत अधिक अमूर्त आणि अधिक अर्थगर्भ.
एकाच कलाकृतीत अनेक अर्थाना सामावून घेणारी कला दुर्मीळ. कोणतीही कलाकृती पाहणं, ऐकणं, वाचणं या कृतीमध्ये आधीपासूनच तयार झालेले ग्रह असतात. चित्रकलेतील रंग आणि रेषा, साहित्यातील शब्दांचे वापरून वापरून समजलेले अर्थ आणि त्यांच्या छटा, नृत्यातील हावभावांचे अर्थ, शिल्पकलेतील आकारांचं सौंदर्य यांसारख्या गोष्टी समजून घेताना ती कलाकृती अनुभवण्याआधी कितीतरी काळ आपण वेगवेगळ्या प्रकारचा ‘गृहपाठ’ नकळत करत असतो. संभाषणात नव्यानं ऐकलेल्या शब्दांचा अर्थ आपण त्याच्या परिसरातील शब्दांच्या उपयोगावरून शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा जेव्हा तो शब्द ऐकतो, तेव्हा शब्दकोश न पाहताही आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळायला लागलेला असतो. निसर्गातील रंग चित्रामध्ये येताना आपल्याला नव्यानं रंगज्ञान करून घेण्याचीही आवश्यकता वाटत नाही. शब्द जेवढे नेटके आणि थेट, तेवढेच शिल्पातील आकारही. संगीतात मात्र नेमकं उलटं घडतं. प्रत्येक स्वराला स्वत:चा अर्थ नाही. तो स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व दाखवू शकत असला, तरी त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी शेजारीपाजारी असलेल्या आणखी काही स्वरांची मदत घ्यावी लागते. अशा स्वरांच्या समुदायातून त्यातील प्रत्येक स्वराला अर्थ मिळतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतानाही त्यात आणखी काही गोष्टी मिसळल्या जातात. ‘नाही’ या शब्दाचा अर्थ एकदा कळला, की तो संदर्भ बदलले तरी बदलत नाही, हे आपल्या आपोआप लक्षात यायला लागतं. त्यासाठी आपल्याला वेगळी धडपड करावी लागतच नाही. पण संगीतात किंवा अमूर्त चित्रकलेत असंच घडेल, असं नाही सांगता येत. म्हणजे लाल रंगाची म्हणून जी काही प्रतिमा आपल्या मनात असेल, त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थानं एखाद्या चित्रात त्या रंगाचा वापर केला असेल तर पहिल्यांदा आपण बुचकळ्यात पडतो. मग जरा विचार करायला लागतो. त्या रंगाच्या वापराचा हेतू शोधू लागतो आणि स्वत:पुरता त्याचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नांना सुरुवात होते. नंतर कधीतरी असंही लक्षात येतं, की आपल्याला ते चित्र जसं वाटतं आहे, तसंच ते दुसऱ्याला वाटत नाहीये. पण आपण आपल्या मतावर ठाम असतो. तसे ठाम असण्यात अजिबातच गैर नाही. कारण तो अर्थ आपल्या स्वत:च्या मेंदूत साठवलेल्या अब्जावधी गोष्टींच्या सरमिसळीतून निर्माण झालेला असतो.
अमूर्ताकडून समूर्ताकडे जाणं हा कलेचा धर्म नसतो. कलेला तिच्या मूळ रूपातच राहायला आवडत असतं. त्यातच तिला नवे धुमारे फुटत असतात आणि नवे अर्थही मिळत असतात. ज्या गोष्टीला परंपरागत अर्थ नसतात, ती गोष्ट प्रत्येकालाच वेगवेगळ्या रीतीनं आवडणार किंवा आवडणार नाही. ज्यानं आयुष्यात कधीच गाणं ऐकलेलं नाही, त्यानंही जन्मल्यापासून विविध आवाज तर ऐकलेलेच असतात. त्या आवाजांचे अर्थही तो साठवत राहिलेला असतो. बाहेर पाऊस पडतोय, हे त्याला जसं आवाजावरून कळतं, तसंच हाक कोणी मारली, हेही त्याला कळायला लागतं. हे आवाज ऐकलेले असले आणि त्यांची पुरेशी ओळख असली, तरीही हेच आवाज संगीतात जेव्हा स्वर म्हणून ऐकायला येतात, तेव्हा असं लक्षात येतं, की हे माहीत असूनही न कळणारं आहे. मग आपण आधीच्या अनुभवाच्या आधारे त्या स्वरांचा माग काढायला लागतो. असं करता करता एक नवाच अनुभव गाठीशी येतो. तो आपल्या जाणिवा समृद्ध करतो आणि दरवेळी आपल्याला नवनव्या अर्थाचा शोध लागू लागतो. संगीतातली हीच गंमत कदाचित माणसाला पुन:पुन्हा खुणावत असावी. त्यामुळे पुन्हा ऐकण्याचा मोह अनावर होतो आणि आधी ऐकलेलं तेच संगीत पुन्हा ऐकताना नवी समज येऊ लागते. हे सगळं मोठं गमतीचं असलं, तरीही ते संगीत निर्माण होण्यासाठीही काही ठरवलेले नियम असतातच. म्हणजे संगीतात काहीही उद्योग केलेले चालत नाहीत. मजा म्हणून किंवा चूष म्हणून कुणी असं काही नियमबाहय़ केलंच, तर ते झटकन बाहेर फेकलं जाण्याची शक्यताही अधिक.
