हृदयी देवाचं नव्हे, ‘मी’ आणि ‘माझे’चंच चिंतन आहे. परमात्मलयतेऐवजी जगद्लयतेनं अंत:करण व्यापलं आहे, म्हणून आत सततचा कोलाहल सुरू आहे. तो थांबविण्यासाठीच तर मौनाभ्यास आहे, या मुद्दय़ावर आल्यावर काही क्षण शांतता पसरली. ज्ञानेंद्रच्या चेहऱ्यावरही खोल विचारात बुडाल्याचे भाव होते. योगेंद्र काही बोलू पाहात होता, तोच हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – मौनाचं महत्त्व जाणण्यासाठी आधी आपली खरी मूळस्थिती आणि आत्ताची स्थिती पाहिली पाहिजे. आज आपण दुनियेत पूर्ण गुंतलो आहोत. हे अशाश्वत जग शाश्वत, स्थिर आधार देऊच शकत नाही. तरीही या जगातच शाश्वत आधार मिळविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जो अहोरात्र धडपडत आहे, या दुनियेला आपल्या अनुकूल बनवण्याच्या धडपडीत गुंतला आहे, त्याचंच अंत:करण द्वंद्वात्मक प्रतिक्रियांनी सदोदित डचमळत असतं. दुनिया आज डोक्यावर घेईल, उद्या खाली फेकेल. दुनिया आज स्तुती करील, उद्या निंदा करील. या दुनियेसाठी, या भ्रामक दुनियेतला स्वत:चा नावलौकिक जपण्यासाठी किती तळमळ.. तगमग.. असं मन कसला मौनाभ्यास करणार? कसलं देवाचं चिंतन करणार?  
योगेंद्र – ओहो! फकिरबाबा सांगत त्याचा अर्थ आता कळतोय!
कर्मेद्र – हॉस्टेलला असताना तू जायचास तो म्हातारा? आम्हाला भीतीच वाटली होती की तू आता धर्म बदलतोस की काय!
योगेंद्र – (हसत आणि क्षणार्धात गंभीर होत) परमात्म्यावर प्रेम करणाऱ्यांचा धर्म एकच असतो, हे मला तेव्हा कुठे कळत होतं? हृदूमुळे थोडं थोडं कळू लागलं.. फकिरबाबा म्हणायचे, ‘जो दुनिया के लिए खुला है, वह खुदा का बंदा हो ही नहीं सकता!’
हृदयेंद्र – किती सुंदर! मन, चित्त, बुद्धीचे दरवाजे सताड उघडे आहेत आणि त्यातून जगच आत येतंय.. मनात सारखे जगाचे विचार, चित्तात जगाचीच अडगळ, बुद्धीही जगाच्याच विचारात गढलेली.. त्यातच आपण जप करणार, योग करणार, भजन करणार.. दिल्लीला जायचंय, पण सारखी कन्याकुमारीची गाडी पकडतोय! वर म्हणतोय, काय करावं? कितीदा गाडी पकडली, किती प्रवास केला, पण दिल्ली काही येतच नाही! किती जप करतो, ध्यान करतो, भजन करतो.. अजून काहीच साधत का नाही? साधना कशासाठी आहे, साध्य काय आहे, ध्येय काय आहे, हेच माहीत नाही, मग साधना तरी ध्येयकेंद्रित, साध्यकेंद्रित कशी होणार? दिल्लीला जायचं ध्येय पक्कं असेल तर कन्याकुमारीच्या गाडीत कुणी बसेल का?
योगेंद्र – खरंच आपण प्रत्येकजण काही ना काही साधना करतो, पण त्या साधनेचं ध्येय जाणतो का?
हृदयेंद्र – माझा केवळ सद्गुरुंवरच पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांचा बोध जीवनात उतरला पाहिजे, हीच साधना आहे, असं मी मानतो. पण कधीकधी वाटतं, त्यांच्या बोधाचा खरा हेतू मी जाणतो का? जो अत्यंत कर्मठ आहे त्याला ते कर्मकांड सोडायला सांगतील, जो काहीच करीत नाही त्याला कुठल्या तरी कर्मकांडात गुंतवतील, तेव्हा त्यांचा बोध सार्वत्रिक असला तरी प्रत्येकासाठी त्याचा विशेष हेतू असतोच. हा हेतू कोणता? योगा, ज्ञान्या तुम्ही साधना कशाला मानता?
योगेंद्र – मी नेमक्या शब्दांत सांगू शकणार नाही. मला असं वाटतं की, ही जी विराट सृष्टी आहे तिचं चलनवलन कशाच्या आधारावर सुरू आहे? तर केवळ शक्तिच्या आधारावरच चराचरातली सर्व घडामोड आहे. हीच मूळ शक्ती आपल्यातही विद्यमान आहे. ती जागी करणं हीच साधना आहे. ज्ञान्या तुला काय वाटतं?
ज्ञानेंद्र – माझा देवाधर्मावर तितकासा विश्वास नाही. मला ठामपणे वाटतं की जगण्यात जो काही गोंधळ आहे तो केवळ अज्ञानामुळे आहे. देवही आपण जाणत नाही, मग त्याची भक्ती तरी कशी जाणणार? त्यामुळे शुद्ध ज्ञानाच्या आधाराशिवाय आपण जे काही करतो तो सर्व अडाणीपणाच आहे. ज्ञान जागं झाल्याशिवाय अज्ञानातून सुटका नाही.
हृदयेंद्र – थोडक्यात, भक्ती, योग किंवा ज्ञानोपासना काय! सारं काही एकच आहे! अंतर्बाह्य़ अर्थात आत आणि बाहेरची सर्व विसंगती, सर्व द्वंद्व संपून एकस्थिती येणं, यासाठीच तर सर्व साधना आहे. संकुचितपणातून मुक्त होत व्यापक होण्यासाठीच, बंध तोडण्यासाठीच साधना आहे. कारण आपली मूळस्थिती तीच आहे! मुक्त!!
चैतन्य प्रेम