अन्यायाच्या कारणांकडे डोळ्याला डोळा भिडवून पाहण्याऐवजी ही कारणे दुर्लक्षित ठेवून प्रतिमाच जपली जाण्याची शक्यता बळावते, तेव्हा लोक त्यास दुटप्पीपणा म्हणतात. परंतु आपण भारतीय लोक आपली प्रतिमा इतकी पराकोटीने जपतो की, याला दुटप्पीपणा म्हणणारेच चुकीचे कसे आहेत, हे आपण पटवून देऊ लागतो. ‘इंडियाज डॉटर’ या लेस्ली उद्विन यांनी बनविलेल्या वृत्तपटाला भारतातून गेल्या तीन दिवसांत जे किमान तीन धक्के बसले आहेत, तेही आपण आपली प्रतिमा अबाधित राखण्यासाठी काय काय करतो याचे निदर्शक आहेत. बलात्कारासारख्या घटनांकडे अथवा त्याविषयीच्या चर्चाकडे सनसनाटी म्हणून पाहू नये, ही नैतिकता आपल्या प्रसारमाध्यमांना मान्य आहे की नाही, हा प्रश्न पाडणारा धक्का यापैकी पहिला होता. दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२च्या घटनेवर आधारित ‘इंडियाज डॉटर’ हा वृत्तपट ऐन आंतरराष्ट्रीय महिला दिनी, ८ मार्च रोजी प्रसारित करण्याची संधी एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीने घेतली आहे.  ‘हा पहा- एक बलात्कारी गुन्हेगार काय बोलतो आहे ऐका..’ अशा स्वस्त प्रकाराने या वृत्तपटाची प्रसिद्धी करण्यात आली. दुसरा धक्का नैतिकतेच्या स्वयंघोषित राखणदारांकडून आला. ‘या वृत्तपटाच्या दिग्दर्शिकेला तिहार तुरुंगाच्या आत जाण्याची परवानगी मिळालीच कशी?’ वगैरे प्रश्न पुढे आले. पण भारतीय पुरुषाच्या तोंडून ‘ती गप्प राहिली असती तर प्रकरण वाढले नसते’ अशा अर्थाचे काहीबाही दिल्ली बलात्काराबद्दल ऐकवले जाते आहे, हा राग येण्याजोगा भाग होता. संस्कृतीच्या राखणीचे काम आणखी निर्वेध करण्यासाठी मग या वृत्तपटाच्या प्रदर्शनावर बंदीच घालावी, अशी मागणी पुढे आणण्यात आली. तिसरा आणि केंद्रीय गृह खात्याकडून मिळालेला मोठा धक्का असा की, खरोखरच वृत्तपटाच्या प्रदर्शनावर बंदीचे पाऊल उचलण्यात आले. या तिसऱ्या धक्क्याचा एक उपधक्काही आहे.. दिल्लीतील एका स्थानिक न्यायालयाकडे बुधवारी सकाळी, त्या वृत्तपटाच्या प्रदर्शनास ऐन वेळी परवानगी नाकारणे वैध की अवैध, हा प्रश्न नेण्यात आला असता न्यायालयाने  यत्किंचितही वेळ न दवडता गृहमंत्रालयाची बाजूच योग्य असल्याचा निर्वाळा दिला. हे आत्यंतिक जलदगती न्यायदान झाले कसे, याचा उलगडा पुढे संसदेतील एका निवेदनातून होऊ शकला आहे. हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.. किंवा विरोधक ‘या मुद्दय़ाचे राजकारण करतात’ म्हणून राजनाथ यांना निवेदन करावे लागले. या निवेदनात त्यांनी या वृत्तपटाचे प्रदर्शन रोखले जाण्यासाठी जी काही कारणे दिली आहेत, ती सांस्कृतिक, नैतिक, लिंगभाव-आदराधिष्ठित वगैरे अजिबात नाहीत. ती पूर्णपणे तांत्रिक आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्यांना व्यक्त होण्याचा अधिकार असतो, पण त्याच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाहीत ना याच्या छाननीसाठी वृत्तपटकार लेस्ली उद्विन यांच्यावर, तुरुंगात केलेल्या चित्रणाच्या सर्व असंपादित प्रती तुरुंगाधिकाऱ्यांना देण्याची अट घालण्यात आली होती. ती उद्विन यांनी पाळली नाही म्हणून प्रदर्शन रोखले, एवढेच गृहमंत्र्यांना म्हणायचे आहे. लेस्ली यांनी या प्रकारांना प्रत्युत्तर दिले नसले तरी, ‘मीदेखील एक बलात्कारिता आहे.. अत्याचारी मनोवृत्तीला उघडे पाडणे, हे मी माझे कामच मानते’ हे त्यांचे शब्द अंतर्मुख व्हावयास लावणारे आहेत.. अर्थात, तयारी असेल तर!