संगीतातले नियम आणि शास्त्र निसर्गाच्या मदतीनं तयार होत असतं. हा निसर्ग संगीतात जेवढा मुरत जातो, तेवढं ते संगीत अधिक प्रमाणात आवडण्यास मदत होते. निसर्गाच्या विविध चमत्कारांचं सौंदर्यात रूपांतर करणाऱ्या कलावंतांनी त्याचं शास्त्र तयार करताना त्यातील सोपेपणावरच कायम भर दिला. रागसंगीताच्या आधी उपजलेल्या लोकसंगीतात तर या निसर्गाचा प्रभाव ठायीठायी दिसतो. संगीत सादर करणारा आणि ऐकणारा अशा दोघांनाही निसर्गाचे अर्थ शोधण्याची एक उपजत बुद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळे संगीत ऐकताना आपण याच बुद्धीचा वापर करून आनंद मिळवत असतो. जिथं कशालाही थेट, एकच एक आणि स्पष्ट अर्थ नाही अशी दुर्मीळ गोष्ट म्हणजे स्वर. ते निर्मळ असतात आणि त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व घडवण्यात मुळीच रस नसतो. ती त्यांची गरजही नसते. ते सगळे स्वर आहेत तिथं समाधानात आणि खुशीत असतात. पण जेव्हा ते एकमेकांत गुंतायला लागतात, तेव्हा त्यांच्यात तयार होणारे भावबंध मोठे रंजक होतात. एकमेकांत विरघळून जातानाही ते निसर्गनियमांचंच पालन करतात आणि तसं झाल्याशिवाय ते मिसळणं पूर्णही होत नाही. हे सगळं ऐकणाऱ्यानं समजून घेण्याची आवश्यकताच नसते. त्याला ते आपोआप कळत असतं. भलतेच दोन स्वर एकमेकांसमोर आणून उभे ठाकले, तर ऐकणाऱ्यालाही तो संकर अस्थानी असल्याचं सहज लक्षात येतं. ऐकणाऱ्यानं म्हणूनच संगीताचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नसते. त्यानं फक्त ऐकत राहिल्यानं त्याच्या क्षमता वाढत असतात. त्यातून त्याला संगीतात दडून बसलेल्या अर्थाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते. तेच संगीत पुन:पुन्हा ऐकताना जेव्हा त्याला नवे अर्थ उलगडायला लागतात, तेव्हा त्याला एकटय़ाला होणारा आनंद अवर्णनीय असतो. हा अनुभव शब्दांना चिकटलेल्या अर्थाच्या पुटांपलीकडे जाणारा असतो. तेच त्याचं आंतरिक समाधान असतं आणि तेच तर पुन:पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नांना तो लागतो. जे ऐकणाऱ्याच्या बाबतीत घडतं. त्याहून अधिक वेगळं ती कला निर्माण करणाऱ्या कलावंताच्या बाबतीत घडत असतं. सतत स्वरांच्या सान्निध्यात राहूनही तो सतत नव्या कल्पनांना जन्म देण्याच्या प्रयत्नात असतो. असं करून पाहू या, तसं केलं तर काय होईल, अशा प्रश्नांनी त्याची कलात्मक शक्ती भारून गेलेली असते. दररोज असं नवं काही घडत नाही, म्हणून तो खट्टू होत नाही की मनमीलन होत नाही. हा शोध घेता येणं म्हणजेच कलावंत असणं. नवं काही सुचावं, यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना नसते. ते आपोआप घडत असतं. घडावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपयोग होण्याची शक्यता जशी फार अल्प, तशीच ते कधी, कसं आणि कोणत्या पद्धतीनं सापडेल, याची अटकळ बांधणंही कठीण.
कलावंत असणं हे म्हणूनच फार थोडय़ांच्या वाटय़ाला येणारं. स्वरांना एकत्र आणताना कलावंताला मात्र निसर्गनियमांचं पालन करणं भाग असतं. म्हणजे त्या स्वरांची एकमेकांशी लग्नं लावताना त्याला बुद्धीनं विचार करावा लागतो. त्यातून सौंदर्याची निर्मिती होते आहे की नाही, हे सतत पडताळून घ्यावं लागतं. त्यामुळे रागसंगीतातील राग या कल्पनेच्या अधीन राहून नवं काही कलात्मक घडवत राहणं, हे अधिक मोठं आव्हान ठरतं. रागाचे स्वर, त्यांची नाती तर ठरलेली आहेत. त्यात बदल केला, तर नवाच राग निर्माण होण्याची शक्यता. तोच राग पुन:पुन्हा गाताना, त्याच स्वरांचे नवे अर्थ जेव्हा उमगायला लागतात, तेव्हा त्या कलावंतामध्ये असलेली कल्पनाशक्ती टवटवीत व्हायला लागते. जे स्वरांचं, तेच लयीचं. स्वर आणि लयीच्या या बंधनात राहूनही सतत नवं करण्याच्या या ध्यासातून संगीत सतत नवे अर्थ शोधत राहतं. कलावंत आणि प्रत्येक रसिक यांच्यासाठी हे अर्थ सारखेच असतील, अशी शक्यताही कमी. पण संगीतात डुंबणाऱ्या प्रत्येकाला हे नक्की ठाऊक असतं, की मला जे जाणवतंय, ते तसंच शेजारी बसलेल्या रसिकाला किंवा कलावंतालाही जाणवत असेलच असं नाही. समूहात राहूनही एकलेपणा जपणारं संगीत म्हणून अन्य सगळ्या कलांच्या तुलनेत अधिक अमूर्त आणि अधिक अर्थगर्भ. प्रत्येक कलेला संगीत का व्हायचं असतं, याचं कदाचित हेही एक कारण असू शकेल.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?