सायास करून जिद्दीने, प्रयत्नाने होणाऱ्या फलप्राप्तीचा आनंद काही वेगळाच असतो. हा आनंद मंगळवारी बंगळुरूत आपले तिमाही आर्थिक निकाल घेऊन पत्रकारांना सामोरे गेलेल्या विशाल सिक्का यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसला. नित्यनवीन करीत राहा आणि नवीनीकरणाचा ध्यास धरा, हे तसे खूपच साधे-सरळ व्यवसाय सूत्र; पण तोच ज्ञानाधारित भांडवल गाठीशी असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजसारख्या जगड्व्याळ पसारा फैलावलेल्या कंपनीला कलाटणी देणारा यशमंत्र ठरला. यापूर्वीच्या तिमाही दर तिमाहीतील भिकार कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर इन्फोसिसची सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीतील कामगिरी खासच उठावदार! उल्लेखनीय म्हणजे तिने आपली नजीकच्या स्पर्धक आणि त्यांच्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या टीसीएसला गत दोन वर्षांत पहिल्यांदाच पिछाडीवर टाकले आहे. टीसीएसने दोन आठवडय़ांपूर्वी जाहीर केलेल्या निकालांनी केलेल्या निराशेमुळे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तिच्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या इन्फोसिसच्या कामगिरीबाबत विशेष उत्सुकता होती. महसुलवाढीत इन्फोसिसने टीसीएसला स्पष्टपणे मात दिली आहेच, पण नवीन ग्राहक हस्तगत करण्यासह, कर्मचाऱ्यांच्या गळतीला पायबंद या पलूंबाबतही ती वरचढ ठरली आहे. याचे श्रेय सर्वस्वी कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि सिक्का यांच्या नेतृत्वकौशल्याला जाते. सिक्का यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने जाहीर केलेल्या तिसऱ्या तिमाही कामगिरीनेच कायापालटाची प्रचीती द्यावी, हे त्यांनी अवलंबिलेल्या ‘रिन्यू अ‍ॅण्ड न्यू’ डावपेचाची फलश्रुती असल्याचे आता स्पष्ट होत आहे. इन्फोसिसच्या अव्वल १० ग्राहक कंपन्या या अमेरिकेतील आहेत. गेल्या पाच वर्षांत प्रथमच इन्फोसिसच्या या १० बडय़ा ग्राहकांचा एकूण महसुलातील वाटा उंचावला आहे. सरलेल्या तिमाहीतील उभय कंपन्यांच्या महसुलातील वाढ डॉलरमध्ये मोजायची झाल्यास, टीसीएसच्या बाबतीत ही वाढ ३.५ टक्क्यांची आहे, तर त्याउलट इन्फोसिसने ४.५ टक्क्यांनी वाढ साधली आहे. रुपयाच्या प्रमाणात तर ही महसुली वाढ १२.४ टक्क्यांची आहे. आगामी काळात कंपनीला डॉलरमधील महसुलात ७.२ टक्के ते ९.२ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता दिसून येते. असा दमदार भविष्यवेध टीसीएसने आत्मविश्वासाने मांडलेला नाही, हाच दोहोंतील ठळक फरक आहे. सिक्का यांच्या आजवरच्या कारकीर्दीत जे आढळून आले, त्याप्रमाणे सरलेल्या तिमाहीतही इन्फोसिसने १५ नवीन बडय़ा ग्राहक कंपन्या हस्तगत केल्या आहेत. नव्या आवर्तनात प्रवेश केलेली इन्फोसिस म्हणूनच आगामी वर्षांत भारतातील आऊटसोìसग क्षेत्रात आपले अग्रमानांकित स्थान पुन्हा प्राप्त करील, असे सिक्का मोठय़ा गर्वाने म्हणू शकले आहेत. दोन्हींच्या प्राप्तीतील तफावत ही सध्या जेमतेम ९ टक्क्यांची उरली आहे. दोन्ही बाजूंनी सातत्य राखले गेले – टीसीएसकडून सरासरी अपेक्षापूर्तीत तुटीचे आणि इन्फोसिसकडून उभारीचे, तर ही दरीही लवकरच भरून निघेल. कॉर्पोरेट जगतातील चुरस ही खेळीमेळीची असली तरी तेथेही मानापमान, शह-काटशह, आघाडी-पिछाडीचे कठोर मापदंड असतात. सुदृढ व्यावसायिक कामगिरीचे खणखणीत नाणे वाजवूनच त्यात सरशी मिळते, हे विशाल सिक्का यांच्या नेतृत्वाखालील इन्फोसिसने समर्पकपणे दाखवून दिले आहे.