कमलाकर नाडकर्णी यांचा बालनाटय़ावरील लेख आणि त्यावरील मिलिंद बल्लाळ यांची प्रतिक्रिया वाचली. सुधाताई करमरकर यांनी श्याम फडके यांचे ‘गणपतिबाप्पा मोरया’ हे बालनाटय़ केले होते. त्यासाठी खूपच मोठा सेट तयार केला होता. त्यातले ‘चंदा राजा येऽऽ। चंदा राजा येऽऽ।।’ हे गाणे अजूनही रेडिओवर लागते. त्याचा लेखात कुठेही उल्लेख नाही. तसेच बापूंचे (श्याम फडके) फार्स ‘तीन चोक तेरा’, ‘काका किशाचा’, ‘बायको उडाली भुर्र्र’ काय कमी गाजले! पण कोणीही त्यांचा उल्लेख करत नाहीत. ‘काका किशाचा’मध्ये तर नाडकर्णीनी स्वत: काम केले होते. असो. ठाण्याचे नरेंद्र बल्लाळ आणि श्याम फडके हे उपेक्षितच राहणार. याचं कारण ‘आपलं काम आणि आपण’ अशीच त्यांची वृत्ती होती.
– सुमती फडके

शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव
रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या लेखाचं शीर्षक- ‘झोपेचे सोंग घेतलेल्यांना कोण जागे करणार?’- महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातल्या साखरसम्राटांना आणि राज्यकर्त्यांना तंतोतंत लागू पडते. ऊसशेती कमी पाण्याच्या भागात करू नये याचं कारण माहीत असून जर तुम्ही फक्त मोजक्या लोकांच्या आíथक स्वार्थाकरिता त्याचा हट्ट धरून बसलात तर त्याला ‘झोपेचे सोंग घेणारे’ म्हणूनच संबोधता येईल.  निसर्गाच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करण्यात जास्त किंमत आणि शक्ती मोजावी लागते, हे ठाऊक असूनसुद्धा आपण जर ते करू गेलो तर या जास्ती किमतीचा बोजा कुणावर तरी येणारच! उसाची शेती करताना पाणी वाचवण्याकरिता ठिबक सिंचन वापरायचं म्हटलं तरी त्याचा खर्च गरीब शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचा आहे. मग एकतर कर्ज घेऊन ते फेडायचं किंवा सरकारकडून सुट घेऊन तरी! या सर्वात फायदा फक्त मोठय़ा शेतकऱ्यांचा आणि साखर कारखानदारांचा होतो. छोटा शेतकरी देशोधडीला लागू नये, त्याला स्वाभिमानाने शेती करता यावी याकरिता जमिनीचा पोत आणि पावसाची शक्यता ओळखून योग्य ते पीक घेणे यातच शहाणपणा आहे. हीच गोष्ट डॉ. चितळे आणि मोरे यांच्यासारखे जाणकार इतकी र्वष सतत सांगताहेत. पण सत्तेचं पांघरूण घेऊन झोपायचं सोंग घेतलेल्यांनी त्यांची कदर केली तरच नवल !
मोहिते पाटील दुष्काळाचा ठपका वाईट नियोजनावर टाकून मोकळे होऊ इच्छितात आणि त्याला तोडगा म्हणून ‘नदी-जोड’ प्रकल्पाला प्राधान्य देऊ इच्छितात. ऊस लावला नाही तर ग्रामीण विकासाला खीळ बसण्याची भीती ते दाखवतात. ही विधाने त्यांनी कुठल्या माहितीच्या जोरावर केलीत, हे कळायला मार्ग नाही. या सगळ्यात शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. ‘नदीजोड’ प्रकल्पाबद्दल म्हणायचं तर सिंचन प्रकल्पांसारखंच तेही आणखीन एक कुरण ठरेल, याबद्दल कुणाचंच दुमत होण्याची शक्यता नाही.
– अरुण इनामदार