24 July 2017

News Flash

आमची भूमिका जातीय नाही, हे आम्ही स्पष्ट केले नाही

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा

पुणे | Updated: August 20, 2015 3:54 AM

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला माझा व माझ्यासारख्या इतर पुरोगामी लोकांचा विरोध आहे, असे प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले, परंतु तो विरोध का आहे हे कोणत्याही बातमीत स्पष्ट झालेले नसल्याने हा खुलासा करणे गरजेचे आहे.
‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिणाऱ्या कॉ. गोिवद पानसरे यांचा निर्घृण खून झाल्यानंतर एक-दीड महिन्यातच महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. या पुस्तकात पानसरेंनी असे मांडलेले आहे की, शिवाजी महाराज हे सामान्य माणसाला आधार देणारे, रयतेचे राज्य निर्माण करू इच्छित होते. ते मुसलमानांचा द्वेष करणारे नसून, िहदूंचे राज्य निर्माण करणे हा त्यांच्या स्वराज्यनिर्मितीचा हेतू नव्हता. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणे हे पानसरेंच्या खुनामागील एक कारण आहे, असे आम्हाला वाटते. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांची मांडणी केली म्हणून पानसरेंचा खून झाला आणि शासनाच्या बेपर्वाईमुळे खुनी अजून मोकाट आहेत.
पानसरेंच्या खुनानंतर सर्व पुरोगामी कार्यकत्रे पानसरेंचा शिवाजी महाराष्ट्रात सर्वत्र पोचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत होते, ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका मोठय़ा प्रमाणात वितरित करत होते. अशा वेळी शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला विरोधी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वापर केला जात आहे अशी भावना सर्व पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि म्हणून या पुरस्काराला विरोध आहे.
बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्र कथन करणारे शाहीर आहेत, शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांनी त्यांचे जीवितकार्य मानले आहे व ते त्यांनी अत्यंत निष्ठेने केले आहे, महाराष्ट्रातील जनसामान्यांपर्यंत शिवाजी महाराजांचे चरित्र पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शाहिरीमध्ये फक्त इतिहास नसतो त्यात कल्पनेच्या भराऱ्या, गुणवर्णन, काव्य, भावनेला आवाहन असे इतर अनेक घटक असतात. लोकप्रिय शाहिरांच्या कथनातून निर्माण झालेल्या महापुरुषांच्या प्रतिमा या संधिसाधू राजकारण्यांकडून वापरल्या जातात. या प्रकरणात असेच घडले आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शाहिरीतून निर्माण झालेली शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या राजकारणासाठी वापरता येईल हे जोखून, ही शाहिरी प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वास्तवातील राजकीय भूमिका आहेत, असे भासवून त्या आधारे महाराष्ट्रात जे राजकारण केले गेले व जात आहे त्याला आमचा विरोध आहे.
शिवाजी महाराजांची मुसलमानविरोधी प्रतिमा रंगवून त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे आमच्यासाठी जसे निषेधार्ह आहे तसेच समाजातील जातीय तेढ वाढविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणे हेही आमच्यादृष्टीने निषेधार्ह आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निषेध करताना हा निषेध आपण का करत आहोत हे सांगितलेच पाहिजे, हे आमच्या उशिरा लक्षात आले, ही आमची चूक झाली कारण या पुरस्काराचा निषेध करणाऱ्या इतरांचा बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाला झालेला विरोध हा वैचारिक मतभेद या भूमिकेतून नाही तर तो जातीयवादी भूमिकेतून झालेला असेल हे आम्ही लक्षात घेतले नाही.
आपल्याला जे म्हणायचे आहे ते मांडणारा योग्य प्रतिनिधी समाजकारणात व राजकारणात न मिळणे ही इथल्या सामान्य माणसाची अगदी मूलभूत अडचण आहे. जाती-धर्मनिरपेक्ष राज्य चालवणारे, सुभेदाऱ्या बरखास्त करून सामान्यांचे राज्य आणणारे, या उद्दिष्टांप्रति कृतिशील राहणारे जे शिवाजी महाराज आम्हाला हवे आहेत तसे शिवाजी महाराज इथल्या प्रस्थापित राजकारण्यांपकी कोणालाच नको आहेत.
कविवर्य वसंत बापटांची एक सुंदर कविता आहे.. ‘ त्रलोक्य व्यापुनीही कोठे न राहणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा’; त्याच धर्तीवर आमचे म्हणणे आहे की, ‘माझा शिवाजी नाही राजकीय पक्षात मावणारा.’
मुक्ता दाभोलकर, पुणे

