विठूमाउलीच्या चरणांवर डोकं टेकवून लहान मुलाच्या आर्ततेनं सावता माळी महाराजांनी केलेली विनवणी ऐकताना हृदयेंद्रच्या मन:चक्षूंसमोर जणू ते भावतन्मय दृश्य साकारलं होतं. बुवांच्या आवाजातही एक लय होती. दीपकळिकांनी गाभारा प्रकाशमान झाला आहे आणि त्या समोर मंदिरात दाटीवाटीनं बसलेल्या भाविकांच्या चेहऱ्यांचे आरसे त्या सात्त्विकतेच्या प्रतिबिंबानं उजळले आहेत, असं दृश्य बुवांना जणू दिसत होतं. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. मग अलगद भवतालाचं भान आलं. दूरच्या खोलीतून आनन्दोला गुंग करणाऱ्या दूरचित्रवाणीचा स्वरही आला. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही तेव्हा ज्ञानेंद्रमधला यजमान जागा झाला. आत जाऊन त्यानं रात्रीच्या भोजनाची व्यवस्था एकवार नजरेखालून घातली. मग बाहेर येत कर्मेद्रला त्यानं विचारलं..
ज्ञानेंद्र – आनन्दोला भूक लागली असेल ना? पण अरबट चरबट खाऊन चालणार नाही. नाहीतर रात्री जेवणार नाही.. बरं तोसुद्धा इथेच राहाणार ना? त्याचे कपडेबिपडे दिसत नाहीत..
कर्मेद्र – तो त्याच्या मनाचा राजा आहे. त्याला वाटलं घरी जावं तर पोहोचवून येईन किंवा मीही जाईन, उद्या येईन. राहाणार असेल तर आमचे कपडे गाडीत आहेत. एवढय़ा पिशव्या होत्या आधीच, म्हणून तिथेच ठेवलेत.. त्यात तो फोन आला..
हृदयेंद्र – कुणाचा?
कर्मेद्र – एका प्रकल्पासाठी गेल्या वर्षांसारखीच परदेशवारी करायची आहे.. कदाचित पाच-सहा महिने ये-जा होईल.. त्यासंबंधात सारखी फोनाफोनी सुरू आहे..
योगेंद्र – हळुहळू वडिलांच्या पुढे जायला लागलास.. फार आनंद वाटला असता त्यांनाही..
कर्मेद्र – गिर्यारोहणात एक वेळ अशी येते की ना तुम्ही मागे येऊ शकत, ना आहात तिथे थांबू शकत, जीव वाचवण्यासाठी का होईना पुढे जावंच लागतं!
ज्ञानेंद्र – तुझ्या जिवाला कसला धोका आहे?
कर्मेद्र – रूपकाचा अर्थ फार खोल घेऊ नका रे.. अर्थात त्या शिवाय या हृदूला चर्चेत रसच वाटत नाही म्हणा..
हृदयेंद्र – (हसत) पण खरंच मला प्रत्येक शब्द.. निदान अभंगातला प्रत्येक शब्द काहीतरी वेगळंच सांगतोय, असं वाटत रहातं.. प्रत्येक शब्दाला मग मी खोदून खोदून विचारतो, बाबा तू भासवतोयस तेवढंच तुला सांगायचंय ना?
बुवा – छान.. अहो समुद्राच्या तळाशी अशाच डुबक्या मारत जावं.. नवनवी रत्नं हाती लागतात..
बुवा – बरेचदा होतं काय, त्या रत्नांनी आम्ही काही दिपत नाही.. मग हृदूला ती निराश मनानं पुन्हा समुद्रात टाकून द्यावी लागतात!
हृदयेंद्र – (हसत) निदान एवढं तरी कळतंय हे खूप झालं.. पण बुवा हेच पहा ना.. ‘‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।। लसूण मिरची कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरी।। मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी।। सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायीं गोंविला गळा।।’’ या अभंगात सगळे शब्द साधेसुधे वाटतात, पण मग मला तिथेच प्रश्न पडतो.. या साधेपणातच काहीतरी दडलं असलं पाहिजे..
बुवा – अगदी खरं आहे.. मोट नाडा विहीर दोरी हे शब्द काही नवे नाहीत, पण त्यांची योजना नवी आहे..
हृदयेंद्र – तुमच्या बोलण्यामुळे माझी उत्सुकता वाढलीय खरी.. घेऊया का हा अभंग? खरंच.. आज अचलदादा हवे होते.. आणखी मजा आली असती..
ज्ञानेंद्र – पण आधी जेवून घेऊ.. मग हवं तर रात्री गप्पा मारू.. नाहीतरी उद्या-परवाची सुटी आहेच..
पोटातल्या भुकेची जाणीव सर्वानाच झाली आणि आतून सुग्रास स्वयंपाकाचा वासही दरवळत येत होता.. कर्मेद्रनंही एवढं काही आणलं होतं.. मंडळी उठली.. जेवणं झाली. रात्रीचा पुन्हा समुद्रकिनारी फेरफटका झाला. आनन्दोच्या गोड बोलण्यातही सगळे गुंग झाले होते.. मग गप्पा अवांतरच जास्त झाल्या.. शनिवारी सकाळी आनन्दोला पोहोचवायला म्हणून कर्मेद्र गेला तो परतायला दुपार झाली.. जेवणं सुरू असतानाच दूरचित्रवाणीवर नेपाळच्या भूकंपाची बातमी झळकू लागली.. तो उत्पात पाहताना चौघा मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला तो डॉ. नरेंद्र यांच्या आठवणीनं! त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी चौघं उतावीळ झाले होते.. बुवांच्या मनात मात्र अभंगाचा चरण उमटला.. क्षणाचे हे सर्व खरे आहे!!
चैतन्य प्रेम