जे अडॅम्सचा जन्म १९६१चा; तर फळकुटाला स्केट्ससारखी चाके लावून, पाय चाकांनी बांधून न घेता स्केटिंगइतकाच वेग गाठणारा चाकफळी वा  ‘स्केटबोर्डिग’चा खेळ १९४०च्या दशकात सुरू झाला होता. तरीही, जे अडॅम्स परवाच्या शुक्रवारी        (१५ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने वारला तेव्हा मात्र, ‘आधुनिक स्केटबोर्डिगचा उद्गाता’ असाच अडॅम्सचा उल्लेख अमेरिकी प्रसारमाध्यमांनी अगदी गांभीर्याने केला.. असे का झाले?
याचे उत्तर अडॅम्सनेच १४ वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीत दिले होते. ‘मी लहान होतो तेव्हा स्केटिंग आणि स्केटबोर्डिग यांत काही फरक नव्हताच. दोन्ही प्रकार रस्त्यांवर किंवा मैदानांसारख्या सपाटीवरच व्हायचे.. हे खरं स्केटबोर्डिग नव्हतंच.’ याउलट जे अडॅम्स आणि त्याचे रगेल दोस्त स्केटबोर्डाच्या फळकुटावरून मध्येच हवेत उडी मारून पुन्हा फळकुटावर काय यायचे, या चाकफळ्या साध्या रस्त्याऐवजी एखाद्या खड्डय़ातच काय चालवायचे.. या दोस्तांनी ‘झेड बॉइज’ असे नाव घेऊन, कॅलिफोर्नियात हे असले अचाट प्रयोग ठिकठिकाणी करणे आरंभले. या अचाट प्रयोगांचा खरा नायक होता जे अडॅम्स. एकदा चाकफळी स्पर्धेत (साध्या प्रकारच्या) मात्र अडॅम्स तिसरा आला. साध्या स्केटबोर्डिगची आवड त्याला नव्हतीच. चाकफळीत जिवावरचे खेळ करून प्रेक्षकांना श्वास रोखायला लावणे, त्यांना उद्दीपित करणे हेच त्याचे खरे काम. ते मनापासून करताना जणू नर्तक, सर्कसपटू, मोटरसायकल/ रेसिंग कारवरील स्वार आणि रंगमंचावरला नायक या सगळ्या भूमिका एकाच वेळी निभावत असल्यासारखा जे अडॅम्स वागे. जे अडॅम्सच्या अचाट चाकफळी-साहसांनीच या खेळाला नवी झिंग, नवी दिशा दिली. बक्षिसे जिंकून पालकांना आनंद देऊ इच्छिणाऱ्यांनी फक्त स्केटिंगमध्येच रमावे.. (ते तर जेसुद्धा वयाच्या चौथ्या वर्षांपासून करत होताच); पण बक्षिसांची वा ती मिळवण्याकरिता पाळाव्या लागणाऱ्या नियमांचीही पर्वा न करता स्वत:साठी चाकांवर स्वार होणाऱ्यांचा खेळ स्केटबोर्डिग, ही जणू व्याख्याच अडॅम्सच्या अचाटपणामुळे मिळाली.
चाकांवरून स्वर्गसुख शोधण्याचा हाच अचाटपणा जे अडॅम्सला अमली पदार्थाच्या नरकाकडेही घेऊन चालला होता. नशेत तो हाणामाऱ्या करी.  पण या सर्वातून अडॅम्स सुटला.  २००५ पासून पूर्णत: ताळ्यावर आलेला  जे अडॅम्स, शालेय विद्यार्थ्यांना साहस आणि नशा/झिंग यांतला फरक समजावून देणारी व्याख्यानेसुद्धा देऊ लागला. २०११ साली ‘स्केटबोर्डिग म्युझियम’ने त्याचा समावेश ‘हॉल ऑफ फेम’मध्ये केला, तेवढाच सन्मान. पण दुसऱ्यांसाठी जे अडॅम्सचे जगणे नुकते कुठे सुरू होत असतानाच तो जाणे चटका लावणारे आहे.