केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या निकालात मुलींच्या यशाची भरारी नेत्रदीपक आहे, हे खरे असले, तरीही त्या निकालातील मराठी विद्यार्थ्यांची कामगिरी काही प्रमाणात चिंता व्यक्त करायला लावणारी आहे खास. पहिल्या पाच विद्यार्थ्यांमधील चार मुली असणे, हे बदलत्या सामाजिक परिस्थितीचे द्योतक आहे, असे म्हटले पाहिजे. मुलींनी शिकून काय करायचे, त्यातून त्या खूप शिकल्या, तर नंतरच्या काळात पालकांवर भलताच ताण येतो, यासारखे संवाद निदान या मुलींच्या घरात उमटले नाहीत. ज्या महाराष्ट्रात देशात प्रथमच मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या महाराष्ट्रातील एकही मुलगी या पहिल्या पाच जणींत नाही. याचा अर्थ महात्मा फुले यांचे स्त्री-शिक्षणाचे कार्य देशभर पसरू लागले आहे, असा होतो. महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणारी अबोली नरवणे ही मुलगीच असणे तर स्वाभाविकही आहे. मात्र देशातील गुणवत्ता यादीतील तिचा क्रमांक ७८ वा आहे. म्हणजे ७७ व्या क्रमांकापर्यंत एकाही मराठी विद्यार्थ्यांला पोहोचता आले नाही. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व शहरे आणि निमशहरे स्पर्धा परीक्षांनी वेडावून गेली आहेत. या परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरून, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांविषयीचे आकर्षण दिसून येते. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा परीक्षांना मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी बसतात. त्यातील फार थोडय़ांना यश जवळ करते, तरीही हे विद्यार्थी हार न मानता, या अतिशय अवघड परीक्षेचे शिवधनुष्य पेलण्यास कचरत नाहीत. यंदा राज्यातील सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा परीक्षा दिली. त्यातील सुमारे दोनशे विद्यार्थीच मुलाखतीपर्यंत पोहोचू शकले. त्यातीलही पन्नास टक्क्यांना अंतिम परीक्षेत यश मिळवता आले. आजवर अंतिम परीक्षेपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण यापेक्षा कमी राहिले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची शासकीय सेवेत थेट वरिष्ठ पदावर नियुक्ती होते. प्रशासनातील अशा महत्त्वाच्या पदांवर बसणाऱ्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि जागतिक परिस्थितीचा अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते.  गेल्या काही वर्षांत या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असलेल्यांची संख्या वाढते आहे. अन्य विद्याशाखांमधील उच्च श्रेणी मिळवलेले विद्यार्थीही स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित का होत नाहीत, याचा विचार करणे आवश्यक आहे. अतिरिक्त शुल्क न देता, केवळ गुणवत्तेवर यश मिळवून देणाऱ्या फारच थोडय़ा परीक्षा देशात शिल्लक राहिल्या आहेत. ज्या पदव्यांना प्रतिष्ठा आहे, त्या मिळवण्यासाठी अतिप्रचंड पैसे मोजून प्रवेश मिळवणे ही एक मोठी डोकेदुखी बनत आहे. अशा स्थितीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे अधिक ओढा असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. महाराष्ट्रात या परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर सुविधा असूनही त्या प्रमाणात यश का मिळाले नाही, देशाच्या प्रशासनात विविध क्षेत्रांतील गुणवत्ताधारकांना अधिक रस का वाटत नाही, याचे आत्मपरीक्षण करणेही अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनातील अन्य महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती होण्याकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठीही फार मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी तयार नसतात. हे चित्र बदलण्यासाठी शासनानेच विशेष प्रयत्न करायला हवेत. पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये मराठी मुलांची संख्या कमी झाल्याने प्रशासकीय सेवेतील त्यांच्या टक्केवारीवरही विपरीत परिणाम होणार आहे. याची कारणे शोधून त्याकडे लक्ष दिले, तर प्रशासनातील मराठी मुलांचे अस्तित्व जाणवण्याएवढे वाढू शकेल.