चित्रकार एका बाबतीत गांधीवादीच.. आतला आवाज ऐकूनच ते चित्रं करतात! किंवा असं की, आतला आवाज ऐकून केलेली चित्रं-शिल्पंच पुढेही पुन्हा अभ्यासाला उपयोगी पडणारी म्हणून पुन्हा पाहावीशी ठरतात.. मग तो आतला आवाज चित्रकाराने मेहनतपूर्वक आणि शोधपूर्वक सिद्ध केलेल्या शैलीचा असो की सामाजिक परिणामांचा!
बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी हे १९२० नंतर महात्मा ठरले आणि  पुढे राष्ट्रपिताही. स्वातंत्र्योत्तर काळात एक राष्ट्रचिन्ह म्हणून गांधीजींच्या प्रतिमेचा वापर सुरू झाला. गेल्या ९० वर्षांत भारतीयांना सर्वाधिक दिसणारी एकाच व्यक्तीची प्रतिमा ही गांधीजींची आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळात नोटांमुळे तर ती अतिपरिचित आहे. तरीही चित्रकलेत मात्र ‘गांधी कुणासारखे?’ हा प्रश्न योग्यरीत्याच विचारला जातो. गांधी कोणत्या चित्रकारानं साकारलेले, असा त्याचा अर्थ. पण गांधींची प्रतिमा तीच असताना कोणत्याही चित्रकारानं ती चितारल्यास काय फरक पडणार, याचा खुलासा करण्यासाठी गांधीजींकडे नव्हे, तर चित्रकलेकडेच पाहावं लागेल.. चित्रकलेत ‘गांधी कलाकाराच्या कल्पनेसारखे’ असं सोपं उत्तर तयार होतंच, फक्त त्या उत्तरातून आता कलाकाराची कल्पना कुणासारखी? कशानं घडलेली? अशीच का? असे नवे प्रश्न येतील आणि त्यातून पुन्हा ‘गांधी कुणासारखे?’ अशा पद्धतीचा प्रश्नच घट्ट होईल.
आपल्याला (महाराष्ट्राशी संबंध असलेल्यांना) माहीत असलेली चित्रकला ही जशी गॅलरीत असते तशी गॅलरीबाहेरही असते.. आजची असते तशीच जुनीही असते. शिवाय, आज जगभरच्या गॅलऱ्या वा म्युझियम यांमध्ये जुनी पोस्टरं, कॅलेंडरं यांवरल्या कलेकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. कॅलेंडर वगैरेंनी कलेच्या इतिहासात काही भर घातली नसेलही, पण आजवर कला म्हणून गांभीर्यानं न घेतली गेलेली ही चित्रं आपल्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे आपण दोन्ही प्रकारच्या कलेकडे पाहू.
आपल्यासोबत पाच चित्रं आहेत आज. त्यापैकी पहिल्यातले गांधी मराठीजनांना तात्काळ ओळखू येतील कुणासारखे ते! अर्थातच आपल्या ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या ‘संत तुकाराम’ चित्रपटात नायक विष्णुपंत पागनीस (तुकाराम) हे पुष्पक विमानातून सदेह स्वर्गाला जातात असा जो ट्रिकसीन होता, तो पाहून तसंच बनवलेलं हे गांधी-चित्र आहे. हे कॅलेंडर ‘वासुदेव आणि कं’ यांच्या स्टुडिओत चित्रबद्ध झालं आणि रविवम्र्यापासून अनेकांची चित्रं छापणारे ‘अनंत शिवाजी देसाई कं.’ यांनी ते छापलं. त्या कॅलेंडरचित्राचं नावच ‘स्वर्गारोहण’ असं आहे आणि वर देव आणि देवी गांधीजींवर पुष्पवृष्टी करताहेत, असंही आहे (तो भाग सोबतच्या अंशात छापलेला नाही, म्हणून दिसणार नाही).
मुद्दा असा की, गांधीजी हे ‘तुकाराम’ चित्रपटातल्यासारखे सदेह स्वर्गाला गेले, अशी कल्पना एका चित्रकारानं रंगवली. दुसरा चित्रकार होता बंगालातला. त्याचं नावच बंगाली कॅलेंडरं छापणाऱ्या ‘एसएनएस’ कंपनीनं दिलेलं नाही, पण या बंगाली कॅलेंडरासाठी गांधीजींचं जे चित्र काढलं गेलंय, त्यामागच्या कल्पनेचं मूळ हे व्हॅटिकनच्या ‘सेंट पीटर्स बॅसिलिका’मध्ये मायकलअँजेलोनं १४९८ वगैरे सालात जे ‘पिएता’ नावाचं संगमरवरी शिल्प घडवलं होतं, त्याच्याशी मिळतंजुळतं आहे. ‘पिएता’मध्ये क्रूसावर खिळलेल्या येशूचा निष्प्राण देह तिथून काढला जातो आणि मग त्याची शोकाकुल आई मेरी निष्प्राण येशूला मांडीवर घेऊन विलाप करते. पिएता या शिल्पाचा प्रभाव भरपूर आहे. त्यावरून पुढे अनेक चित्रं, शिल्पं बनली, पण थोर सुपुत्रासाठी मातेचा विलाप ही त्यामागची मूळ कल्पना भारतातल्या एका कॅलेंडर-चित्रकारानं बरोब्बर हेरलेली दिसते. या दोन्ही कल्पनांमागल्या कथा खऱ्याच आहेत, असा आज कुणाचाही दावा नाही, पण त्या कल्पना आणि त्यावर आधारित कल्पनादेखील स्वीकारण्याची तयारी १९४९ सालच्या भारतीय समाजात होती, याची साक्ष ही दोन कॅलेंडरचित्रं देतात.
