बौद्धिक संपदांची स्थानिकता, त्यांचे अर्थशास्त्र, बौद्धिक संपदा आणि सामान्य जनतेचे हित यातला तोल आदी विषयांची चर्चा या सदरात आतापर्यंत झाली.. म्हणजेच, आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण बौद्धिक संपदा कायद्याची काही मूलतत्त्वे पाहिली. ही तत्त्वे सर्व प्रकारच्या बौद्धिक संपदांना लागू आहेत; पण बौद्धिक संपदा मुळात वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांच्यात साम्येही आहेत आणि फरकही. इथून पुढे आपण या प्रत्येक बौद्धिक संपदेबद्दल विस्ताराने पाहणार आहोत.. या आणि इथून पुढच्या काही लेखांत पाहू ‘ट्रेडमार्क’बद्दल..
बौद्धिक संपदा कायद्यात अनेक प्रकारच्या बौद्धिक संपदांचा अंतर्भाव होतो, जसे की पेटंट्स, ट्रेडमार्क्‍स, कॉपीराइट्स, ट्रेड सीक्रेट्स इत्यादी. या वेगवेगळ्या बौद्धिक संपदांचा एकमेकांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. त्यांची उद्दिष्टेदेखील पूर्णपणे वेगवेगळी आहेत. सगळ्यांना सरसकट बौद्धिक संपदा असे नाव दिलेले असले तरी त्यांच्यापकी काही प्रकारांचा खरे तर बुद्धीशी काहीही विशेष संबंध नाही. उदा. पेटंट आणि कॉपीराइट्समध्ये त्यांच्या मालकाने खरोखर बौद्धिक गुंतवणूक केलेली असते.. तर ट्रेडमार्क्‍स किंवा भौगोलिक निर्देशक यात काही विशेष बौद्धिक गुंतवणूक नसली तरी त्यांचे व्यापारी मूल्य अनन्यसाधारण असते. या वेगवेगळ्या बौद्धिक संपदांबाबत सामान्य माणसाच्या मनात प्रचंड गोंधळ असतो हे या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करताना मी अनेकदा अनुभवले आहे. आपल्या बौद्धिक संपदांची नोंदणी करण्याची गरज पडली तर त्या उत्पादनात नक्की कुठल्या प्रकारची बौद्धिक संपदा आहे हे आपल्याला समजायला हवे. सोबतच्या व्यंगचित्रातल्यासारखी आपली ही अवस्था होऊ नये म्हणून हे नीट समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
एखादी वस्तू घेताना ती उत्कृष्ट दर्जाची आहे हे वापरून पाहण्याच्या आधीही आपल्याला कसे समजते? तिच्या नावावरून.. नाही का? आपण ‘अ‍ॅलन सोली’चा सदरा घालून आपल्या ‘होंडा सिटी’मध्ये बसून ‘ताज’ला जाता आणि तिथे जाऊन जेव्हा ‘कोक’ ऑर्डर करता तेव्हा किती तरी ट्रेडमार्क्‍स आपण आपल्याही नकळत वापरत असता. नुकतीच मिसरूड फुटू लागलेली तरुण मुले ही आजकाल आईबापांकडे ‘ब्रॅण्डेड’ वस्तूंसाठी हट्ट करताना दिसतात ते त्या ब्रॅण्डचा दर्जा त्यांनी तपासून पाहिलेला असतो म्हणून नव्हे; तर केवळ बाजारपेठेत त्या नावाचा असलेला दबदबा पाहून! नावात काय आहे हे म्हणणाऱ्या शेक्सपियरला कोका कोला, नायकी, अ‍ॅपलसारख्या ‘नामवंत’ उत्पादनांसाठी वेडी झालेली सध्याची जनता दाखवली असती तर त्याने आपले शब्द मागे घेतले असते एवढे मात्र निश्चित. उत्पादनांना ही ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ बहाल करणारी एक महत्त्वाची बौद्धिक संपदा म्हणजे ट्रेडमार्क. एखाद्या सुप्रसिद्ध उत्पादनाच्या ट्रेडमार्कचे बाजारातील खरे मूल्य केवढे असू शकते याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही.
