न्यायमूर्ती मरकडेय काटजू यांच्या ब्लॉगचे नाव सत्यं ब्रूयात असे असून, त्यात ते त्यांना दिसलेली सत्ये लिहीत असतात. सध्या ते निवृत्त असल्याने त्यांना भरपूर मोकळा वेळ मिळतो व म्हणून ते अवसरविनोदनाकरिता (पक्षी: टाइमपास) लिहीत असतात असे कोणी म्हणेल, तर ते सत्य नाही. उलटपक्षी या भारतातील ९९ टक्के जनता मूर्ख असल्यामुळे – हे काटजू यांचेच अभ्यासपूर्ण मत – या जनतेस शहाणे बनविण्याकरिता ते हा ब्लॉग लिहीत असतात, असे मानण्यास जागा आहे. विद्वत्तेचा हा दर्प येण्याची कारणे शोधण्याची ही जागा नाही. तेव्हा त्यांचे मत त्यांना लखलाभ म्हणणे भाग आहे. मात्र त्या भूमिकेमुळेच सत्यं ब्रूयात या शब्दांपुढील प्रियं ब्रूयात, मा ब्रूयात सत्यं अप्रियम् म्हणजे सत्य सांगा परंतु लोकांना आवडेल असेच सत्य सांगा. अप्रिय सत्य सांगू नका हे शब्द त्यांनी कानाआड केले आहेत. ते योग्यच आहे. खरे ते खरे. ते कडू असो वा गोड. तेव्हा अशी भूमिका घेतल्याबद्दल काटजू यांचे अभिनंदनच केले पाहिजे. यात समस्या एवढीच आहे की आपण सांगतो तेच त्रिकालाबाधित सत्य अशी काटजू यांची धारणा आहे. एखाद्याला असे वाटू लागले की, मग त्यापुढे कोणाचाही इलाज नसतो. काटजू यांचे प्रकरणही असेच हाताबाहेर गेलेले आहे. परंतु आपल्या समाजाची वैचारिक यत्ता अशी की, काटजूंसारख्यांच्या कथित सत्यांनाही अनुयायी मिळतात व मग ते त्यात भर घालून आपली अक्कल समाजमाध्यमांतून पाजळू लागतात. तेव्हा काटजू यांच्या सत्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. काटजूंचे ताजे सत्य हे लो. टिळकांबद्दलचे आहे. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेल्या लेखात त्यांनी टिळक हे ब्रिटिशांचे एजंट असल्याचे मत मांडले. याचे कारण काय, तर टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ नीतीस हातभार लावला. त्यांनी िहदूविरोधी म्हणून संमती वयाच्या कायद्यास विरोध केला. आर्य भारताबाहेरून आले असा मूर्खतापूर्ण सिद्धांत मांडला. पुढे तर राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात गेल्यानंतर ते ब्रिटिशांचे प्यादेच बनले. अशीच सत्ये काटजू यांनी म. गांधी, सुभाषचंद्र बोस, सर सय्यद अहमद यांच्याबद्दल मांडली आहेत. म्हणजे गांधी हे सनातनी िहदू होते व म्हणून ते ब्रिटिशांचे एजंट होते. बोस तर जपान्यांचे प्यादे आणि सर सय्यद यांनी मुस्लिमांसाठी विद्यापीठ काढले म्हणून तेही ब्रिटिशांचे एजंट. कारण या सर्वामुळेच ब्रिटिशांची ‘फोडा आणि झोडा’ नीती यशस्वी झाली. येथे बाकीच्या नेत्यांबद्दल काय, असा प्रश्न निर्माण होईल. तर त्यांची-त्यांची जयंती-पुण्यतिथी आली, की काटजू त्यांची एजंटगिरीही बाहेर काढतील यात शंका नाही. काटजू हे सत्य मांडत आहेत याचे कारण ते खरे देशप्रेमी आहेत. त्यामुळेच ते सम्राट अकबराला आधुनिक भारताचा शिल्पकार मानताना दिसतात. ते ते नेते त्यांच्या काळातून उचकटून आजच्या वर्तमानात आणले आणि इतिहासावर वर्तमान आरोपित केले, की अशी सत्ये बाहेर काढता येतात. काटजू तेच करीत आहेत. वाईट हेच की, अशी तर्कटे मांडणारे ते एकटेच नाहीत आणि इतिहासाची अशी फेरमांडणी करणाऱ्यांचे दिवस ऐनभरात आहेत.