आव्हाडांच्या व्यासपीठावर (तेव्हा) बाबासाहेब पुरंदरे
ठाण्यातील एक घटना- सन २००७ – पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून सíव्हस रोडवर, दिवाळीनिमित्त भर रस्त्यात किल्ले स्पर्धा. पारितोषक समारंभदेखील भर रस्त्यात अर्थात रस्ता अडवूनच आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे होते बाबासाहेब पुरंदरे. संध्याकाळची वेळ, संपूर्ण रस्ता बंद (स्टेजवर कुमार केतकर हेही होते). या कार्यक्रमाचे आयोजक होते जितेंद्र आव्हाड. शिवाजी महाराज, किल्ले, या संदर्भात बाबासाहेब हेच ‘योग्य’ म्हणून बोलावले होते.
तात्पर्य, हे सर्व राजकारणी लोक सामान्य माणसांच्या भावनेशी त्यांच्या ‘राजकीय’ फायद्यासाठी हवा तसा आणि हवे तेव्हा वापर करतात.
प्रशांत पंचाक्षरी, ठाणे.

पवारांचे ‘ते’ भाषण वाचावे
पुरोगाम्यांचे मौंजीबंधन या अग्रलेखाने तथाकथित पुरोगाम्यांच्या संस्थांच्या आíथक अवलंबित्वाचा आणि  ब्राह्मणद्वेषाच्या काविळीचा दंभस्फोट केला आहे. आज महाराष्ट्रातील घराघरात शिवचरित्र वाचले जाते ते बाबासाहेबांचे आणि बाबासाहेबांमुळे ही वस्तुस्थिती आहे. शिवचरित्राला बाबासाहेबांनी मिळवून दिलेली लोकप्रियतता अतुलनीय आहे. त्यासाठीच त्यांनी आयुष्यभर काम केले आहे.  असे असताना या गदारोळाचे कारण काय असावे याचे कुतूहल वाटते.  शिवचरित्र खोडून काढणे जमत नाही म्हणून शिवचरित्रकारांना झोडून काढणे हे काही खरे नव्हे! बाबासाहेबांना सन्माननीय पदवी देताना शरद पवार यांनी केलेले भाषण पुन:प्रसिद्ध केल्यास या प्रकरणावर आणखी वेगळा प्रकाश पडेल.
मनीषा जोशी, कल्याण

‘समाजाला मार्ग दाखविण्याच्या’ गरजेचे काय?
‘पुरंदरेंनी स्वत:ला कधीही इतिहास संशोधक मानले/ म्हणवले नाही व ते स्वत:ला छत्रपतींचे शाहीर/ कीर्तनकारच म्हणवतात’ असे ‘पुरोगाम्यांचे मौंजीबंधन’ या अग्रलेखात मान्य करण्यात आले आहे. मग पुरोगाम्यांनी हाच मुद्दा मांडला तर यात ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ वाद कुठे उपस्थित होतो? एक ‘फडणवीस’ आडनावाची व्यक्ती मुख्यमंत्री बनून ‘पुरंदरें’ना पुरस्कार देते हाच पुरोगाम्यांचा खरा पोटशूळ आहे, हा अग्रलेखात केलेला बेलगाम आरोप, आरोप करणाऱ्याच्या मनातील जातीविषयक गंड उघड करून दाखवतो, आरोपींच्या मनातील नव्हे. मुख्यमंत्री ही जनतेने (सर्व जातीधर्माच्या लोकांनी) एकत्र लोकशाही मार्गाने निवडून दिलेली व्यक्ती असते; तिची व्यक्तिश: जात पाहायची नसते, हा लोकशाहीतील मूलभूत संकेत हा अग्रलेख पाळत नाही.
या अग्रलेखातील ‘शिवाजी हा क्षत्रिय होता, म्हणजेच ब्राह्मण नव्हता’ वा पेशवे हे ब्राह्मण होते हे सुचवणारी वाक्ये नक्की काय म्हणू पाहात आहेत? तीन-चार शतकांपूर्वीच्या नेत्यांचीही जात पाहिली जावी? त्यांच्या जातीशी आपल्याला देणेघेणे असावे की त्यांच्या कर्तृत्वाशी? प्रगतिशील समाजात जातीपातींचा समाजमनावरील पगडा कमीकमी होणे गरजेचे असताना हा अग्रलेख तो वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही काय? या लेखातून पुरोगाम्यांच्या नावाने जातीविषयक बोटे मोडण्यापलीकडे समाजाला कुठला नवीन मार्ग दाखविला आहे? मग लेखात म्हटलेल्या ‘तटस्थ बुद्धिवंतांनी समाजाला मार्ग दाखविण्याच्या’ गरजेचे काय? जातीपातींच्या जुन्या, बुरसटलेल्या विचारसरणीकडे उलट हा अग्रलेख वाचकाला वळवतो असेच खेदाने म्हणावे लागेल.
प्रवीण नेरुरकर, मुंबई

