चार्वाकांनी धर्माला जो नकार दिला, तो नकार कर्मकांडाला, चातुर्वण्र्याला व इहलोकाऐवजी परलोकाकडे दृष्टी लावून बसण्याला होता. काय चूक होते त्यात? त्यांची सुस्पष्ट जीवनमूल्ये होती व सामाजिक अन्यायाचा त्यांनी निषेध केला होता.

१. लोकायत किंवा लोकायतिक विचार : लोकायत ही सामान्य लोकांची विचारधारा म्हणून तेव्हा तिला हे नाव पडले असावे. हे सामान्य लोक म्हणजे आर्याच्या भारतप्रवेशापूर्वी अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीतील लोक असावेत किंवा आर्य स्वत:ला देव किंवा सुर जातीचे मानीत असल्यामुळे जे लोक देव जातीचे नाहीत ते सगळेच त्यांना सामान्य लोक वाटत असावेत. या देहात्मवादी लोकायत मताप्रमाणे माणसाचा देह हाच आत्मा आहे; देह ‘मर्त्य’ असून, माणसाला निसर्गाकडून ‘अमर’ असा दुसरा कसलाही आत्मा मिळालेला नाही. माणसाच्या शरीराच्या मृत्यूनंतर त्याच्यापुरते सर्व काही संपते. (त्यामुळे स्वर्ग, नरक, परलोक, देवदेवता, मृत्यूनंतर आत्म्याची स्थिती इत्यादी सर्वच कल्पना भ्रांतिमय आहेत.) ‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ मानणारे हे विचार भौतिक आहेत (आध्यात्मिक नव्हेत) आणि याच विचारात ‘वैज्ञानिक विचारधारेचे बीज’ आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात की, समग्र मानवी विचारांचा अभ्यास केला तर ‘वैज्ञानिक विचारधारेचे बीज’ जगात सर्वप्रथम भारतात व लोकायतिकांनीच पेरले असे नक्की म्हणता येते.
अतिप्राचीन काळापासून प्रचलित असलेले हे मत, प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणारे हे मत, प्राचीन उपनिषदांच्या काळी म्हणजे महाभारत युद्धापूर्वीच एक प्रभावी मत म्हणून विद्वानप्रिय नव्हे, पण लोकप्रिय मात्र होते, असे निश्चित म्हणता येते; परंतु ते विचार यज्ञविरोधी, वेदविरोधी आणि नास्तिक असल्यामुळे, आर्य जेते असलेल्या या देशात, या मताची उपेक्षा, अनादर व उपहास झाला असावा असे दिसते, किंबहुना या बुद्धिवादी, अनात्मवादी मताचा पाडाव करण्यासाठी ‘वेदान्त’ (म्हणजे उपनिषदे) या आत्मावादी, पुनर्जन्मवादी दर्शनाची रचना झाली असावी असेही म्हणता येते. कसे ते पाहा. आत्म्याच्या मरणोत्तर गतीचा तथाकथित सिद्धान्त स्पष्ट रीतीने प्रथम बृहदारण्यक व कठ या उपनिषदांमध्ये मांडण्यात आला. त्यात ‘आत्म्याचे मरणोत्तर अस्तित्व असू शकत नाही’, असे लोकायतवादी मत ‘पूर्वपक्ष’ म्हणून मांडून त्यानंतर त्याविरुद्ध अमर आत्म्याचा सिद्धान्त सांगितलेला आहे, पण तो सिद्ध केलेला नाही. बहुतेक वैदिक दर्शनात, जेव्हा पूर्वपक्ष मांडतात तेव्हा तो लोकायत मत देऊन मांडतात व उत्तरपक्ष म्हणून त्यांचे काही ‘अतींद्रिय ज्ञान’ म्हणजे त्यांच्या ‘अवास्तव कल्पनांना’ सिद्धान्त म्हणून सांगितलेले असते. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणाऱ्या लोकायतिकांनी मात्र वैदिकांच्या या अतींद्रिय ज्ञानाला ‘सत्य’ मानण्याचे नाकारले.
शिवाय कठोपनिषदाने असेही म्हटलेले आहे की, ‘बुद्धिवादाने या प्रश्नाचा निकाल लागणार नाही. केवळ श्रद्धेनेच परलोकगामी आत्मा गृहीत धरावा लागतो. म्हणजे झालेच की! देहाहून वेगळ्या आत्म्याचे ‘अस्तित्व, अमरत्व व पुनर्जन्म’ ही सर्व श्रद्धेने मानण्याची गृहीते आहेत, सिद्धान्त नव्हेत. तर सारांश असा की, ‘सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकणार नाही, ते फक्त बुद्धीनेच होऊ शकेल,’ असे ठामपणे सांगणारे लोकायत मत हे बुद्धिवादी विचार भारतात अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहेत.
