संजय गांधी उद्यानासह १८ वन उद्यानांच्या क्षेत्रात कपात करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याची बातमी (लोकसत्ता, २९ जाने.) वाचली. या जमिनींचा कशा प्रकारे ‘विकास’ होणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही.  गेल्या काही वर्षांत भूविकासकांना ‘भस्म्या’ रोग झालाय की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय खरी.
मुंबईतील गिरणी संपानंतर तेथील जमिनींचा विकास झाला, नंतर पवईपासून विक्रोळी पार्कसाइटपर्यंतच्या जंगलाचा ‘विकास’ झाला. पुढे भांडुप-मुलुंडच्या वनजमिनींवर निर्मळ अशी जीवनपद्धती विकसित झाली. मुलुंड ते घाटकोपरस्थित मिठागरांच्या जमिनी खुल्या झाल्या व आता जैविक विविधतेने नटलेल्या अभयारण्यांचा लचका तोडायचा घाट. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्र हा भूविकासकांचे अभयारण्य आहे.
या सगळ्या बजबजपुरीत एक आशेचा किरण दिसतो आहे तो म्हणजे, केंद्रीय विधि व न्याय विभागाकडून सदर क्षेत्र वगळण्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती मागवल्या जातील, तेव्हा जनता अभयारण्ये आक्रसवण्याच्या प्रक्रियेला कडाडून विरोध करील काय?

धर्मभावना आणि विचारस्वातंत्र्य
‘धर्मभावनांपुढे विचारस्वातंत्र्य ही किरकोळ बाब’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, ३० जाने.) वाचले. पत्रातील मुद्दे चांगलेच. मात्र शेवटच्या परिच्छेदातील ‘सदैव धर्मप्रेमी लोकांच्या दडपण आणि भयाच्या छायेत वावरले पाहिजे, आपल्या विचारस्वातंत्र्याला आवर घातला पाहिजे’ या आशयाच्या विधानातील उपरोध जाणवत असला तरी योग्य वाटत नाही. वैचारिक स्वातंत्र्याच्या खऱ्या पुरस्कर्त्यांने कोणत्याही दडपणाला बळी न पडता आपले विचार खणखणीतपणे समाजासमोर मांडायलाच हवेत.
  नुकताच लॉरेन्स क्राऊस या शास्त्रज्ञाचा ‘दि न्यूयॉर्कर’मधील एक लेख वाचण्यात आला. एरिक मेटॅक्सस नावाच्या एका नागरिकाने ‘आधुनिक विज्ञान ईश्वराची बाजू मांडीत आहे’ अशा आशयाचा एक लेख लिहिला होता. लॉरेन्स यांनी त्या लेखनातील सर्व मुद्दे व्यवस्थितपणे खोडून काढले व निरीश्वरवादाची बाजू वैज्ञानिक सत्यांचा आधार देऊन बळकटपणे मांडली आहे. दोन्ही लेखांमधील मुद्दय़ांची चर्चा हा या पत्राचा उद्देश नाही. मला असे म्हणायचं आहे की आपल्याकडेही ‘आमच्या आध्यात्मिक विचारांना आधुनिक विज्ञान उचलून धरीत आहे,’  अशा प्रकारची विधाने वारंवार ऐकायला मिळतात. त्यांचा कोणाकडून, विशेषत: अधिकारी व्यक्तींकडून प्रतिवाद होत नाही. आमच्यातील ज्येष्ठ शास्त्रज्ञसुद्धा या बाबतीत उदासीन असतात. त्यामुळेच जुनाट परंपरांना कवटाळून बसलेल्या अंधश्रद्धाळूंचे फावले. नवीन विचारांची व वैज्ञानिक सत्याची पाठराखण वैज्ञानिकांनीच केली नाही तर मग ती करायची कुणी? समाजाला अंधारातच चाचपडत ठेवायचे काय? (वि)ज्ञानदीप हाती घेतलेल्या शास्त्रज्ञांजवळच या प्रश्नांची उत्तरे आहेत.
– भालचंद्र कालीकर
 
भ्रष्टाचार प्रकरणांचा आढावा आवश्यक
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या बातम्या सतत वाचावयास मिळतात. नंतर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला कोर्टासमोर हजर केले जाते व तो जामिनावर सुटतो. कालांतराने त्यातले काही जण पुन्हा सेवेत रुजू होतात. मात्र किती प्रकरणांत कोणाकोणाला शिक्षा झाली, त्यासाठी किती वष्रे लागली इत्यादी तपशील नागरिकांपर्यंत पोचत नाही. पत्रकारांनी बातमी दिल्यानंतर त्या विषयाचा शेवट काय झाला हे सुद्धा वाचकांपर्यंत पोचविले पाहिजे, असे वाटते. वर्षांतून किमान दोन वेळा तरी अशा प्रकरणांचा आढावा घ्यावा. अन्यथा एखादी सनसनाटी बातमी एवढाच अर्थ त्यात दिसतो, तसे होता कामा नये.
 – मधु घारपुरे, सावंतवाडी

