भाजपमध्ये आयाराम-गयाराम संस्कृती नवी नाही. मात्र ती महाराष्ट्रात भाजपमध्ये तरी फारशी नव्हती. आता ती रुजली, हे या निवडणुकीने दाखवून दिले. झेंडा रोवण्याचे किंवा पोहोचलाच नव्हता अशा ठिकाणी तो पोहोचवण्याचे मनसुबे आयारामांमुळे पूर्ण झाले आणि बळही वाढले..
‘भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती एक विचारधारा आहे. ही विचारधारा स्वीकारून त्यानुसार आपले राजकीय वर्तन ठेवण्याची ज्यांची तयारी असेल, त्यांनाच या पक्षात प्रवेश दिला जातो,’ असे वक्तव्य महाराष्ट्रातील निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्याच दरम्यान भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने एका खासगी दूरवाणी वाहिनीवरील एका मुलाखतीत केले होते. या वक्तव्याला महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेल्या पक्षप्रवेशांच्या रांगांचाच संदर्भ असावा. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे तारू जोरात असल्याचा आणि काँग्रेस आघाडीचे जहाज बुडण्याच्या बेतात असल्याचा अंदाज या जहाजांवरून वर्षांनुवर्षे प्रवास करणाऱ्या अनेक दिग्गजांना आलाच होता. राजकीय वादळाच्या या काळात भाजपचेच तारू सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्रात भाजपमध्ये प्रवेशेच्छूंच्या रांगा लागल्या होत्या, पण त्यांना ताटकळत ठेवून भविष्यावर डोळा ठेवण्याचा धूर्तपणा त्या वेळी भाजपने दाखविला. कारण, राज्यात शिवसेनेशी असलेल्या युतीचे काय करायचे याचा निर्णय तोवर झालेला नव्हता. युती तोडायची आणि स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जायचे अशी मानसिकता प्रबळ झालेली होती, पण युती तोडण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य निमित्त मिळाले नव्हते. तरीही, पक्षप्रवेशाच्या रांगेतील अनेकांची तोवर ताटकळण्याची तयारीही होती. अखेर युती तुटली आणि पक्षाची दारे उघडली गेली. भाजपमध्ये आयारामांची रीघ लागली, तेव्हा सारे राजकीय निरीक्षक आणि प्रतिस्पर्धीदेखील आ वासून त्याकडे पाहू लागले. भाजपने परपक्षांतील अनेक बदनामांनाही सामावून घेत जणू पावन करण्याचा सपाटाच सुरू केला होता. राज्यात असलेल्या काँग्रेस आघाडीपासून महाराष्ट्राला मुक्ती देण्याची केंद्रीय नेत्यांची आकांक्षा जणू अशा पद्धतीने पूर्ण केली जाऊ लागली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वादग्रस्त आणि वजनदारांनाही पक्षात दाखल करून घेऊन या दोन पक्षांना विकलांग करणे हाच जणू प्रदेश भाजपचा ‘काँग्रेसमुक्ती’चा कार्यक्रम होता. तसा समज विरोधकांकडून पसरविलादेखील जात होता.
पण भाजपने त्याला फारसे महत्त्व दिले नाही. भाजपचे संघ परिवारासोबतचे नाते आणि पक्षाची विचारधारा यांचा निरपेक्ष स्वीकार करण्याची अट घालूनच या सर्वाना पक्षात प्रवेश दिला गेला, असेही झाले नाही. कारण भाजपसमोर बहुधा केवळ एकच निकष होता. तो म्हणजे, निवडून येण्याची क्षमता. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधील अशाच नेत्यांना प्राधान्याने पक्षात घेण्याचा सपाटा सुरू झाला तेव्हाच शिवसेनेसोबतची युती तोडण्याची ही नियोजनबद्ध पूर्वतयारी आहे हे स्पष्ट होऊ लागले होते. महाराष्ट्रातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या वेळी हा प्रयोग फारसा रुचलेला नव्हता. पण राज्याला काँग्रेसमुक्त करावयाचे असल्याने कराव्या लागणाऱ्या राजकीय पूर्वतयारीचाच हा अपरिहार्य भाग आहे, हे त्या कार्यकर्त्यांना पटवून देण्यात आले आणि नाराजी शमली. भाजपच्या सुरक्षित तारूचा आसरा घेत ५० हून अधिक आयारामांनी निवडणुकीच्या िरगणापर्यंत धाव घेतली.
आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, भाजपची ही चाल किती यशस्वी आणि खरी ठरली याचा धांडोळा घेण्याची वेळ आली आहे. भाजपच्या गोटातही त्याचे विश्लेषण सुरू झाले आहे. खरे तर, आयाराम-गयारामांचे राजकारण राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवरही भाजपला अजिबात नवे नाही. भाजपमध्ये दिग्गजांच्या रांगेत बसलेल्या अनेकांनीही हा प्रयोग अनेकदा केलेला आहे. नरेंद्र मोदी यांची कर्मभूमी असलेल्या गुजरातेत तर भाजपमध्ये अनेक वर्षांपासून हीच संस्कृती रुजलेली आहे. एके काळी मुख्यमंत्रिपद भूषविलेले कांशीराम राणा आणि गुजरातेतील भाजपमध्ये वडीलधारी भूमिका बजावणारे केशुभाई पटेल यांनीही पक्षत्याग केला होता. केशुभाईंची ‘गयाराम’ म्हणूनही गणना झाली, आणि ते ‘आयाराम’ही झाले. कर्नाटक भाजपमध्ये तर, येडियुरप्पांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी अनेकवार आयाराम-गयारामांच्या भूमिका वठविल्या. उत्तर प्रदेशचे एके काळचे मुख्यमंत्री कल्याणसिंहदेखील आयाराम-गयाराम झाले, आणि केंद्रात मंत्रिपद भूषविणाऱ्या उमा भारती यादेखील या पंथाची यात्रा करून आल्या. राम जेठमलानी यांनी तर किती पक्ष बदलले याला गणनाच नसावी. तरीदेखील ‘भाजप नेते’ हेच या नेत्यांचे ‘अंतिम रूप’ राहिले. कदाचित त्यामुळेच, त्यांनी राजकीय कोलांटउडय़ा मारल्यावर भाजपमध्ये कोणाच्या भुवया फारशा उंचावल्या नव्हत्या.
महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र खूपच वेगळी राहिली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ज्या कोलांटउडय़ा मारल्या गेल्या, त्यामागे ‘भवितव्याची चिंता’ हेच कारण होते. ते कारण जसे पक्षांतरासाठी आसुसलेल्या व्यक्तीसाठी होते, तसेच संबंधित पक्षांसाठीही होते. एकटय़ा भाजपमध्येच नव्हे, तर शिवसेनेनेही या काळात अनेक आयारामांना ‘शिवबंधन धागे’ बांधून त्यांच्यासाठी पायघडय़ा अंथरल्या होत्या. भविष्यातील सत्ताकारणाचे मजबुतीकरण हाच त्यामागचा उद्देश होता. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील एक मोठा ओघ भाजपकडे, तसेच या दोन पक्षांतील मूळच्या शिवसैनिकांचा ओघ परत शिवसेनेकडे सुरू झालेला होता.
याच हिशेबांची उत्तरे आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधून सर्व पक्षांना मिळाली आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून राम कदम यांनी निवडणूक लढविली आणि त्यांनी आमदारकी राखली. राष्ट्रवादीच्या मंदा म्हात्रे भाजपमध्ये गेल्या आणि त्यांनी गणेश नाईकांचा बालेकिल्ला भेदून आमदारकीही मिळवली. आर. आर. पाटील यांच्या बांधलेल्या मतदारसंघात त्यांच्याशी झुंजविण्यासाठी घोरपडे सरकारांना भाजपने गळाला लावले, त्याआधी लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पक्षात घेण्याची खेळीही भाजपने केली. कोकणात राष्ट्रवादीची सद्दी संपली हे अगोदरच ओळखून शिवसेनेत दाखल होताना व्यक्तिगत भविष्य सुरक्षित करून घेण्याचाच उदय सामंत यांचा विचार होता. म्हणजे, पक्षांतरे करणारे नेते आणि त्यांना सामावून घेणारे राजकीय पक्ष या दोघांनीही, केवळ स्वबळ वाढविण्याचा किंवा राखण्याचाच विचार प्राधान्याने केला. वैचारिक बांधीलकी हा त्या त्या वेळी केल्या जाणाऱ्या राजकीय कृतीच्या उदात्तीकरणाचा केवळ मुलामा असतो, हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
भाजपमध्ये आयाराम-गयाराम संस्कृती नवी नाही. मात्र ती महाराष्ट्रात फारशी नव्हती. आता ती महाराष्ट्रातही रुजली, एवढाच याचा अर्थ आहे. पायघडय़ा अंथरून पक्षात घेतलेल्यांचा संख्याबळाच्या राजकारणासाठी फारसा उपयोग झालेला नाही. अनेक दिग्गजांना मतदारांनी नाकारले असले, तरी नव्या नव्या मतदारसंघांमध्ये झेंडा रोवण्याचा हेतू मात्र यातून शिवसेना तसेच भाजपने साध्य केला. काही ठिकाणी झेंडे फडकले, तर काही ठिकाणी झेंडे केवळ पोहोचले. आता त्याच झेंडय़ांची काठी हाती धरून तेथे पाय रोवण्याचे प्रयत्न होणार हे स्पष्ट आहे. आयारामांचे सुरक्षित भवितव्याचे हेतू बरेचसे साधले आणि आकडय़ांच्या चिंतेत असलेल्या भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही थोडाफार दिलासा मिळाला.
फळाफुलांनी बहरलेल्या, हिरव्यागार, डेरेदार वृक्षांवरच माकडांची वस्ती असते, असे गमतीने म्हटले जाते. याचे संदर्भ अनेक ठिकाणी तंतोतंत लागू होतात. निवडणुकीच्या राजकारणात, महाराष्ट्रात फुटलेले आयाराम-गयारामांचे पेव पाहता, या सिद्धान्ताशी कुणाला साधम्र्य वाटले, तर त्यात आश्चर्य नाही.
dinesh.gune@expressindia.com