२.बार्हस्पत्य मत : बार्हस्पत्य मत म्हणजे बृहस्पतीचे मत. हे लोकायत विचारधारेचेच, सिंधुसंस्कृतीनंतरच्या वेदकाळातील पर्यायी नाव आहे. याच नावाने या विचारधारेचे उल्लेख आर्याच्या वेद आणि वेदान्त वाङ्मयातसुद्धा आलेले आहेत. वास्तविक इंद्र हा जसा देवांचा- आर्याचा राजा होता तसा बृहस्पती हा देवांचा गुरू होता. पुढे बृहस्पती हे गोत्रनाम झाले असणार, जशी कश्यप, वसिष्ठ, भारद्वाज ही गोत्रनामे झालेली आहेत, तसेच आणि स्वत: बृहस्पतीने व बृहस्पती गोत्रातील तत्त्वचिंतकांनी लोकायत मत तत्त्वस्वरूपात मांडले असावे व म्हणून त्या मताचा लोकायत या नावाबरोबर बार्हस्पत्य असा उल्लेख वारंवार आलेला असावा. त्या काळी प्रत्येक गोत्रातील पिढय़ान्पिढय़ांमधील व्यक्तीचा त्या त्या गोत्रनामाने उल्लेख करण्याची प्रथा प्रचलित होती, हे तर निश्चित.
पण आता प्रश्न असा पडतो की, देवांचाच गुरू असलेला व त्यांच्या यज्ञांचे पौरोहित्य करणारा बृहस्पती ‘ईश्वर, देवदेवता, दैव, आत्मा आणि स्वर्ग-नरक हे सर्व खोटे आहे,’ असे कसे म्हणेल? ‘यज्ञाचे फळ मिळू शकत नाही,’ असे कसे म्हणेल? हे तर देवविरोधी, आर्यमतविरोधी विचार झाले. तर हे असे घडणे कसे शक्य आहे ते आता पाहू या. पुढील काळातील पुराणामध्ये आलेली एक कथा जिच्यातील मूळ घटनेचा खुद्द ऋग्वेदातही उल्लेख आहे ती कथा अशी :
एकदा बृहस्पती आणि त्याची पत्नी तारा ही दोघे एका यज्ञाचे पौरोहित्य करीत असताना सत्तेमुळे उन्मत्त झालेला देवांचा एक राजा ‘सोम’ तिथे आला व त्याने ताराला म्हणजे गुरुपत्नीला यज्ञस्थळावरून पळवून नेले. ‘माझ्या पत्नीला परत कर,’ अशी विनंती बृहस्पतीने सोमाला केली; पण तो ऐकेना. शिवाय सोमाबरोबर युद्ध करायला देवही बृहस्पतीला मदत करीनात. म्हणून बृहस्पतीने ‘शंकराच्या’ मदतीने सोमाशी युद्ध केले व आपल्या पत्नीला परत आणले. त्या वेळी शंकराने गणेश्वर, यक्षेश्वर, वेताळ, उरग व किन्नर यांचे सैन्य बरोबर घेतले होते. आता असे पाहा की, त्या वेळी शंकर हा अनार्य (असुर) देव होता व त्याला तेव्हा वैदिक देवता मंडळात स्थान नव्हते. तरीही त्याने बृहस्पतीला मदत केली, याचे एक कारण हे की, तो बृहस्पतीचे वडील अंगिरसमुनी यांचा शिष्य होता व म्हणून बृहस्पतीचा तो मित्र असावा. आता झाले असे की, बृहस्पतीवर स्वत:ची पत्नी पळविली जाण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या बाजूने लढले कोण? देव-आर्य नव्हे, तर अनार्यानी, असुरांनी त्याला मदत केली. त्यामुळे किंवा काहीही कारणाने असेल, पण आर्य दांभिक आहेत आणि त्यांचे वेदविचार सत्य नव्हेत, असे त्या आर्यगुरूला वाटले असेल हे शक्य आहे. मग त्याने स्वत: अनार्याचे लोकायत विचार समजून घेतले असावेत, ते त्याला पटले असावेत आणि ते त्याने बार्हस्पत्य मत म्हणून त्याच लोकांना तत्त्वज्ञान रूपात शिकविले असावेत.
