काँग्रेस-भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा आणखी एक खेळ आता ‘जनता परिवार’ या नावाने खेळला जात आहे. कुठल्याशा विचारधारेला विरोध नोंदवणे हा या परिवाराचा नेहमीच प्रतिक्रियावादी कार्यक्रम असतो. अर्थात, त्यामागची मूळ प्रेरणा सत्तालालसा हीच असते. आपापल्या टापूतील सत्ताभिमुख वर्गासाठीच एकत्र आलेल्या संधिसाधू राजकारण्यांची ‘जनता परिवार’ ही एक अपरिहार्यता आहे..
टेकचंद सोनवणे
परस्परांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले नेते जनता परिवाराच्या नावाखाली एकत्र आले आहेत. जनता परिवाराच्या सदस्यांना एकत्र येण्यासाठी सदैव निमित्त हवे असते. यंदा ते निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष आहे. प्रतिक्रियात्मक राजकारणामुळे समाजवादी परिवाराची विश्वासार्हता टिकली नाही. जनता परिवारात एकत्र आलेल्या सदस्यांची काही गुणवैशिष्टय़े आहेत. जसे की, संधिसाधू मुलायमसिंह, अस्तित्वासाठी धडपडणारे एचडी देवेगौडा व लालूप्रसाद यादव, महत्त्वाकांक्षी नितीशकुमार व सत्तापिपासू ओमप्रकाश चौटाला. या नेत्यांचा किमान सामाईक कार्यक्रम केवळ सत्ता मिळवणे हाच असतो. जनता परिवाराच्या विलीनीकरणाला भाजपइतकाच आम आदमी पक्षदेखील कारणीभूत आहे.
भारतीय राजकारणात काँग्रेस व भाजपव्यतिरिक्त सदैव तिसऱ्या प्रमुख पक्षाची जागा रिक्त राहिली आहे. ही जागा अधून-मधून जनता दल वा समाजवादी विचारांच्या नेत्या/ पक्षांनी भरून काढली. संधिसाधू राजकारणामुळे जनता परिवारातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा कायम जागृत राहिल्या. एकोप्याची भावना निर्माण न होता कायमच जनता परिवारातील नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष होत राहिला. आताही एकत्र आलेल्या सहा नेत्यांभोवती त्यांच्या समर्थकांचे कोंडाळे कायम आहे. प्रत्येक नेत्याचे कंपू आहेत. या कंपूशाहीचा विलय जनता परिवारात कधीही होणार नाही. काल-परवा एकसंध झाल्याच्या आणाभाका घेतलेल्या जनता परिवाराचे प्रभाव क्षेत्र उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक व बिहार आहे. या राज्यांमध्ये सदैव सत्तेत वाटेकरी असलेल्या या राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीत भाजपने धूळ चारली. तेव्हापासून ही अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. sam04जनता परिवारात सर्वात महत्त्वाकांक्षी आहेत ते समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव. यादववंशीय राजकारण करून सदैव सत्ताकेंद्रित राहण्यावर त्यांचा भर असतो. शिवाय अमरसिंहांसारखे कोणत्याही स्तरावर जाऊन राजकीय समीकरणे बदलू शकणारे मध्यस्थ (दिल्लीच्या भाषेत दलाल) सध्या त्यांच्यासोबत नाहीत. जनता परिवार म्हणजे आपापल्या परिवाराचे पोषण करण्याचे सामूहिक प्रकटीकरण आहे. एकसंध जनता परिवार म्हणजे समाजवादाचा बुरखा पांघरलेल्या सत्तापिपासूंचा रोमॅँटिसिझम आहे. कारण जेव्हा जेव्हा जनता परिवार एकत्र आला, त्याची दखल घेतली गेली. उत्तर भारतीय मतदारांनी तर त्यांच्यावर विश्वासही टाकला. हा विश्वास अल्पायुषी ठरला. प्रत्येक राजकीय नेत्याला अहंकार असतो. या अहंकाराचे शमन न करता परिवाराची घोषणा होते. १९७७ साली जनता पक्षाचा उदय प्रतिक्रियात्मक राजकारणातून झाला. त्यातून सत्ता व सत्तेमुळे अहंकार वाढला. पुढे जनता पक्षाची ऐतिहासिक अखेर झाली. त्याचे पडसाद कालपरवा लालूप्रसाद यादव यांच्या भाषणात उमटले होते. लालूप्रसाद यादव यांचे जनता परिवारातील स्थान शरद यादव यांनी अधोरेखित केले. जेव्हा जनता परिवार विलीनीकरणाची घोषणा झाली तेव्हा शरद यादव यांनी लालूप्रसाद यादव यांना बोलण्याची विनंती केली. लालूप्रसाद नकार देऊ लागले तेव्हा शरद यादव म्हणाले, ‘आप बात कीजिए, जरा मजा आयेगा!’ मनोरंजनात्मक राजकारणात लालूप्रसाद यादव यांना महत्त्वाचे स्थान आहे. तर १९७७ चा जनता परिवार. त्या वेळी १७ पक्ष एकत्र आले होते. परस्परांचे अहंकार व सत्तेच्या राजकारणामुळे जनता दल धुळीस मिळाला.
