एखादा राजकीय पक्ष सत्तेच्या जवळ पोहोचू लागला, की त्यामध्ये आयारामांची गर्दी सुरू होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या सत्ताकाळात तो ओघ काँग्रेसकडे होता. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी तो प्रवाह उलटा झाला आणि आयारामांचा ओघ रालोआचा मुख्य प्रवाह असलेल्या भाजपकडे वळला. असे झाले, की कोणत्याही राजकीय पक्षात आपोआपच दोन तट तयार होतात. कानामागून येऊन तिखट बनू पाहणाऱ्या आयारामांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न सुरू होतात आणि आपण पक्षातील ‘मूल निवासी’ म्हणजे, निष्ठावंत आहोत, हे दाखविण्याची धडपड सुरू होते. असे सिद्ध करण्याची पक्षापक्षांतील निष्ठावंतांची तऱ्हा वेगवेगळी असली, तरी त्यामागील वेदना एकच असते. त्यामुळे पक्षनिष्ठा सिद्ध करणे हे एक राजकीय दिव्य असते. काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये निष्ठा व्यक्त करण्याचा मार्ग काहीसा सोपा आहे. आपण पक्षाच्या मूळ प्रवाहाचाच एक भाग आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पक्षाची मातृसंस्था असलेल्या रा. स्व. संघाशी नाळ जोडून ठेवली की झाले. किंबहुना, पक्ष सत्तेवर आल्यानंतरही सत्तेपासून दूर असलेल्या निष्ठावंतांची ही आजकालची गरज झाली आहे. निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेल्या आयारामांच्या बेसुमार लोंढय़ामुळे, खरा ‘भाजपाई’ कोण आणि काल येऊन दाखल झालेला कोण यामध्ये मोठीच गल्लत सुरू झाल्याने, मूलनिवासी भाजपाईंची काहीशी कोंडीदेखील होऊ लागली आहे. अशा वेळी आपल्या मातृसंस्थेच्या पायाशी लोळण घेऊन, ‘शुभामाशिषं देहि’ अशी याचना करणे हा साहजिक उपाय उरतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपमधील अनेक निष्ठावंतांच्या गळ्यात काहीशा अनपेक्षितपणे खासदारकीची माळ पडली. आपला विजय ही मोदी लाटेचीच किमया असून त्यामुळेच निवडून आल्याची कबुली अनेकांनी अगोदरच देऊन ठेवल्याने, स्वकर्तृत्वाच्या पाढय़ाचे पुस्तक अनेकांनी स्वत:हून अगोदरच बंद केलेले होते. सत्ता हाती आल्यानंतर सहजपणे तिची फळे चाखणाऱ्या आयारामांच्या गर्दीत आपला निभाव लागण्याची उमेद आता वर्षभरानंतर मावळत चालल्याने अशा काही निष्ठावंतांच्या वेदना अलीकडे मात्र अधिकच ठसठसू लागल्या आहेत. या वेदनांवर फुंकर मारण्याची एक जागा त्यांना अगोदरपासूनच माहीत आहे, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाजू! प्रात:समयी शुचिर्भूत व्हावे आणि संघशाखेवर उपस्थिती लावून, ध्वजासमोर नतमस्तक होऊन ‘त्वया हिंदुभूमे सुखंवर्धितोहम्’ असे म्हणत स्वकर्तृत्वाच्या पोवाडय़ांवर स्वतहून पडदा टाकावा हा मध्यममार्ग अनेकांनी स्वीकारलेला दिसतो. संघाच्या शाखेवरील आपली दैनंदिन उपस्थिती हा आपल्या वेदनेवरील उपाय ठरेल आणि सत्तेच्या सान्निध्यात असूनही दुरापास्त झालेली सत्तेची ऊब कधी ना कधी आपल्यालाही लाभेल, हाही कदाचित अनेकांचा गुप्त होरा असू शकतो. भाजपच्या खासदारांसाठी संघाचे गुरुपौर्णिमा आणि रक्षाबंधन उत्सव संसदेच्या पावसाळी अधिवेशनकाळातच पार पडले. आता मनगटांवरील भगवा धागा असलेली राखी हीच आपल्याला अशा सत्तावियोगाच्या संकटातून तारून नेईल, अशी आशाही अनेकांच्या मनात पालवली असेल. पक्षाचे कर्ते नेते नरेंद्र मोदी यांची कृपादृष्टी प्राप्त करण्याचाच जवळचा मार्ग कदाचित संघस्थानावरून सापडेल, अशा आशेचे किरण संघस्थानावरील उपस्थितीतून मनामनांत जागे होत असतील. खासदारांच्या मनात काहीही असले, संघाला त्याच्याशी देणे-घेणे नसणारच. संघशाखांच्या संख्येत भर पडल्याची एक नोंद संघाच्या रोजनिशीमध्ये झालेली असेल, एवढेच!