जीवशास्त्रातील संशोधन मेहनतीचे तितकेच थेट मानवी आरोग्याशी निगडित असल्याने महत्त्वाचे असते. कर्करोग, एड्स यांसारखे रोग अजूनही आपल्या आवाक्यात आलेले नाहीत. असे असले तरी त्यावर औषधे उपलब्ध आहेत. अलीकडेच निवर्तलेले आयर्विन ए. रोझ यांना २००४ मध्ये डॉ. सिचॅनहॉवर व डॉ. हेर्शको यांच्यासमवेत रसायनशास्त्राचे नोबेल  मिळाले होते. त्यांचे संशोधन हे पेशी जुनी व निकामी झालेली प्रथिने शोधून त्यांचे रूपांतर नवीन प्रथिनांत कसे करतात याविषयी होते. त्या संशोधनातून पुढे कर्करोगावर नवीन औषधे तयार करता आली.
१९५० च्या सुमारास त्यांना डीएनएमध्ये असलेली संकेतावली व त्याचा प्रथिनांच्या निर्मितीत होणारा वापर या गोष्टीबद्दल कुतूहल वाटू लागले, पण ते वेगळा विचार करीत होते. प्रथिने कशी निर्माण होतात यापेक्षा ती कशी नष्ट होतात, असा जरा नकारात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. १९७५ च्या सुमारास वैज्ञानिकांनी एक छोटे प्रथिन शोधून काढले, ते अनेक सजीवांच्या उतींमध्ये सापडत होते म्हणून त्याला उबिक्विटिन असे संबोधले जात होते, पण त्या प्रथिनाचे कार्य कुणाला माहिती नव्हते. नंतर त्यांनी हेश्र्को व सिचॅनहॉवर यांच्या मदतीने संशोधन करून पेशींमधील प्रथिने कशी तुटतात हे शोधले. उबिक्विटिन हा प्रथिनाच्या मृत्यूचा शिक्का असतो. असे उपयुक्तता संपलेले प्रथिन प्रोटिओझोममध्ये नेले जाते. तेथे त्याचे तुकडे केले जातात व नंतर त्यापासून नवीन प्रथिने निर्माण केली जातात. प्रथिनांचे हे रिसायकलिंग म्हणजे फेरवापराचे तंत्र असते. त्यांच्या या संशोधनातून पुढे मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगावर ‘व्हेलकेड’ हे औषध तयार करण्यात आले.
 रोझ यांचा जन्म १६ जुलै १९२६ रोजी ब्रुकलिन येथे झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते स्थानिक रुग्णालयात काम करीत तेव्हा त्यांनी  ठरवले होते, की वैद्यकीय समस्या सोडवता येतील, अशा क्षेत्रातच काम करायचे.  १९४८ मध्ये ते शिकागो विद्यापीठातून पदवीधर झाले. नंतर १९५२ मध्ये जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट झाले.  नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्य होते. प्रयोगशाळेत कुणाचे फोन आले तर ते वैतागत असत. ऑक्टोबर २००४ मध्ये त्यांना नोबेल मिळाले तेव्हा त्यांचे फोन वाजू लागले. आयर्विन यांचे शिक्षक जेम्स नोविक यांनाही लाडक्या शिष्याला नोबेल मिळाल्याचे समजले, पण त्यांचा फोन तासभर लागलाच नाही, पण नंतर मात्र आयर्विन त्यांचे गुरू नोविक यांच्याशी मनमोकळे बोलले व पुन्हा सायंकाळी प्रयोगात गढून गेले.