रांचीच्या राजपुत्राने लॉर्ड्सवर डौलाने तिरंगा फडकवला. २८ वर्षांनी घडलेल्या या इतिहासाचा तमाम भारतीयांना अभिमान वाटला. महेंद्रसिंग धोनीने कपिलदेवच्या पावलांवर पाऊल टाकून या सुवर्णक्षणांची अनुभूती दिली. कपिलने १९८३मध्ये इंग्लिश भूमीवर विश्वचषक जिंकून क्रिकेटविश्वाला आश्चर्यचकित केले होते. वेस्ट इंडिजचे जगज्जेतेपदावरील वर्चस्व भेदून ते यश मिळवले होते. लॉर्ड्सच्या गॅलरीत कपिलसेनेने झळाळता विश्वचषक उंचावला आणि भारताचे क्रिकेट सूर्याप्रमाणेच तेजाने तळपू लागले. मग तीन वर्षांनी कपिलच्याच नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या पंढरीत पहिल्यावहिल्या कसोटी विजयाचाही टिळा लावला. धोनीनेही नेमक्या याच अंतराने, २०११च्या विश्वविजेतेपदानंतर तीन वर्षांनी लॉर्ड्सवर कसोटीविजयाचा करिश्मा दाखवला. त्यामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन कसोटींनंतर भारत १-० अशी आघाडी घेऊन आहे, ही परिस्थिती नक्कीच चांगली आहे. कारण २०११मध्ये भारतीय संघाने याच संघाविरुद्धचे ओळीने चारही कसोटी सामने गमावले होते. त्या मानहानीकारक पराभवानंतर धोनीच्या कर्णधारपदावरही टीका झाली. सध्याच्या कसोटी संघातील बरेचसे खेळाडू नवखे आहेत. कसोटी क्रिकेट आणि इंग्लिश वातावरण याविषयीचा त्यांचा अनुभव कमी आहे. त्या तुलनेत २०११चा संघ अधिक बलवान होता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची फळी भारतीय संघात होती. परंतु भारतीय क्रिकेटला कसोटी क्रिकेटमधील अग्रस्थान मिळवून देणारा तो संघ इंग्लिश भूमीवर गळपटला. अनेक खेळाडू जायबंदी होऊन माघारी परतले. नेमक्या त्याच अपयशानंतर भारतीय क्रिकेटमध्ये संक्रमण सुरू झाले. कसोटी मालिकेत ४-० अशी हार पत्करण्याचा कित्ता भारताने मग ऑस्ट्रेलियातही गिरवला. आता सचिन, द्रविड, लक्ष्मण हे कसोटी क्रिकेटचे तारणहार भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरून लुप्त झाले आहेत. पण तरी ‘नवे आहेत, पण छावे आहेत’ हे गमक भारतीय संघाने जोपासले. फिफा विश्वचषकविजेत्या जर्मनीच्या संघात ख्रिस्तियानो रोनाल्डो किंवा लिओनेल मेस्सी नव्हता, अगदी नेयमारसुद्धा नव्हता. परंतु जग जिंकण्याची विजिगीषू वृत्ती होती आणि सांघिक विजय मिळवून देण्याची किमया साधणारे असंख्य किमयागार खेळाडू होते. भारताच्या ताज्या यशातही हीच गोष्ट दिसून येते. वीरेंद्र सेहवाग संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडतो आहे, तर गौतम गंभीर राखीव सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये आहे. परंतु मुरली विजयने कसोटी क्रिकेटची गरज समजून दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आपली भूमिका चोख बजावली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार यांनी इंग्लिश खेळपट्टय़ांचे गणित अचूक साधले आहे. भुवी समर्थपणे फलंदाजीही करताना दिसतो आहे. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात भारताची फलंदाजी सावरणारे सुरेख शतक साकारले, तर रवींद्र जडेजाचे अष्टपैलुत्व ही सारी सांघिक कामगिरी भारताच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच हा सोनेरी दिवस समस्त भारतवासीयांसाठी पर्वणी ठरला. २०११मध्ये भारताला नामोहरम करणाऱ्या खेळाडूंपैकी अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस, ग्रॅमी स्वान, केव्हिन पीटरसन, टिम ब्रेसनन, इयान मॉर्गन या संघात नाहीत. त्यामुळे इंग्लंडचा संघसुद्धा तसा फारसा अनुभवी नव्हता. या मालिकेतील पहिल्या कसोटीत जेम्स अँडरसनने जडेजाला मैदानावर धक्काबुक्की केली आणि अपशब्द वापरले, त्यामुळे दुसऱ्या कसोटीचे वातावरण चांगलेच तापले होते. तरीही इंग्लिश कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने मात्र अँडरसनला दूर करण्यासाठी हा भारतीय संघाने कट शिजवला असा प्रत्यारोप केला. यावर धोनीनेही कुकला मर्यादा सोडू नये, असे खडे बोल सुनावले. या कटू भांडणाचा निकाल आयसीसीचे अधिकारी देतीलच. परंतु २०११मध्ये इंग्लिश भूमीवरच भारताचे कसोटीतील अग्रस्थान खालसा झाले होते, आता ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रवास सुरू झाला आहे!