छंद हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा! हा चरण थेट नामस्मरणाचीच महती वर्णितो. नामानं वाचा शुचिर्भूत होते, असाच याचा अर्थ आहे, असं योगेंद्र म्हणाला. हृदयेंद्र त्यावर उद्गारला..
हृदयेंद्र – हा रूढ अर्थ बरोबरच आहे, पण अचलदादांनी मागे जे सांगितलं होतं, त्याचा आधार घेऊन याच अर्थात आणखी खोलवर उतरता येईल..
ज्ञानेंद्र – कसं ते?
हृदयेंद्र – इथे जो छंद शब्द आहे ना, त्याच्या कितीतरी छटा आहेत. त्याला आवड म्हणा, ओढ म्हणा, सोस म्हणा. माणसाला कशाचा सोस असतो? तर तो निव्वळ स्वनामाचा सोस असतो! आपलंच घोडं पुढे दामटत रहायचा नाद असतो. यासाठी सर्वात जास्त राबवली जाते ती वाणीच! स्वनामाच्या सोसापायी माणूस जे जे काही बोलतो ते किती फसवं असतं! ‘मी सांगतो म्हणून’, ‘मी होतो म्हणून’, ‘मी केलं नसतं तर अमुक गोष्ट साधली नसती’.. सारं बोलणं असं ‘मी’ची भलामण करणारं, ‘मी’ला जोपासणारं, ‘मी’ची प्रौढी मिरवणारं.. याच ‘मी’केंद्रित वृत्तीनं माणूस आत्मस्तुती आणि परनिंदेत रममाण असतो. तो दुसऱ्याची स्तुतीही करतो त्यात त्याचा काही ना काही स्वार्थ असतोच. तेव्हा अशा स्वनामाच्या ओढीनं माणसाची वाचा बरबटली असते. ती पवित्र, शुद्ध, सत्य कशी होणार?
योगेंद्र – किती खरं आहे हे.. आपल्या अनेकदा लक्षातच येत नाही की आपली स्वार्थकेंद्रित, ‘मी’केंद्रित वृत्तीच सुप्तपणे आपल्या बोलण्यातून प्रतिबिंबित होत असते. अकारण आपण काहीच बोलत नाही. प्रत्येक बोलण्यामागे सुप्त स्वार्थ दडलेलाच असतो. परनिंदेचं व्यसन किती घातक असतं, आपल्या लक्षात येत नाही. त्या व्यसनापायी आपल्याच अंतरंगात कमालीचा द्वेष, अस्थिरता, नकारात्मकता पाय रोवत असते आणि तीच खऱ्या योगापासून वंचित करीत असते..
हृदयेंद्र – म्हणूनच ‘मी’ची जागा जसजशी ‘तू’ घ्यायला लागेल.. तेव्हाच आत्मस्तुतीची लाज वाटू लागेल आणि परनिंदेची आवड सुटू लागेल. तेव्हाच हरिच्या नामाचा खरा छंद लागेल.. पण हे साधणं काही सोपं नाही. त्यासाठीचा एकमात्र उपाय आहे मौन!
कर्मेद्र – वा! कसं माझ्या मनातलं बोललास! मलाही वाटतं आता थोडा वेळ आपण मौन पाळूया.. म्हणजे या अध्यात्मविषयापुरतं बरं का.. जरा दुसऱ्या विषयावर बोलू की..
हृदयेंद्र – (हसत) आपलं व्यावहारिक मौनही असंच हिशेबी असतं बरं का! जिथे बोलणं गैरसोयीचं असेल तिथे माणूस मौन बाळगतो!
ज्ञानेंद्र – मौनम् सर्वार्थ साधनम्!
हृदयेंद्र – ज्ञान्या तू या सूत्राचा उच्चार केलास ना तेव्हा मागे सद्गुरुंशी झालेली मौनाची चर्चा आठवली बघ..
कर्मेद्र – मौनाची चर्चा, हाच विरोधाभास नाही का?
हृदयेंद्र – (हसत) तू कितीही मोडता घालायचा प्रयत्न कर, आम्ही ही गंभीर चर्चा थांबविणार नाही! या ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ सूत्राचा आध्यात्मिक अर्थही आहे बरं का आणि तो या ‘शुचिर्भूत सदा वाचा’कडेच नेणारा आहे..
योगेंद्र – पण स्वार्थ साधण्यासाठी कधी कधी गप्प बसणं हिताचं असतं, एवढाच तर व्यावहारिक अर्थ या ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’मध्ये अभिप्रेत आहे! त्यात आध्यात्मिक अर्थ कुठून येणार?
हृदयेंद्र – या सूत्रातच हा दुसरा अर्थ थेट दडला आहे तो असा की मौनाशिवाय कोणतीही साधना सर्वार्थानं सिद्ध होणार नाही! (ज्ञानेंद्र आणि योगेंद्रचे चेहरे उजळतात, पण क्षणार्धात योगेंद्रचा चेहरा प्रश्नांकित होतो.)
योगेंद्र – एका परीनं या अर्थाचा या सूत्रात भास झाला खरा, पण मौन हीदेखील एक स्वतंत्र साधना नाही का? प्रत्येक साधनेसाठी मौन अनिवार्य आहे, असं म्हणणं तेवढंस पटत नाही. मौनाचा प्रत्येक साधनामार्गावरील साधकाला लाभ होतो आणि होईल, यात शंका नाही. पण मौनाशिवाय त्याची साधनाच सर्वार्थानं पूर्ण होऊच शकत नाही, हे थोडं जास्तच वाटतं. आता एखादा हठयोगी आहे त्याच्या साधनेचा पाया मौन कसा असू शकतो? एखादा भजन-संकीर्तन करतो, स्तोत्रं-पोथ्यांची पारायणं करतो, ते करताना मौन कसं बाळगता येईल? आता ज्ञान्यासारखा एखादा ज्ञानमार्गी आहे, त्याच्यासाठी मौन अनिवार्य आहे, हे कसं उकलावं?
हृदयेंद्र – म्हणूनच तर आधी ‘मौन’ म्हणजे नेमकं काय, हे जाणून घ्यावं लागेल!
चैतन्य प्रेम