१९८९ साली राष्ट्रीय मोर्चा स्थापण्यात आला. जनता दल, असम गण परिषद, तेलुगू देसम पक्ष आणि द्रमुक या पक्षांनी एकत्र येत व्ही.पी. सिंह यांच्या हाती नेतृत्व दिले. तेलुगू देसमचे एनटी रामाराव हे या परिवाराचे संयोजक होते. हा परिवार १९९१ साली अस्तित्व गमावून बसला. सन १९९६ साली संयुक्त मोर्चा नावाच्या कल्पनाविश्वात जनता परिवार रमला. तमिळ मनिला काँग्रेस, भाकप व सपासह सात पक्ष एकत्र आले. चंद्राबाबू नायडू या मोर्चाचे समन्वयक होते. संयुक्त मोर्चामुळे जून १९९६ साली एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले. राजकीय उलथापालथ झाल्यावर देवेगौडा यांची गच्छंती झाली व एप्रिल १९९७ साली इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. काँग्रेसच्या राजकारणामुळे हरकिशन सिंह सुरजित यांच्या संकल्पनेतील हा ‘संयुक्त मोर्चा’ १९९८ साली कायमचा लोप पावला.  
‘जनता परिवार’ या व्याख्येत बसणाऱ्या राजकीय पक्षांना केंद्रात एकदाही राजकीय स्थिरता आली नाही. व्हीपी सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल या चारही पंतप्रधानांची कारकीर्द अल्पायुषी ठरली. याचे प्रमुख कारण अस्थिर राजकीय लाटेवर सदैव जनता परिवाराच्या घटक पक्षांनी नशीब अजमावले. त्यामुळे त्यांचे राजकारण सदैव कुणा एका राष्ट्रीय पक्षावर अवलंबून राहिले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तिसऱ्या मोर्चाचे स्वप्नरंजन सुरू झाले. पण आपापली सुभेदारी सांभाळण्यात सर्वाधिक शक्ती खर्ची घालणाऱ्या नेत्यांचा हा प्रयोगदेखील फसला. ही अशी जनता परिवाराची सत्ताकेंद्रित कहाणी आहे. प्रतिक्रियेतून जन्मल्यामुळे कुठल्याशा विचारधारेला विरोध नोंदवणे हा या परिवाराचा मोठा कार्यक्रम असतो. परंतु सत्ताकेंद्रित असल्याने जेव्हा जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच हा परिवार एकत्र येतो. आतापर्यंतच्या अनुभवातून जनता परिवाराच्या या रोमँटिसिझममधून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व शाबूत ठेवणाऱ्यांमध्ये अण्णाद्रमुकच्या जयललिता, तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, सपाचे मुलायमसिंह यादव यांचा सर्वात वरचा क्रमांक आहे. एकेका राज्यापुरते का होईना, हे नेते आपापली सुभेदारी सांभाळतात. सध्याच्या घडीला जनता परिवारासमोर याच पक्षांचे मोठे आव्हान आहे. त्यात मुलायमसिंह यादव यांचे महत्त्व जनता परिवारात वाढल्याने सर्वाधिक चिंतेत आहेत ते नितीशकुमार!
