पंतप्रधान होण्यासाठी मोदींचे नेतृत्व सरस की राहुल गांधींचे, अशी वर्षभर तुलना करण्यासाठी जयपूर आणि दिल्लीतील त्यांची भाषणे आधार ठरणार आहेत, पण राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त देशापुढे तुल्यबळ किंवा त्यांच्यापेक्षाही सरस असे अन्य पर्याय पुढे येऊ शकतील?
सध्या दिल्लीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची चर्चा आहे. वर्षभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी आणि मोदी यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राजी झालेल्या राहुल गांधींनी जयपूरमध्ये २० जानेवारी रोजी केलेल्या पाऊण तासाच्या भावपूर्ण भाषणानंतर काँग्रेसजनांनी ‘पाणावलेल्या’ डोळ्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे मन:पूर्वक स्वागत केले, पण मोदींचे नेतृत्व स्वीकारण्याची संघ-भाजपची अजूनही मानसिक तयारी झालेली नाही. आपल्या वक्तृत्वात राहुल गांधींपेक्षाही नाटय़मयता आणि परिपक्वता असल्याचे दाखवून संघ-भाजपवर नव्याने प्रभाव पाडण्यासाठी मोदींना पंधरा दिवसांनंतर दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपुढे दीड तास भाषण करावे लागले. आपल्यासाठी आयोजित करण्यात आलेला इव्हेंट सुपरहिट ठरावा म्हणून राहुल गांधी आणि मोदी यांनी आपल्या भाषणांच्या अंतिम सादरीकरणापूर्वी भरपूर सराव केला असणार तसेच त्यांच्या इव्हेंट मॅनेजर्सनीही त्यांच्याकडून कुठलीही चूक होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली असणार यात शंकाच नाही. भारताच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने विकणारी ही भाषणे स्वाभाविकपणे दोघांच्याही श्रोत्यांच्या पसंतीला उतरली. आता देशाचे पंतप्रधान होण्यासाठी मोदींचे नेतृत्व सरस की राहुल गांधींचे, अशी वर्षभर तुलना करण्यासाठी  त्यांची ही भाषणे आधार ठरणार आहेत, पण राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त देशापुढे पंतप्रधानपदासाठी तुल्यबळ किंवा त्यांच्यापेक्षाही सरस असे अन्य पर्याय पुढे येऊ शकतील?
लोकसभा निवडणुका म्हणजे कोटय़वधी लोकांच्या भावनांशी होणारा खेळ. सर्वसामान्यांना खिळवून ठेवणाऱ्या सातत्यपूर्ण ओघवत्या वक्तृत्वाने पक्ष संघटनेची कमजोरी, जात, धर्म यांसारख्या विविध अडथळ्यांवर मात करून एक दिवस कामयाब होता येते, हे थेट हृदयाला भिडणारी संवादशैली असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी सिद्ध केले होते. त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर निवडणुकीत सर्वसामान्यांच्या भावनांशी होणारा शब्दांचा खेळ थांबून पैशाचा खेळ वाढीलालागला. प्रचंड ‘जनाधार’, पण वक्तृत्वाचा अभाव असलेल्या अनेक नेत्यांनी भरमसाट पैशाचा वापर करून आपल्या व्यक्तिमत्त्वातील उणिवेची यशस्वीपणे भरपाई केली. भारताच्या राजकारणात एकूणच वक्तृत्ववान राजकीय नेत्यांची वानवा असल्याने हा ट्रेंड सोळाव्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहणार हे उघडच आहे, पण वक्तृत्वाला ‘अर्थपूर्ण’ जोड देणाऱ्या नेत्यांचे या चुरशीच्या स्पर्धेत सुरुवातीपासून पारडे जड ठरू शकते. राहुल गांधी हिंदूी आणि इंग्रजी उत्तम बोलत असले आणि जयपूरच्या चिंतन शिबिरातील त्यांच्या भाषणाचे वारेमाप कौतुक होत असले तरीही ते नैसर्गिक वक्ते नाहीत. सध्याच्या भाजप नेत्यांमध्ये वक्तृत्वात सरस असलेले मोदी गुजराती आणि हिंदूी उत्तम बोलतात, पण समाजातील इंटलेक्चुअल्सना प्रभावित करणाऱ्या इंग्रजीमध्ये सहजता नसल्याने त्यांच्या अश्वमेधाला खीळ बसते. शिवाय आधी ठरवलेलेच बोलण्याची सवय झाल्यामुळे दोघेही नेते सहसा पत्रकार परिषदांतील प्रश्नांना उत्स्फूर्त उत्तरे देण्याचे टाळत असतात. मात्र राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या ‘ओजस्वी’ वाणीला धार देणारी प्रचंड मोठी पण अदृश्य अशी यंत्रणा पडद्याआडून अहोरात्र काम करीत असते. परिणामी सत्ता, पैसा आणि ‘वक्तृत्व’ यांचा त्रिवेणी संगम साधल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱ्या अटीतटीच्या स्पर्धेत तिसऱ्याचा, उदाहरणार्थ नितीशकुमारसारख्या गरीब बिहारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याचा निभाव लागणे अवघडच आहे.