पुरस्काराला यापूर्वीही विरोध झाला आहेच..
बहुजन आणि मराठा तरुण यापूर्वी अल्पशिक्षित असल्यामुळे तो पुरंदरे यांच्या अपप्रचाराला बळी ठरत होता. आता तो शिक्षित होऊन स्वत: संशोधन करत असल्यामुळे त्याला खरा इतिहास कळू लागला आहे. त्यांच्या मुद्देसूद विरोधाला जातिवाद ठरविणे अन्यायकारक आहे. त्यांच्या आरोपांचे युक्तिवादाने खंडन का केले जात नाही? पु. ल. देशपांडेंना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यानंतर खुद्द बाळ ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता, तोदेखील, पुलंनी युती सरकारच्या काही कृतींना विरोध केला होता म्हणून; हे राज ठाकरे आणि पुरंदरेंचे समर्थक विसरले का?   माझ्या मते पुरंदरेंना पुरस्कृत करणे, इतिहास विकृतीकरणाचे समर्थन ठरेल.
– डॉ. बशारत अहमद, उस्मानाबाद

First Published on August 20, 2015 3:54 am

Web Title: letter to editor 17
 1. मुकुंद सप्रे
  Aug 20, 2015 at 2:49 pm
  मुक्ता दाभोलकर यांनी प्रकरण अंगाशी यायला लागल्यावर त्यातून सुटकेचा (अ)तात्विक मार्ग शोधला आहे असे दिसते. कारण मुक्ता ताईंनी दिलेल्या खुलाश्यामध्ये मूल गफलत आहे. बाबासाहेब शिवशाहीर असल्याने त्यांच्या कथनात कल्पनेच्या भराऱ्या, गुणवर्णन, काव्य, भावनेला आवाहन असे इतर अनेक घटक असण्याची शक्यता त्या अप्रत्यक्षपणे वर्तवतात. मग पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक काय इतिहास संशोधक या भूमिकेतून लिहिले आहे काय कि ते पुरोगाम्यांनी प्रमाण मानले ? स्वत: पानसरे म्हणतात कि पुस्तिकेत मी "शोधलेले" काहीच नाही.
  Reply
 2. N
  naad
  Aug 20, 2015 at 3:48 am
  मुक्त ताई.. आपली गफलत होत आहे, तुम्ही पुरोगामी दाखवायच्या नादात ४ पावला जास्तच पुढे गेलात . जर तुमच असा म्हणन असेल तर शिवाजींनी स्वराज्य निर्मितीचा घात का घातला, राजा म्हणव म्हणून, कि उगीच काही काम नाही तर चल स्वराज्य बनवू ... याचा अर्थ कुठून तरी जाच होत होता, म्हणजे मुसलीम राज्यकर्त्यांच्या कडून होत होता.. त्यात अनेक Maratha सैनिक हि hote, मग काय तो जाच मार्थ्यांच्याकडून होत होता असा म्हणायचा आहे का ? मग तर वार वेगळ्याच दिशेला नेत्य tumhi.
  Reply
 3. R
  Ravi
  Aug 20, 2015 at 7:12 am
  "Intellectual" analysis, directly coming from Sharad Pawar ...architect of this issue
  Reply
 4. S
  Shriram
  Aug 20, 2015 at 4:54 pm
  आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध करणारी भूमिका मांडली त्याला पाठींबा दिल्याने मुक्ता काय, विद्या बाळ काय या एका झटक्यात एका सभ्य, सुसंस्कृत, सुजाण आणि अंधश्रद्धेविरुद्ध चीड असणाऱ्या समाजाच्या मोठ्या हिश्श्याच्या मनातून पूर्णपणे उतरल्या आहेत.आणि राष्ट्रवादीच्या महा-जातीयवादी कंपूचा भाग म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.आता त्यांनी कितीही हात-पाय मारले तरी त्या या मोठ्या वर्गाचा विश्वास कधीच संपादू शकणार नाहीत. नरेंद्र हे राजकारणापासून दूर राहिले ते आता राष्ट्रवादीचे ठरले आहेत.
  Reply
 5. S
  Shriram
  Aug 20, 2015 at 4:58 pm
  चांगला मुद्दा. राष्ट्रवादी आणि मुक्ता यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायला लावलेच पाहिजे.
  Reply
 6. A
  abhay
  Aug 20, 2015 at 10:49 pm
  ा असे वाटते कि पुरोगामी आणि बहुजन ह्या दोन शबाडांचा अर्ह काय आहे ह्यावर व्यापक चर्चा व्हायला हवी कारण कोणीही उपत्सुम्भा उठसुठ(किवा बोलीभाषेत हगल्या मुतल्या ) हे दोन शब्द वापरत असतो आणि खेदाची बाब म्हणजे जो मराठा समाज(किवा त्या समाजातील बहुसंख्य लोक) आजही खेड्यापाड्यात सवर्ण बनून दलितांना छळतो ,त्यांची घरेदारे जळतो तोही अगदी बिनदिक्कतपणे हे शब्द वापरत असतो तेव्हा ह्या दोन शब्दांच्या खर्याखुर्या अर्थाबद्दल व्यापकपणे चर्चा व्हायलाच हवी ....
  Reply
 7. Load More Comments