जनता परिवाराची लढाई ही लोकसभेत नसून राज्यसभेत आहे. सध्याच्या घडीला जनता परिवार एकत्र आला आहे, असे मानल्यास त्यांचे राज्यसभेतील संख्याबळ २९ होते. काँग्रेस, भाजपखालोखाल जनता परिवारात नसलेल्या पक्षांना एकत्र केल्यास त्यांचे एकत्रित संख्याबळ ५२ आहे. या पक्षांना एकत्र आणू शकल्यास जनता परिवार काँग्रेस व भाजपपेक्षाही मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात येईल. त्यासाठी बिगर भाजप-काँग्रेसी पक्षांमध्ये विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कागदावर असलेल्या जनता परिवारातील कोणता सदस्य निभावणार? जनता परिवार विलीनीकरणाचे दृश्य परिणाम बिहारमध्ये दिसतील. तत्पूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराचा सर्वात मोठा कस उमेदवारी वाटपात असेल. उत्तर भारतीय राजकारणात त्याला ‘बंदरबाट’ असा शब्द आहे. मुस्लीम व यादव मतांचे समीकरण जुळवून लालूप्रसाद यादव यांनी सत्ता उपभोगली. बजबजपुरी माजलेल्या बिहारमध्ये नितीशकुमार यांनी जनतेला विकासाची स्वप्ने दाखवली. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता एकत्र आले आहेत. मतभेद दूर झाल्याच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्यांचे मतभेद कायम आहेत. जनता परिवाराच्या विलयानंतर संघटनात्मक पदांवर नव्या नियुक्त्या केल्या जातील. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नव्या पक्षाच्या संघटनात्मक पदांवर आपापल्या समर्थकांची वर्णी लावण्याची स्पर्धा आत्तापासून सुरू झाली आहे. जनता परिवाराच्या विलीनीकरणानंतर बिहारमध्ये दोन बडय़ा राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांभाळणे म्हणजे एका म्यानामध्ये दोन तलवारी ठेवण्यासारखे आहे. राजदच्या लालूप्रसाद यादव यांच्या मताला महत्त्व आहे; पण बिहारमध्ये जदयूचे संख्याबळ अधिक आहे. या साऱ्या शक्यतांचा विचार करून जनता परिवाराने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
जनता परिवाराच्या विलीनीकरणामागे प्रमुख कारण अरविंद केजरीवाल यांचा झालेला उदय हेदेखील आहे. उदाहरणार्थ दिल्ली विधानसभा निवडणुकीत १९९३ साली जनता परिवाराचे चार आमदार निवडून आले व त्यांना मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी होती १८ टक्के! गेल्या २२ वर्षांच्या काळात दिल्लीत भाजप व काँग्रेसखालोखाल जनता दल वा बसपाचे अस्तित्व शाबूत राहिले. बहुजन समाज पक्षाने तर महानगरपालिका निवडणुकीतही स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले होते. जनता परिवारात विलय झालेले राजकीय पक्ष व बहुजन समाज पक्षाचे तर आजच्या घडीला दिल्लीत अस्तित्व उरलेले नाही. काँग्रेस व भाजपच्या बालेकिल्ल्याची चिरेबंदी आम आदमी पक्षाने ध्वस्त केली. त्याला प्रमुख कारण होते विकासाचा विचार करणारा नवमतदार. या नवमतदारामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे मनोधैर्य उंचावले व सरतेशेवटी भाषा, प्रांत, जात, धर्माच्या पल्याड जाऊन दिल्लीकरांनी त्यांना सत्ता दिली. सत्तासंपादनासाठी आवश्यक विश्वासार्हता केजरीवाल यांनी निर्माण केली. दुर्दैवाने जनता परिवारातील सदस्यांपैकी नितीशकुमार वगळता अन्य एकाही नेत्याकडे विश्वासार्हता नाही. प्रत्येक राज्यात एक वर्ग सदैव सत्ताभिमुख असतो. या बहुसंख्यांच्या वर्गाला सत्तेत वाटा हवाच असतो. तो न मिळाल्यास आपल्यावर अन्याय झाल्याची भावना वाढीस लागते. जनता परिवारच्या एकत्रीकरणामागे हा बहुसंख्य वर्ग आहे. या सत्ताभिमुख वर्गासाठी जनता परिवाराला सत्ता हवी आहे. यादववंशीय राजकारणाचे समाजवादी पडसाद या जनता परिवाराच्या विलीनीकरणातून उमटले आहेत.