कला ही निखळ आनंद देणारी दैवी देणगी असते, ती ज्याच्यावर प्रसन्न असते त्याला तर समृद्ध करतेच. त्याचबरोबर रसिकांच्या चित्तवृत्तीही मोहरून टाकते. कर्नाटकचे कलाकार एल. एन. तल्लूर यांना लाभलेले कलानैपुण्यही याच प्रकारातील आहे. त्यांना अलीकडेच दहा लाख रुपयांचा स्कोडा कला पुरस्कार मिळाला आहे. राजकारण, संस्कृती, परंपरा, अध्यात्म, तंत्रज्ञान-पर्यावरणाची घसरण असे अनेक विषय त्यांनी त्रिमिती कलाकृतींमधून मांडले आहेत. त्यांच्या चित्र व शिल्पकृतींवर त्यांचे गुरू भूपेन खाखर यांचा प्रभाव आहे यात शंका नाही. ग्रामीण भारतातील चिन्हे, प्रतीके व परंपरा यांचा सुरेख संगम त्यांच्या कलाकृतीतून घडतो. त्यांचा जन्म कर्नाटकातील कोटेश्वर या  छोटय़ा गावात १९७१ मध्ये झाला.  परंपरा, नवता आणि समकालीनता यांचा सुरेख संगम त्यांच्या कलाकृतींतून दिसून येतो. त्यांच्या कलाकृतींचे विषय असेच विरोधाभासातून जन्म घेणारे आहेत. एकीकडे ग्रामीण परंपरेतील वरवर खुळचटपणा वाटेल अशा अर्थगर्भ, आनंददायी विसंगती तर दुसरीकडे पैशाचे कारखाने बनलेली अतिवास्तववादी शहरे अशी टोकाची स्थिती त्यांनी कलाकृतीतून टिपली आहे. त्यांच्या शिल्पांमध्ये काही मोडक्या वस्तू, आकार गमावलेल्या वस्तू वापरून आंतरिक सौंदर्य असणारी वेगळीच कलाकृती आकार घेते. म्हैसूर विद्यापीठाच्या चामराजेंद्र अ‍ॅकॅडमी ऑफ व्हिजुअल आर्ट्स या संस्थेतून ते चित्रकलेत पदवीधर झाले व नंतर बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून म्युझियॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. इंग्लंडच्या लीड मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीने त्यांना १९९९ मध्ये शिष्यवृत्ती दिली त्या वेळी त्यांनी समकालीन ललित कलेत पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने अनेक देशांत झाली. तल्लूर यांची ‘क्विंटेसेन्शियल’ ही कलाकृती मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात सादर करण्यात आली होती, त्यात पाचवी मिती हा सिद्धांत मांडला आहे. जेव्हा एखादी कलाकृती संग्रहालयात मांडली जाते, तेव्हा ती पाचवी मिती निर्माण करते, जी आइनस्टाइनच्या चार मितींमध्ये भर घालणारी आहे, असे ते म्हणतात. क्रोमॅटोफोबिया, प्लासेबो, अ‍ॅण्टीमॅटर या त्यांच्या कलाकृती विशेष गाजल्या आहेत.