परंतु असे काही घडलेच नाही, असे दाखविण्यासाठी कुणा एका पुराणकाराने एक वेगळीच कथा रचली. त्या कथेप्रमाणे ‘बृहस्पतीने अनार्याना दहा वर्षांपर्यंत लोकायत मत शिकविले’ हे खरे, पण ते शिकवून त्याने त्यांना ‘फसविले, मूर्ख बनविले!’ बरोबर आहे! आर्याचे मत ते ज्ञान व आर्येतरांचे ते अज्ञान! सगळे पुराणकार आर्य संस्कृतीचे पाइक होते ना! ते तर विद्येचे धनी! बाकीच्यांची ती अविद्या.
३. चार्वाक तत्त्वज्ञान : याच लोकायत किंवा बार्हस्पत्य मताला वेदकाळापुढील काळात ‘चार्वाक तत्त्वज्ञान’ असे नाव पडले. तेव्हा किंवा केव्हाही चार्वाक नावाचा कुणी तत्त्ववेत्ता होऊन गेल्याचे आढळत नाही. महाभारतात चार्वाकाचा उल्लेख एक राक्षस म्हणून आलेला आहे. युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर अश्वमेध यज्ञाच्या तयारीला लागलेला असताना तिथे एक चार्वाक येतो आणि ‘बांधवांना मारून मिळविलेला तुझा विजय खरा नव्हे,’ असे त्याला सांगतो. त्या वेळी तिथे जमलेले ब्राह्मण, त्याच्याबरोबर काहीही वादविवाद न करता तो दुर्योधनाचा मित्र, चार्वाक नावाचा एक राक्षस (असुर) आहे, असे सांगून त्याला ठार मारून टाकतात.
महाभारत युद्धानंतर काही शतकांनी आलेल्या बुद्ध काळातही (इ.स. पू. ६ वे शतक) काही थोडे विचारक तरी चार्वाक मताचे होते असे दिसते. उदा. बुद्धाचा समकालीन अजित केशकांबळी. ‘कर्मफळासाठी कर्मकांड करायला सांगणारे धूर्त, स्वत:च्या आर्थिक लाभासाठी तसे सांगतात,’ असे त्याने सांगितले.
या प्राचीन नास्तिक विचारांना इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकात ‘दर्शन’ (सुसंघटित तत्त्वज्ञान) असे स्वरूप मिळाले असावे, असे व इ.स.च्या चौदाव्या-पंधराव्या शतकात ते पूर्णावस्थेत पोहोचले असावे, असे चार्वाक दर्शनाचे संशोधक प्रा. सदाशिव आठवले म्हणतात. ही स्वरूपे कोणी दिली ते माहीत नाही व चार्वाकांचे काहीही ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. पुढील काळातील माधवाचार्य, गुणरत्न वगैरेंच्या ग्रंथांवरून असे दिसते की, चार्वाकांनी आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म, कर्मफळसिद्धान्त, यज्ञ, परलोक, धर्म, मोक्ष वगैरे सर्व काल्पनिक ज्ञान आणि चातुर्वण्र्यही नाकारले. ‘सर्व लोक समान आहेत’ असे आणि ‘सर्वानी कष्टाद्वारे सुख मिळवावे,’ असे त्यांनी सांगितले; पण चार्वाक मत सततच वैदिकांच्या द्वेषाचा केंद्रबिंदू राहिल्याने, ‘कुठल्याही मार्गाने भोग मिळवावेत,’ असे त्यांचे म्हणणे होते, असे असत्य पसरविले गेले.
वास्तविक चार्वाकांनी धर्माला जो नकार दिला, तो नकार कर्मकांडाला, चातुर्वण्र्याला व इहलोकाऐवजी परलोकाकडे दृष्टी लावून बसण्याला होता. काय चूक होते त्यात? त्यांची सुस्पष्ट जीवनमूल्ये होती व सामाजिक अन्यायाचा त्यांनी निषेध केला होता. वैज्ञानिक विचारसरणीला पायाभूत असलेले हे शुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दर्शन जगात आधुनिक विज्ञानयुग येण्यापूर्वीच प्राचीन भारतात प्रचलित होते, हे भारतीयांना, हिंदूंना नक्कीच अभिमानास्पद आहे.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

शरद बेडेकर