तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा ‘पदार्थ’ बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची शुद्ध वस्तू होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली.
आज आपण ‘तत्त्व’ या संकल्पनेचा थोडा तपास करू. ‘मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे’, ‘दो नम्बर के धंदे के भी कुछ उसूल होते हैं’, ‘जगताना काहीतरी तत्त्वं असावीत,’ अशा तऱ्हेची विधाने आपण ऐकतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचतत्त्वे आहेत, गुरुशिष्य परंपरेतील ‘गुरू’ हे एक तत्त्व आहे (आदि शंकराचार्याचे श्री गुर्वष्टकम्), त्याचप्रमाणे समता, स्वातंत्र्य, समृद्धी ही तत्त्वे आहेत, अशीही वाक्ये तयार होतात. अमुकतमुक सिद्धांताचे सारतत्त्व, धर्मतत्त्वे, नीतितत्त्वे, अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा हे तत्त्व, निसर्गातील कार्यकारणतत्त्व आणि समरूपतेचे तत्त्व अशा अनेक शब्दप्रयोगात ‘तत्त्व’ शब्दाचा मनमुराद वापर होतो. सामाजिक व्यवहारात प्रेम, देशभक्ती, शेजारधर्म, मत्री, करुणा, पक्षनिष्ठा, मुक्ती, भक्ती, अहिंसा, सत्य, क्षमा, बंधुभाव इत्यादी सामाजिक तत्त्वे आढळतात.  
अध्यात्माच्या किंवा धार्मिक क्षेत्रात ‘तत्त्व’ या शब्दाचे आकर्षण सर्वाधिक आहे, असे आढळेल. तिथे ‘धर्मतत्त्वे’ अतिमहत्त्वाची ठरतात. ती धर्मसंस्थापकाने दिलेली अथवा ईश्वराने दिलेली असतात. ती नेहमीच अपरिवर्तनीय आणि ज्यांचे उल्लंघन करता येत नाही, अशी असतात (- किंवा तशी श्रद्धा असते.) जसे की, संस्कृतमधील ‘तत्त्व’ ही संज्ञा पाहा. ‘तत्’ या सर्वनामाला भाववाचक ‘त्व’ प्रत्यय लागून ‘तत्त्व’ हे नाम होते. त्यापासून तत्त्वनिष्ठ, तत्त्ववादी, तात्त्विक, तत्त्वेन/ तत्त्वत: (वास्तवात), तत्त्ववित् (ज्ञाता), तत्त्वमसि हे इतर शब्द बनतात. अद्वैत वेदान्तानुसार ब्रह्म हे व्यापक असल्यामुळे त्याचे नाव ‘तत्’. या ‘तत्’चा ‘ते’पणा हे तत्त्व आहे. जे काही ‘आहे’, असे म्हणता येईल ते केवळ हेच तत्त्व आहे. म्हणून तत्त्व म्हणजे ब्रह्म.  
तत्त्व म्हणजे पदार्थ हा संस्कृतमधील आणखी एक अर्थ आहे. पद म्हणजे शब्द. शब्दाला अर्थ असणे म्हणजे पदार्थ. ज्यासंबंधी आपण शब्द उच्चारू शकतो, वर्णन करू शकतो, तो पदार्थ (पदस्य अर्थ:). येथे अर्थ असणे, याचा अर्थ ज्या वस्तूचे किंवा ज्या विषयाचे आकलन होते ती वस्तू किंवा विषय. एखाद्या वस्तूचे किंवा विषयाचे पदाने वर्णन करता येत असेल तर आणि तरच तो पदार्थ असतो, अन्यथा नाही. येथे पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष वस्तू नाही तर वस्तू ज्याची बनली आहे ते सारतत्त्व (essence) किंवा द्रव्य substance). जसे की खुर्चीचे खुर्चीत्व, मनुष्याचे सार मनुष्यत्व, पशूचे पशुत्व. म्हणून तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप. या पदार्थरूपी तत्त्वाचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान.
तत्त्व ही संज्ञा माणसाच्या रोजच्या व्यवहारात वापरली जाते तेव्हा ती बहुधा सिद्धांत, रीती, सत्यनिष्ठा, सत्याचरण, नियम, व्यवस्था, तात्पर्य या नतिक अर्थाने वापरात येते. तर जगाचे वर्णन करताना (निसर्ग विज्ञानात) वस्तूचे सार, सारघटक, सारतत्त्व, निसर्गनियमांची व्यवस्था या अर्थाने वापरली जाते. अध्यात्म, धर्म या क्षेत्रात ती जगाचे सार, मूलघटक, ब्रह्म, मन, देवता अशा अर्थाने उपयोगात येते.
इंग्लिशमधील principle चाही अर्थ असाच केला जातो.  A man of principle म्हणजे सत्यनिष्ठ माणूस. ‘the principles of democracy’ म्हणजे लोकशाहीतील मूलभूत सत्ये, नियम किंवा गृहीतके.   
आता, ‘तत्त्व’ किंवा principle या शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करता येईल का? ही समस्या मांडता येईल.  
या वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टीत एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र दिसते. एकदा तत्त्व निश्चित झाले की त्या तत्त्वाचे उपयोजन ठरते आणि ती राबविण्याची व्यवस्था तयार होते, तेच संबंधित व्यक्तीचे किंवा गटाचे, देशाचे तत्त्वज्ञान बनते. ‘माझे तत्त्वज्ञान’ याचा अर्थ हाच होतो. ‘मी तत्त्वनिष्ठ माणूस आहे’ हे म्हणणे म्हणजे ‘मी अमुकतमुक तत्त्वे मान्य करतो, त्यासाठी मी काहीही करीन.’ हे तत्त्वप्रेम असते. वर्ण, जात, धर्म, िलगभेद किंवा देश, एखादी विचारसरणी हे तत्त्व बनले की त्या व्यक्तीचे तत्त्वज्ञान अस्तित्वात येते, तेच त्याच्या विचाराचे, आचाराचे आणि प्रत्येक कृतीचे नियंत्रण करू लागते.
असे दिसते की सार, सारघटक किंवा सारतत्त्व किंवा पदार्थ या अर्थाने ‘तत्त्व’ हा शब्द उपयोगात आणला जातो, तेव्हा सामाजिक प्रश्न उग्र होतात. तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा ‘पदार्थ’ बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चतन्यशील माणसाला लावला की माणसाची ‘शुद्ध भौतिक वस्तू’ होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना (social regulative principles) एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली. साहजिकच अमुक जातीचा माणूस अमुक रीतीनेच वागेल, असा खास जातीयवादी मानसशास्त्रीय सिद्धान्त तयार झाला. वर्ण-जात ही नियामक तत्त्वे असताना ती सारतत्त्वे किंवा द्रव्य ठरवली गेली की वर्ण-जात हीच मुख्य तत्त्वे बनतात. या तत्त्वांचे ज्ञान तेच तत्त्वज्ञान (जातीसाठी खावी माती), असा समज दृढ होत राहतो.    
माणसाचे ‘मूळ स्वरूप ब्रह्म’ आहे, तो ‘प्रभूचा पुत्र’ आहे किंवा ‘अल्लाचा बंदा’ आहे, या खऱ्या तर माणूस नावाच्या भौतिक वस्तूच्या व्याख्या आहेत. व्याख्या करणे हे माणसाचे सारतत्त्व किंवा द्रव्य शोधणेच असते. मग त्याला हवे तसे वापरता येते.
आता पाहा, ‘माणूस विवेकशील, आत्मभान असणारा प्राणी आहे,’ हीदेखील माणसाची व्याख्याच असते. सारतत्त्व किंवा द्रव्य म्हणून माणसाची व्याख्या करणे आणि नियामक तत्त्व म्हणून माणसाची कोणत्या तरी गुणधर्मामध्ये व्याख्या स्वीकारणे यात मूलभूत फरक करता येईल, असे वाटते. हा ‘कोऽहम्?’ (मी कोण आहे?)चे उत्तर शोधण्याचा प्रयत्न असतो.
‘कोऽहम्?’चे रेडीमेड उत्तर प्रत्येक भारतीयाला वर्ण-जात-लिंगभेद या सारतत्त्व किंवा द्रव्य स्वरूपात मिळते. हा त्या त्या व्यक्तीचा खासगी आत्मपरिचय असला तरी तो वस्तुत: सार्वजनिक असतो. कारण वर्ण-जात सार्वजनिक असते. ती व्यक्ती मग त्या आत्मपरिचयाच्या तावडीत सापडते आणि विवेकशील माणूस हे स्वत:चे भान हरविते. व्यक्तीचा जातपरिचय इतर तशाच व्यक्तींना वावगा वाटत नाही, उलट सुरक्षित वाटते आणि चुकून जर जातपरिचयाचा पत्ताच लागत नाही, असे लक्षात आले तर त्यासाठी जंग जंग पछाडले जाते. ‘जाती परिचय शोधण्याचे तर्कशास्त्र’ या विषयात भारतीय माणूस अतिशय तज्ज्ञ असतोच.     
 आजची भारतीय सामाजिक व राजकीय स्थिती अशा अनेक प्रकारच्या तत्त्वांच्या संघर्षांच्या विषारी विळख्यात अडकली आहे, हे सहज दिसून येते. आमची परंपरा वर्ण, जात आणि लिंगभेद यांनी ग्रस्त आहे आणि विद्यमान जीवनाचा ढाचा मात्र युरोपीय तत्त्वांचा आहे. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युरोपीय व पाश्चात्त्य आहे तर त्याचे उपयोजन मात्र परंपरा टिकविण्यासाठी होते आहे.
‘कोऽहम्?’चे उत्तर ‘भारतीय!’ असे सामाजिक स्वरूपाचे मिळेल, अशा व्यापक आत्मभानाकडे, आत्मपरिचयाकडे जाण्याची तयारी कशी करावी, हे धोरण आखणे आवश्यक आहे.  
लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आणि  तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत. ईमेल : madshri@hotmail.com

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
settlement in Criminal case is not divorce
फौजदारी प्रकरणातील समझोता म्हणजे घटस्फोट नव्हे!