पेटंट आणि ट्रेडमार्कमधला एक महत्त्वाचा फरक हा की, पेटंट हे संशोधनाला मिळते. ट्रेडमार्कचा मात्र संशोधनाशी काहीही संबंध नाही. ट्रेडमार्क मिळतो त्या उत्पादनाच्या नावाला आणि त्याची ओळख पटवून देण्यास मदत करणाऱ्या इतर अनेक प्रकारच्या खाणाखुणांना. एक साधे उदाहरण पाहू या.. समजा, एक खास प्रकारचा ‘टच स्क्रीन’ फीचर असलेला फोन सॅमसंगने बाजारात आणला. या ‘टच स्क्रीन’ फीचरवर बाजारात आणण्याआधी सॅमसंगने पेटंटही घेतले आहे. आता दुसऱ्या एका मोबाइल कंपनीने सॅमसंगची परवानगी न घेता जर तिच्या फोनमध्ये हे तंत्रज्ञान तसेच्या तसे चोरून वापरले.. आणि आपले उत्पादन ‘रोशिया’ अशा नावाने विकले, तर इथे सॅमसंगच्या ‘पेटंट’ या बौद्धिक संपदेचे उल्लंघन झाले. पण समजा या कंपनीने एक फोन बाजारात आणला, ज्यात तिने सॅमसंगच्या फोनमधले कुठलेही तंत्रज्ञान चोरून वापरलेले नाही. या फोनमध्ये तिने स्वत: विकसित केलेले एक दुसरेच तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यावर तिचे स्वत:चेच पेटंट आहे. पण ही कंपनी अगदीच नवखी आहे आणि आपला फोन बाजारात विकला जावा म्हणून या कंपनीने आपल्याही फोनला सॅमसंग असेच नाव दिले. आता हा फोन सॅमसंगने बनविलेला आहे का? तर नाही..पण बाजारात तो विकत घेणाऱ्या ग्राहकाला हे माहिती नाही. त्यामुळे सॅमसंग या नावाखाली हा फोन तो डोळे झाकून विकत घेईल.. इथे रोशिया या कंपनीने ‘सॅमसंग’ या ‘नावामधल्या’ बौद्धिक संपदेचे उल्लंघन केलेले आहे.. आणि ही जी बौद्धिक संपदा आहे, ती म्हणजे ट्रेडमार्क.
ट्रेडमार्क कशाकशावर मिळतात? तर उत्पादनाची ओळख पटवून देणाऱ्या अशा कुठल्याही खुणेवर. मग ते अक्षरे, शब्द किंवा अंक वापरून बनलेले त्या उत्पादनाचे नाव असेल.. उदा. कोडॅक, व्ही.आय.पी., मर्सिडिझ. त्या उत्पादनाचा विशिष्ट असा लोगो असेल.. जसे की नायकीचा ‘होय, बरोबर’च्या खुणेसारखा लोगो. त्या उत्पादनाची ओळख पटवून देणारे एखादे वाक्य किंवा घोषणा असेल जसे की ‘कुछ मीठा हो जाये’ हे ‘कॅडबरी’ कंपनीनिर्मित चॉकलेटच्या जाहिरातीमधील वाक्य किंवा ‘सुर्र्र के पियो’सारखे चहाच्या जाहिरातीतील वाक्य. ती एखादी त्रिमितीतली खूण असेल.. जसा की मर्सिडिझचा तारा. किंवा एखादे चित्र असेल.. जशी की अमुलच्या जाहिरातीतील मुलगी. इतकेच काय, तर काही ‘हट के’ ट्रेडमार्क्‍स हे त्या उत्पादनाच्या विशिष्ट रंगावरही घेता येतात. उदा. कॅडबरी चॉकलेटच्या वेष्टनातील जांभळ्या रंगावर इंग्लंडमध्ये ट्रेडमार्क आहे किंवा कधी ट्रेडमार्क एखाद्या सांगीतिक धून किंवा ‘सिग्नेचर टय़ून’वरही घेता येतो.. जशी की आयसीआयसीआयच्या जाहिरातीतील धून किंवा ब्रिटानियाची धून. काही देशांत तर उत्पादनाच्या विशिष्ट वासावरही ट्रेडमार्क दिले जातात.. जसे की ‘ओल्या गवताचा ताजा वास’ येणारा लॉन टेनिसचा चेंडू एका कंपनीने बनवला, तर या उत्पादनाच्या नावावर आणि लोगोवरच नाही, तर या विशिष्ट वासावरही ट्रेडमार्क मिळू शकेल!