शेजारीच जे शिल्प आहे, ते शांतिकेतनात १९२५ पासून आजन्म राहिलेल्या रामकिंकर बैज या दिवंगत शिल्पकाराचं आहे. रामकिंकर यांना ‘दांडीयात्रा’ या विषयावर मोठं (मॉन्युमेंटल) शिल्प घडवण्याचं कंत्राट म्हणजेच ‘कमिशन’ मिळालं, तोवर रामकिंकर ख्यातकीर्त झालेले होतेच, पण याच शिल्पकारानं सुरुवातीला ब्राँझसारखा धातू परवडत नाही म्हणून आणि माझी शिल्पं राहूंदेत इथेच, अशा ईर्षेनं शांतिनिकेतनात सरळ सिमेंट वापरूनच मोठमोठी शिल्पं बनवली होती. सिमेंटमुळेच तर त्यांच्या शिल्पांमधला खास ठरलेला खडबडीत पोत सिद्ध झाला. आता ब्राँझमध्ये गांधीजी घडवण्याची वेळ आली, तेव्हाही रामकिंकर यांनी सिमेंट-शिल्पांचाच पोत कायम ठेवला.. तीच जणू रामकिंकर शैली! पण गंमत अशी की, ब्राँझमध्ये ही शैली तर १८९७ वगैरे सालातच ओगुस्तँ रोदँ नावाच्या फ्रेंच शिल्पकारानं आणली होती.. रोदँनं घडवलेलं बाल्झाक या कवीचं स्मारकशिल्प ‘ब्राँझमध्ये असूनही खडबडीत पोताचं आहे, शिवाय आम्ही ज्यांचं शिल्प घडवायला सांगितलं त्यांच्यासारखं हे दिसत नाही म्हणून’ ते नापास करावं, असं फर्मान फ्रेंच निवड समितीनं त्या वेळी काढलं, त्याविरुद्ध रोदँ लढलाच. म्हणाला की, शिल्प अजिबात बदलणार नाही. अखेर हेच शिल्प मानानं स्वीकारलं गेलं. शैली म्हणून मी जो प्रयोग केलाय, त्यापुढे तुमचे ते माणसासारखा माणूस दिसणं वगैरे आग्रह फोल ठरतात, हे रोदँनं दाखवून दिलं, पण ही फ्रेंच गोष्ट इथं आत्ता वाचताना आपण एवढंच लक्षात ठेवायचं की, रामकिंकर हेदेखील स्वत:ची शैली सिद्ध केलेले, महत्त्वाचे दृश्यकलावंत होते. त्यांना त्यांची प्रसिद्धी पाहून मोठं ‘कमिशन्ड वर्क’ मिळण्याआधी जवळपास ५० र्वष ते निग्रहानं, नेटानं, अगदी मिळेल त्या साधनानिशी काम करत होते. त्यामुळे ‘तुमचा खडबडीत पोत तर रोदँच्या बाल्झाक वगैरेची कॉपीच वाटतोय की हो,’ असं कुणीही त्यांना म्हणू धजणार नव्हतं.  
अकबर पदमसी हेदेखील आता ज्येष्ठ आहेत, महत्त्वाचे आहेत. त्यांनी गरिबी फार पाहिली नसेलच, पण शैली त्यांनीही सिद्ध केली आहे. हे पदमसी मेटलक्राफ्ट (धातुकला) विभागात शिकले होते. त्यांना तिथलं ते तांब्याच्या पत्र्यावर घाव घालून आकार घडवणं भावलं, म्हणजे ती टाकीचे घाव घालण्याची क्रिया भावली. इतकी मनापासून आपलीशी वाटली ती क्रिया पदमसींना की, पुढे चित्रांमध्येसुद्धा तसाच परिणाम आपण साधला पाहिजे, असा प्रयत्न ते अगदी प्रामाणिकपणे करू लागले. आधी त्यांनी ‘मेटास्केप’ म्हणून निसर्गदृश्यं केली. जमलं. पुढे माणसंही करणार होते. त्याच्या आधी कागदावर काळ्या शाईचा ब्रश तसा टक-टक करत लावून पाहिला. जमलं नाही, पण साधनशुचिता महत्त्वाची, असं मानून पदमसी शोधत राहिले. अखेर जमलं. हे होत असताना ‘गांधी’ या विषयावर अख्खं प्रदर्शन पदमसींनी भरवलं, त्यातली फार कमी चित्रं गांधीजींसारखी दिसणारी होती. त्याबद्दल ते म्हणाले होते, ‘माझे गांधी माझ्यासारखेच असणार! ते दुसऱ्या कुणाच्या गांधींसारखे कसे असतील?’
ठसकाच लागला होता हे ऐकताना! पण चित्रकलेत ‘बरोबर काय आणि चूक काय’ असा प्रश्न नसतो. काय कुठून आलं, काय कशासारखं आहे, याची चर्चा चित्रकलेमध्ये केवळ ‘ही याची कॉपी.. ती त्याची नक्कल’ एवढीच करायची नसते. कुठून आलं म्हणजे कुठल्या अवस्थेतून आलं, असंही असू शकतं, हा धडा त्या ठसक्यातून मिळाला.
गांधीजींनी ‘आतला आवाज ऐका’ असा संदेश दिला होता. तर, आपापला आतला आवाज ऐकणाऱ्या चित्रकारांची परंपरा भारतात कमी नाहीच नाही. फक्त, समाजाला एकसंध आवाज उरलाय की नाही, हा प्रश्न नाक्यांवरचे फ्लेक्सबोर्ड पाहताना हल्ली ऐकू येतो.