महाराजांचं दिव्य चरित्र आपण जाणतो, बोधही जाणतो, श्रीमहाराजांची माणसाला माणूस  म्हणून घडविण्याची कळकळही जाणतो तरी श्रीमहाराजांवर आपण त्या टपरीवाल्या भक्ताइतकं प्रेम करतो का? त्याला त्यांचं नाव-गावही माहीत नाही मग दिव्य चरित्र तर पुढची गोष्ट. त्यांच्याकडून त्याला कसलीही अपेक्षा नाही. जगण्याची लढाई तोच लढतो आहे पण या जगात खरं माझं म्हणून जर कुणी असेल तर या निर्जीव तसबिरीतले महाराजच माझे आहेत, या दिव्य ज्ञानानं तो व्याप्त आहे. जिथे मी तिथेच ते, त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, या दिव्य भावानं तो जगत आहे. तरीही आपल्या या ज्ञानाची आणि भावाची त्याला पुसटशीसुद्धा जाणीव नाही. हे सर्व दर्शन इतकं निरागस, लोभस होतं. जणू अजाण मुलाला ‘आई माझी आहे’, या एकाच गोष्टीची मात्र पक्की जाणीव असावी आणि तो तिलाच बिलगून हसत-रडत असावा. त्या मुलाइतकाच निरागस आणि शुद्ध भाव! या गोष्टीला आता बरीच र्वष झाली पण त्याच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात. उद्धव हा प्रभूंचा जिवलग. त्यामुळे प्रभूंच्या दालनात त्याला मुक्त प्रवेश. एकदा असाच तो अचानक प्रभूंसमोर गेला तेव्हा ते रडत होते. सर्वशक्तिमान कृष्णाच्या डोळ्यांत पाणी? उद्धवानं कारण विचारलं. प्रभू म्हणाले, गोकुळातल्या गोपी माझ्या स्मरणात विव्हळत आहेत. त्यामुळे मी गलबलतो. उद्धव हसला आणि म्हणाला, प्रभू, त्या अडाणी आहेत पण तुम्ही तर ज्ञानी आहात. मग त्यांना ज्ञान देऊन त्यांचं मन स्थिर का करीत नाही? प्रभू म्हणाले, उद्धवा, त्यांच्यासमोर सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. तूच जा आणि त्यांना समजाव. उद्धव उत्साहात निघाला. गोकुळात तो प्रवेश करू लागला तर कृष्णाच्या वाटेकडेच डोळे लावून बसलेल्या गोपी त्याला दिसल्या. कृष्णाकडून कुणीतरी आलं आहे, या जाणिवेनंच त्या भारल्या आणि स्फुंदून रडत कृष्णाची विचारपूस करू लागल्या. उद्धव म्हणाला, बायांनो तुम्ही तुमच्या मनाला समजवा. त्या हसून म्हणाल्या, उद्धवा आमचं मन आमच्याकडे आहेच कुठे की त्याला समजवावे? ते तर कृष्णाकडेच गेलं आहे! उद्धव ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला तर त्या म्हणाल्या, हे कळायला आमची बुद्धी तरी कुठे आहे? कृष्णाशिवाय तिला दुसरा बोधच होत नाही रे! तुम्ही माझ्या सांगण्याचं चिंतन करा, असं उद्धव सांगू लागला तर त्या म्हणाल्या, चिंतन करायला चित्त तरी कुठे आमच्याकडे आहे रे? ते ज्यानं दिलं होतं त्याच्या ठायी जडलं आहे. कथा तर पुढे खूप आहे! यशोदा आणि राधेच्या दर्शनाने प्रेमाची परिसीमाच त्याला आकळली. ज्ञानाच्या घमेंडीत गोकुळात गेलेला उद्धव भान हरपून द्वारकेला परतला. भावावेगानं आक्रंदत तो कृष्णासमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे प्रभो! त्या गोपींइतकं प्रेम तर माझ्या या हीन हृदयात नाहीच. पण मला पुढचा जन्म गोकुळातल्या गवताचा तरी दे. निदान प्रेमानं भारावलेल्या गोपींची पावलं कधीतरी माझ्यावर पडतील आणि मी धन्य होईन! दिव्य प्रेमाचं नुसतं कळसदर्शनही असं असतं. अंतमुर्ख करणारं. पालटाची प्रेरणा देणारं.