आमची(च) मुंबई !
‘उंदीरमामा की जय’ ही बातमी (३० जाने.) वाचली. उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे किती प्रकारचे धोके संभवतात याची माहिती त्यात आहे. शांततेचे प्रतीक असलेली कबुतरे बेसुमार प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्यक्षात किती गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे मूळ ठरत आहेत याचीही माहिती मध्यंतरी प्रसिद्ध झाली होती. श्वानांच्या बाबतीत तर काही बोलायची सोयच नाही. देशाच्या आíथक राजधानीत रस्त्यावर हत्ती, मोकाट गुरे, हेसुद्धा काही फार दुर्मीळ दृश्य नाही. एके काळी मुंबई सर्वभाषिकांची की मराठी माणसांची असा वाद फार चवीने चघळला जात असे. त्यानंतर मिठी नदीतून बरेच (सांड)पाणी वाहून गेले आहे. शहरातले हे वाढते ‘जैववैविध्य’ पाहून मुंबई मराठी माणसांची सोडाच पण ‘माणसांची’ तरी राहील का हाच आता कळीचा मुद्दा आहे.
 – विनिता दीक्षित, ठाणे</strong>

‘संयत मद्यपान’ आणि ‘मद्यपाशग्रस्तता’
माझ्या लेखावर (रविवार विशेष, २५ जाने.) प्रतिक्रिया लिहिताना ‘संयत मद्यपी’ची व्याख्या करण्याची मागणी पत्रलेखकाने (लोकमानस, ३० जाने.) केली आहे. जर दारूबंदीचा प्रस्ताव हा सरसकट नसून निवडक ‘मद्यपाशग्रस्तां’पुरताच असता तर ही मागणी रास्तच ठरते. व्याख्या पुरवण्याची जबाबदारी मात्र प्रथम बंदीवाद्यांवर येते. तरीही प्रबोधनाच्या दृष्टीने पथ्ये कोणती? आणि ग्रस्त असल्याची शंका कधी घ्यावी, याची उत्तरे देत आहे.
संयत राहण्यासाठी कोणकोणत्या परिस्थितीत दारू पिऊ नये हे प्रथम पाहू. दिवसा, सकाळी, लगेच झोपी जाण्याची संधी नसताना, एकटय़ाने, वाईट मनोवस्थेत, घटाघटा, उपाशीपोटी, साधारणत: आठवडय़ाची गॅप न घेता, तसेच तोल सुटू लागेपर्यंत दारू पिऊ नये. गॅप ही व्यक्तिपरत्वे कमी-अधिक असू शकेल. जर दुसऱ्या दिवशी सकाळी, पत्रलेखक म्हणतात तसा, पश्चात्ताप होण्याइतकी अस्वस्थता येत असेल तर ती धोक्याची घंटा समजावी. तसेच इतर विकार काय आहेत, कोणते औषध घेतलेले आहे यानुसारही बंधने येतात. शेवटी संयततेची अग्निपरीक्षा बेजबाबदार वर्तन नसणे यातच आहे.
मद्यपाशग्रस्तता सुरू होण्याचे लक्षण विरहार्तता म्हणजेच क्रेिव्हग हे आहे. इतरत्र लक्ष न लागणे आणि आज संध्याकाळी कोणाला गाठायचे? याचेच विचार मनात येऊ लागणे, ही नक्कीच धोक्याची घंटा असते. तसेच इतर निमित्तांनीदेखील कोणत्याही भावनेचा प्रमाणाबाहेर व अनावर आवेग येत असल्यास प्रथम मानसोपचार घ्यावाच.  जे केल्याशिवाय राहवत नाही पण केल्यावरही समाधान लाभत नाही, अशी एरवी पवित्र मानली गेलेली गोष्ट जरी असेल, तर तीही एक अनावर-पुनरावृती म्हणजेच ऑब्सेशन असते. आसक्ती-प्रवणता ही गोष्ट मद्य्ोतर बाबतीतही दिसू शकते. मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता ही गोष्ट, दारूबंदी असो वा नसो, अत्यंत आवश्यक आहे. ऊठसूट सरकारावलंबित्व हे सध्याचे सर्वाधिक घातक ऑब्सेशन आहे.
– राजीव साने, पुणे