शिवाय या स्पर्धेत अस्सल, प्रतिभावान, पण आर्थिक पाठबळ नसलेल्या नेतृत्वाला वाव तरी कुठे आहे? भारतात संसदीय ‘लोकशाही’ असली तरी ती राबविणारी पक्षामधील अंतर्गत लोकशाही हळूहळू संपुष्टात येत असून यथावकाश भाजपला हा आजार ग्रासणार आहे, तर डावी आघाडी तशीच क्षीण होत चालली आहे. याचा अर्थ भारताच्या राजकारणात चोवीस कॅरेटसारखी शुद्ध प्रतिभा असलेले नेतृत्व उदयास येणारच नाही, असेही नाही. मात्र त्यासाठी अंतर्गत घराणेशाही आणि हुकूमशाही राबविणाऱ्या राजकीय पक्षांची दुकाने बंद व्हावी लागतील.  
दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर म्हणजे प्रस्थापित इंटलेक्चुअल्सचा अड्डा. लंच, डिनर आणि हाय टीच्या निमित्ताने समाजातील विविध प्रवाहांशी बांधीलकी असलेल्या  विचारवंतांची येथे वैचारिक देवाणघेवाण चाललेली असते आणि त्यातून देशविदेशातील अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा परिचय घडतो. गेल्या साडेतीन दशकांपासून दिल्लीत असलेले ज्येष्ठ मराठी पत्रकार आणि इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट या संघटनेचे अध्यक्ष विजय नाईक याच वर्तुळात वावरणारे. त्यांच्या संघटनेने तिबेटचे वनवासी ‘पंतप्रधान’ लॉबसँग सँगे यांचे ‘विजनवासातील लोकशाही आणि तिबेटचे भवितव्य’ या विषयावर अलीकडेच व्याख्यान आयोजित केले होते. आता भारतीय संसदेत घराण्यांचे वलय लाभलेल्या तरुण खासदारांच्या तुलनेत सँगे म्हणजे किस झाड की पत्ती! पण सँगे हे राजकारणात कुणाच्या वशिल्याने किंवा घराण्याचा वारसा चालविण्यासाठी आलेले नाहीत. तिबेटमधून भारताच्या आश्रयाला आलेल्या लाखो निर्वासितांपैकी ते एक. दार्जिलिंग आणि कलिम्पाँगदरम्यानच्या लामाहट्टा येथे शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले. त्यांना शाळेत पाठविण्यासाठी त्यांच्या पित्याला एक गाय विकावी लागली होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दिल्लीत सँगे यांनी बी.ए. आणि कायद्याची पदवी घेतली. फुलब्राइटची शिष्यवृत्ती मिळवून हार्वर्ड विद्यापीठात शिकण्याच्या निमित्ताने अमेरिकेत १६ वर्षांपासून वास्तव्याला असलेले सँगे चीनशी तिबेटचा लढा लढण्यासाठी भारतात परतले आणि विजनवासातील तिबेटचे पंतप्रधान बनले. कमालीच्या निराशाजनक पाश्र्वभूमीवर चीनसारख्या अजस्र शक्तीशी झुंजण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांमध्ये ओघवत्या वक्तृत्वाच्या जोरावर ते प्रचंड आशावाद आणि सकारात्मकता निर्माण करतात. धर्मशाळेत लुटुपुटुच्या सरकारचा कारभार चालविताना तिबेटसाठी कराव्या लागणाऱ्या प्रचारामुळे चीनकडून आपल्या जिवाला धोका आहे, याची पर्वा न करता हिरिरीने तर्कसंगत युक्तिवाद करून आपल्या राजकीय बुद्धिमत्तेची ते छाप पाडून जातात. दीर्घकाळ तुरुंगात राहून नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष