डाव्या कामगार संघटनांनी सरकारी क्षेत्रातील आणि संघटित कामगारांच्या संघटना बांधल्या, पण खासगी क्षेत्राला कमी लेखण्यात आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांकडे दुर्लक्ष करण्यात त्यांनी धन्यता मानली. याच काळात रा स्व संघाने सांस्कृतिक गरजांकडे लक्ष दिले, धर्मातर वगैरे रोखण्यासाठी का होईना असंघटितांकडे लक्ष दिले आणि प्रशासकीय परीक्षांचे वर्गही चालवले.. हे सारे प्रकाश करात यांना आता कळते आहे!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही शिका, असा आदेश दस्तुरखुद्द प्रकाश करात यांनीच स्वपक्षीयांना दिला आहे. करात हे विचारी राजकारणी मानले जातात आणि कम्युनिस्टांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातीतील एक प्रकाशमान व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन केले जाते. अशा या करात यांनी चेन्नई येथे एम. के. पंधे स्मृती व्याख्यान देताना कामगार संघटनांना, त्यातही विशेषत: डाव्या संघटनांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही शिका असा उपदेश केला. मधुकर काशीनाथ पंधे हे सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन, म्हणजे सिटू, या देशातल्या सर्वात मोठय़ा कामगार संघटनेचे सरचिटणीस होते. २०११ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात करात यांनी ही गरज व्यक्त केली. पंधे यांचे बरेचसे कार्य सरकारी मालकीच्या उद्योगांतून झाले आणि हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग टिकावयास हवेत, असे त्यांचे मत होते. अर्थविचाराच्या भाबडय़ा अवस्थेत अनेकांना असेच वाटत असते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या उद्योगांना नफातोटय़ाच्या सर्वच निकषांतून वगळले जाते आणि तो उद्योग केवळ सरकारचा आहे म्हणून पवित्र मानण्याचा प्रघात पडतो. भारतात डाव्यांचा कामगार क्षेत्रातला वचक सुलभपणे वाढण्यास त्यांचा हा सरकारी क्षेत्रातील वावर महत्त्वाचा ठरला. याचे कारण या क्षेत्रात त्यांना एकगठ्ठा सदस्य मिळत गेले आणि जे जे सरकारी मालकीचे ते कोणाच्याही मालकीचे नाही असे मानण्याच्या पद्धतीमुळे वाटेल त्या आचरट मागण्या करून त्या पदरात पाडून घेता आल्या. डाव्यांचा संघटित कामगार क्षेत्रात त्यामुळे दरारा तयार झाला. एक वेळ ते क्षम्य मानता आले असते. परंतु कामगार चळवळीचे असे सरकारीकरण करण्याच्या नादात डाव्यांनी जे जे खासगी ते ते सर्व पापी आणि शोषण करणारे असे चित्र उभे केले. नफा म्हणजे जणू अब्रह्मण्यम असा त्यांचा दृष्टिकोन होता. अर्थसाक्षरतेचा अभाव असलेल्या आपल्या देशात या अशा बेताल आरोपांवर विश्वास ठेवणारे मोठय़ा प्रमाणावर असतात. त्यामुळे डाव्यांच्या या विपरीतबुद्धी धोरणाचा दुष्परिणाम झाला. परिणामी खासगी क्षेत्र मागे लोटले गेले. खासगी क्षेत्रातील काही जण कल्याणकारी असू शकतात किंवा सर्व काही शोषणाच्या हेतूनेच व्यवसायात आलेले असतात असे नाही हे डाव्यांना कळेपर्यंत बराच काळ निघून गेलेला होता. यातील गमतीची बाब ही की जे डाव्या नेत्यांना कळत नव्हते वा कळून घ्यायचे नव्हते ते सर्वसामान्य कामगारांना मात्र सहज समजत होते. याचे उदाहरण म्हणजे जमशेदपूर येथील टाटा स्टीलचा कारखाना. या प्रकल्पात शिरकाव करून आपला डावा इंगा दाखवण्याचा प्रयत्न थेट दिवंगत श्रीपाद अमृत ऊर्फ भाई डांगे यांनीदेखील अनेकदा करून पाहिला. त्यात त्यांना यश आले नाही. कामगारांनी त्यांना थारा दिला नाही. टाटा स्टीलमध्ये जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पुढे अनेक अन्य कंपन्यांतही घडली. टाटा समूहात डाव्यांना शिरकाव मिळाला नाही. अन्यत्र जेथे होते तेथून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. कारण जे जे खासगी ते ते वाईट हे सर्रासपणे न मानणारा लाभार्थी कामगारवर्ग आपल्याकडे तयार झाला आणि त्याच वेळी केवळ सरकारी आहे म्हणून ते चांगले मानावयास हवे हे तो नाकारू लागला. डावे अडकून बसले ते या बेचक्यात. कारण ते पोथीतून बाहेर येण्यास तयार नव्हते. वास्तविक त्यांच्यासाठी ज्यांनी पोथ्या लिहिल्या त्या देशाची आर्थिक दुरवस्था झाली आणि सर्व काही सरकारी असूनदेखील खासगी क्षेत्रापेक्षाही अधिक भ्रष्टाचार तेथे बोकाळला असल्याचे दिसून आले. त्याकडे डाव्यांनी डोळेझाक केली. जगातील कामगार हे या मुद्दय़ावर एकत्र येतील हे असे मानणे हाच मुदलात भव्य भाबडेपणा होता.    
