भगवंत सांगतात, पान, फूल, फळ हे तर निमित्त आहे! ते ज्या शुद्ध भक्तिभावानं दिलं जातं, तो भाव मी ग्रहण करतो! स्वामी स्वरूपानंदही ‘संजीवनी गाथे’त सांगतात, ‘‘भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ। पान फूल फळ भक्ति-भावें।। १।। भक्ताची ती भेट आवडे अनंता। भुलोनी देखतां मुखीं घाली।। २।। षोडशोपचार पूजेचा संभार। भार तो साचार भावाविण।। ३।। येर फूल पान भक्तीची ती खूण। भावचि प्रमाण स्वामी म्हणे।। ४।। (क्र. १३२). भक्तिभाव नसताना षोडशोपचार पूजा केली तरी ती व्यर्थ ओझंच होणार! आणि शुद्ध भाव असेल तर पान, फूल, फळ, पाणी काहीही का असेना ती सर्वोच्च पूजा ग्रहण करायला, स्वीकारायला भगवंतही आसुसला असणार! ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायात याचे अनेक दाखले आहेत. भगवंत सांगतो, भक्त प्रेमभरानं एखादं फळ, मग ते कोणत्याही झाडाचं का असेना, मला अर्पण करतो तेव्हा दोन्ही हात पसरून मी ते घेतो. कसं घेतो? ‘देठुं न फेडितां सेवीं। आदरेंशी।।’ (ओवी ३८३). त्या फळाचा देठही न काढता मी देठासकट ते फळ मोठय़ा आनंदानं ग्रहण करतो, खाऊन टाकतो! मी वास घ्यावा म्हणून भक्तानं मोठय़ा प्रेमानं मला एखादं फूल दिलं तर तेदेखील मी भक्तीला भुलून तोंडातच टाकतो! अरे, फुलाचीच काय गोष्ट? एखाद्यानं भावतन्मयतेनं झाडाचं एखादं पानसुद्धा दिलं ना, मग ते ताजं का नसेना, सुकलेलं का असेना, (तें साजुकही न हो सुकलें) त्यातील प्रेमरस पाहून एखाद्यानं अमृत जसं प्यावं त्या ओढीनं मी ते पानच खाऊन टाकतो! आता एखाद्या भक्ताला फळ, फूल काय, पानदेखील द्यायला सुचलं नाही आणि भावनेच्या भरात त्यानं नुसतं पाणी जरी मला अर्पण केलं तर त्या पाण्याच्या थेंबातदेखील तो मला अनंत मंदिरं, अनंत रत्नं, अनंत सुगंधी द्रव्यं, अनंत पर्वतरांगाच जणू मला अर्पण करतो! मी ते अगदी आनंदानं स्वीकारतो!! थोडक्यात, भक्तिभावानं अगदी सामान्यातली सामान्य गोष्ट जरी दिली तरी मी ती आनंदानं ग्रहण करतो, असा याचा अर्थ आहे. त्याचबरोबर या पान, फूल, फळाचा गूढार्थदेखील विलक्षण आहे आणि आपण तो ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरात पाहिला आहे. पान म्हणजे काय हो? तर पालवी. भक्ताच्या मनात इच्छेची, आशेची पालवी असलीच तर ती मी खुडून घेतो! भक्ताचं फूलही स्वीकारताना भगवंत त्याच्या जीवनातला भौतिकाचा बाह्य़त: ‘सुख’द वाटणारा, पण अंतिमत: दु:खच देणारा जो अनावश्यक फुलोरा आहे ना, तोच खाऊन टाकतात! फळ नुसतं स्वीकारत नाहीत तर देठासकट स्वीकारतात, म्हणजेच या जीवनातलं प्रारब्ध, कर्मफळ स्वीकारतातच, पण ते समूळ नष्टही करून टाकतात! पाणी म्हणजे तर आंतरिक भाव. एखाद्या भक्ताच्या मनात अन्य कोणत्याही इच्छेची पालवी नसेल, भौतिकाचा फुलोराही नसेल, कर्मफळही नसेल तर त्याच्या आंतरिक शुद्ध भक्तिधारेतला एक थेंबदेखील अनंत मंदिरं, अनंत रत्नं यांच्यापेक्षा जास्तच भरतो! सद्गुरूदेखील भक्ताच्या जीवनातली इच्छेची पालवी, भौतिकाचा अनावश्यक फुलोरा, कर्मफळ नष्ट करून हा आंतरिक भावप्रवाहच तर खुला करतात!