संपुष्टात आणण्यासाठी केलेला संघर्ष, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीला विभागणारी कोसळलेली बर्लिनची अभेद्य िभत, म्यानमारच्या तुरुंगात ऐन उमेदीचा काळ घालविल्यानंतर दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालय या आपल्या जुन्या महाविद्यालयात अवतरलेल्या आँग साँग स्यू की, राजेशाही-हुकूमशाही अंगवळणी पडलेल्या अरब देशांमध्ये तगण्याची तिळमात्र शक्यता नसलेल्या लोकशाहीचे वाहू लागलेले वारे.. अशी उदाहरणे देत चिनी ड्रॅगनच्या विळख्यात सापडलेल्या तिबेटच्या स्वातंत्र्याचीही पहाट अशीच अकस्मात उगवेल, असा दुर्दम्य आशावाद ते सदैव बाळगून असतात. जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांचे तिबेट आणि चीनविषयी असलेल्या मतांचे दाखले देत आपले मुद्दे पटवून देतात. उत्तम प्रभावी वक्तृत्व निर्माण करणे हे हार्वर्डचे वैशिष्टय़ आहे. तिथे जाऊन सँगे यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि धारदार बनले. जीवनमरणाचा प्रश्न म्हणून ही कला सँगे यांनी आत्मसात केली. भारतात प्रतिभावंतांची कमतरता नाही, हेच सँगे यांच्याकडे बघून लक्षात येते.  
असे अनेक सँगे आज भारतात विविध क्षेत्रांत आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडत असतील, पण त्यांना राजकारणाची सहजासहजी संधी मिळत नाही. आज घराणेशाहीचा वारसा चालविणारे अनेक तरुण नेते हार्वर्ड किंवा विदेशी विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेऊन देशाच्या राजकारणात खासदार किंवा मंत्री म्हणून प्रस्थापित झाले आहेत. वडिलोपार्जित पुण्याईमुळे वाढून ठेवलेल्या या संधीचे त्यांनी किती चीज केले? या शिक्षणाचा त्यांना राजकारणात व्यावसायिकता आणण्यात कितपत उपयोग झाला? त्यांच्यापैकी किती जण सँगे यांच्या गुणवत्तेची बरोबरी करू शकतील? बडय़ा नेतापुत्रांचा जमिनीवरील राजकारणाशी, वास्तवाशी संबंध नसतो. तरीही उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांना संशयाचा फायदा दिला जातो. दडपशाहीचा अतिरेक होतो तेव्हा आत दडून बसलेली प्रतिभा अधिक प्रखरपणे उफाळून येते. बराक ओबामा किंवा लॉबसँग सँगे यांच्यासारख्या प्रतिकूलतेशी झगडणाऱ्यांमध्ये ती ठासून भरलेली असते. अत्यंत अनुकूल परिस्थितीत वाढलेल्या श्रीमंत राजकीय घराण्यांच्या वारसांमध्ये अशी संघर्षांची वृत्ती दुर्मीळच असते. सँगे यांच्या पोडतिडिकेने किंवा आशावादाने समाजासाठी भरभरून बोलणारे किती नेते देशाच्या राजकारणात दिसतात? कारण अशा प्रतिभेसाठी राजकारणाची कवाडे सहजपणे उघडायची नाही, असाच शिरस्ता बनला आहे. राजकीय नेतृत्वाचे पर्यायच मर्यादित झाल्यामुळे वाजपेयी किंवा सँगेंसारख्या सरस्वतीचे वरदान लाभलेल्या उत्स्फूर्त वक्त्यांऐवजी पडद्यामागील यंत्रणेद्वारे नियंत्रित होणाऱ्या राजकीय वक्तृत्वावरच समाधान मानावे लागते.