ज्याप्रमाणे धर्माध पोथीनिष्ठ असतात आणि पुराणातल्या वांग्यांचे तेल आधुनिक वर्तमानावर ओढणे त्यांना आवडते त्याचप्रमाणे डाव्या कर्मठांचे झाले नाही काय? मार्क्‍सवाद हा त्यांनी धर्मच मानला आणि वास्तवाकडे पाठ फिरवण्यातच त्यांनी धन्यता मानली. या दोन्ही धार्मिकता तितक्याच फसव्या होत्या. म्हणजे रा स्व संघ वा परिवाराने राम या दैवताच्या कथित जन्माच्या अनुषंगाने जनमतास भुलवणे जितके खोटे होते तितकेच डाव्यांनी मार्क्‍सवादाच्या गप्पा मारणे असत्य होते. पश्चिम बंगाल वा केरळात या त्यांच्या अप्रामाणिकपणाची मुबलक उदाहरणे सापडतील. या अप्रामाणिकपणामुळे या दोघांचेही वास्तवाचे भान सुटले. परिणामी वैचारिकतेच्या दोन टोकांना असलेले संघीय आणि डावे अनेक आर्थिक प्रश्नांवर एकाच पट्टीत रडगाणे गाताना दिसतात. परकीय गुंतवणूक आणि कामगार कायद्यात सुधारणा ही त्याची दोन जिवंत उदाहरणे. तरीही संघाकडून काही शिका असे सांगावेसे करात यांना का वाटते?    
त्याचे उत्तर शोधताना मानवाच्या मूलभूत प्रेरणा नाकारण्याच्या डाव्यांच्या अट्टहासापर्यंत मागे जावे लागेल. नफा ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि तो जास्तीत जास्त मिळायला हवा असे वाटण्यात काही गैर आहे असे नाही. फरक इतकाच की तो मिळवताना इतरांची पिळवणूक वा फसवणूक होणार नाही ना याची काळजी भांडवलशाहीत घेणे अपेक्षित असते. चार पैसे गाठीशी आल्यावर व्यक्तीच्या सांस्कृतिक जाणिवा जाग्या होतात हे संघाने ओळखले आणि याच टप्प्यावर सावधपणे पवित्रा घेत जास्तीत जास्त जणांना आपल्याकडे ओढले. त्याच वेळी डाव्यांना हे वास्तवच अमान्य असल्यामुळे नफा कसा वाईट आदी पोपटपंची ते करत राहिले. त्यातही त्यांची लबाडी अशी की ही सर्व दादागिरी त्यांनी प्राधान्याने केली ती संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी. असंघटितांच्या कल्याणासाठी त्यांनी फारच उशिरा हात घातला. तोपर्यंत तेथे धर्ममरतडांनी आपापल्या जागा बळकावलेल्या होत्या. धर्मातराची मोठी प्रकरणे घडली ती याचमुळे. तेव्हा त्या वर्गाच्या कल्याणाच्या हेतूने नव्हे तर हिंदू धर्मीयांचे धर्मातर घडवले जात आहे या चिंतेने संघ आणि/ किंवा परिवार त्याकडे वळला आणि त्याही क्षेत्रात त्यांनी हातपाय पसरले. असंघटितांकडेही लक्ष देण्याची गरज आहे, हे करात यांना आज वाटते ते यामुळेच.
संघाने ज्या सातत्याने आणि जे काही केले ते करण्यात आपण कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली करात यांनी या भाषणात दिली आहे. परंतु ती अपूर्ण आहे. संघाने नोकरशाही असो वा अन्य काही. तेथे आपला प्रसार केला, असे करात दाखवून देतात. अगदी प्रशासकीय सेवांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे कामदेखील संघ करतो, असे ते म्हणाले. या पाश्र्वभूमीवर डाव्यांची कबुली अपूर्ण ठरते ती त्यांच्या या गरजा न मानण्याच्या वृत्तीमुळे. सरकारी नोकरी आदी मुद्दय़ांकडे त्यांनी इतके दिवस त्यांना बुज्र्वा ठरवत दुर्लक्ष केले. त्यामुळे या वर्गाने डाव्यांकडेच दुर्लक्ष केले. आता अस्तित्वाचा प्रश्न आल्यावर या चुकांची जाणीव करात यांना झाली.
 पुढील वर्षांच्या पूर्वार्धात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदावरून करात निवृत्त होतील. ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे निवृत्तीनंतर शहाणपण येते तसेच हे झाले. करात यांना ही जाणीव सेवेत असताना झाली असती तर डाव्या पक्षांचे अधिक भले झाले असते. कारण व्यवस्थेच्या विरोधात उभा राहणारा डावा विचार व्यवस्थेच्या सुदृढतेसाठी आवश्यकच असतो. हा प्रकाश जरा लवकर पडावयास हवा होता.