ट्रेडमार्क हे नाव जरी सरसकट वापरले जात असले तरी खरे तर ते दोन प्रकारचे असतात. ती जर एखाद्या उत्पादनाची खूण असेल तर तो ट्रेडमार्क आणि ती जर बँक किंवा विमान कंपनीसारखी सेवा असेल तर तो झाला सव्‍‌र्हिस मार्क.
‘ट्रेडमार्क’चा नक्की उपयोग काय? उत्पादकाला किंवा सेवा पुरविणाऱ्या कंपनीला त्यांचे उत्पादन किंवा सेवा ग्राहकाच्या मनावर ठसवता येते ती त्याचा ट्रेडमार्क पुन:पुन्हा त्याच्या मनावर बिंबवून. शिवाय, दुसरा कुणी हे उत्पादन त्याच नावाने किंवा त्यासारख्या नावाने विकू लागला तर त्यालाही थांबवता येते. ग्राहकासाठीही ट्रेडमार्कचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण ट्रेडमार्कमुळे ग्राहकाला त्या उत्पादनाच्या दर्जाची ओळख पटते.
ट्रेडमार्कचा इतिहास फार जुना आहे. फ्रान्समध्ये सापडलेल्या ख्रिस्तपूर्व ५००० वर्षांपूर्वीच्या चित्रांवरही चित्रकारांच्या नावांच्या खुणा आहेत. काही हजार वर्षांपूर्वी कारागिरांनी बनविलेल्या चिनीमातीच्या भांडय़ांवरही त्यांनी त्यांच्या खुणा कोरून ठेवल्या आहेत. आपल्या उत्पादनावर आपली निशाणी कोरून ठेवण्याची माणसाची ऊर्मी किती जुनी आहे पाहा.. त्याला ट्रेडमार्क हे नाव मात्र आपण अलीकडे दिले आहे आणि त्यांचा अंतर्भाव ‘बौद्धिक संपदा कायद्या’त करून टाकला आहे.
आपल्या उत्पादनाला किंवा सेवेला आपण जर एखादे नाव दिले आणि ते आपण बाजारात विकायला लागलो, तर ते नाव आपला ट्रेडमार्क बनते का? तर नाही.. आपल्याला आपल्या ट्रेडमार्कची नोंदणी करावी लागते. एखाद्या वस्तूचे नाव ट्रेडमार्क म्हणून संरक्षित केलेले आहे की नाही हे कसे ओळखायचे? त्या नावाजवळ  ‘ ट्ठ ’ अशी खूण दिसली म्हणजे ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला आहे, पण तो अजून मिळालेला नाही आणि ‘ ञ् ’अशी खूण दिसली म्हणजे या ट्रेडमार्कची नोंदणी झालेली आहे. ही नोंदणी केली नाही तर आपण हे नाव वापरू शकत नाही का? तर अर्थातच वापरू शकतो, पण मग आपल्या नावाची भविष्यात कुणी चोरी केली आणि त्याच्यावर ट्रेडमार्क उल्लंघनासाठी बौद्धिक संपदा कायद्याखाली खटला दाखल करायचा असेल तर ट्रेडमार्कची नोंदणी झालेली असणे बरे असते. जरी अशी नोंदणी झालेली नसेल तरीही खटला करता येतो.. पण बौद्धिक संपदा कायद्याखाली नाही. अशा वेळी मग तो साधा दिवाणी खटला होतो.
ट्रेडमार्क कसा असावा आणि कसा नसावा हे पाहू या पुढच्या लेखांकात!
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.